माध्यमांना चघळण्यासाठी नवे हाडुकं. हेच खरे आहे ‘वास्तव में ट्रूथ?’
‘गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांना चघळण्यासाठी नवे हाडुकं मिळाले आहे. हेच खरे आहे ‘वास्तव में ट्रूथ’ असे माझा माध्यमकर्मी मित्र म्हणाला. त्याला काय म्हणायचे होते? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर तो म्हणाला की, ‘दररोज काय नवे सांगायचे ज्याने लोक वेगळ्याच विषयात गुंतून राहतील? हा प्रश्न टिआरपीवाल्या माध्यमांना पडतो, पण हल्लीचे सरकार आणि सत्ताधारीपक्षच मग आपल्या सोईसाठी त्यांचीही सोय करतो म्हणून बरे आहे’. कदाचित ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही घोषणा त्याच अर्थाने देण्यात आली असावी!
लोकांना भ्रमित करायचे,
म्हणजे रे काय? मी आपल्या भाबडेपणाचा फुगा फुटू नये म्हणून विचारलं. तर हा सर्वज्ञानी(? माध्यमातील असल्यानेच) म्हणाला की, विधानसभा निवडणूकीत गडबडघोटाळा झाल्याचा आरोप झाल्यापासून चार महिने झाले, ही चर्चा टाळण्यासाठी की काय, आधी राजकारणाचे सवतेसुभे रुसवेफुगवे, मग बीड मधले रक्तरंजीत राजकारण, मध्येच इतिहासातील कबर, समाधी सारखे विषय असे करत करत सत्ताधारी पक्षाने लोकांना भ्रमित करायचे आणि वीट येईपर्यंत विषय ताणायचे ठरविल्यासारखे सारे सुरू आहे.
म्हणजे नक्की काय रे भाऊ? अश्या प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिल्यावर मित्र पुढे सांगू लागला. बीडच्या एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांसमोर पुरावा देत निवडणूक घोटाळा झाला असल्याचा गौप्यस्फोट केला. पण हा अधिकारी त्याच्या बँक खात्यात अवैध रक्कम सापडल्याने आधीच निलंबीत झाला आहे. आधी त्याने वरिष्ठ पोलीसांवर आरोप केले नंतर स्थानिक राजकीय नेते आणि आता तो सत्ताधारी मंत्री मुख्यमंत्री यांची नावे घेवू लागला आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांची पंचाईतच ना?
जे पेरले तेच उगवले!
नेमके त्याच वेळेस राज्यात मुंबईसारख्या शहरात सत्ताधारी पक्षाच्या पाठिशी आर्थिकशक्ती सह अनेक वर्ष उभे असणाऱ्या समाजाचे मंदिर बुलडोझरने विनाचौकशी महापालिकेकडून पाडण्यात आले आहे. हिंदुत्ववादी नेते जेव्हा अशी कारवाई उत्तर प्रदेशात करतात किंवा अगदी नाशिक सारख्या शहरात करतात तेंव्हा त्याला सत्ताधारी ज्या वर्गाचा पाठिंबा असतो त्याच समाजाचे हे मंदिर जेंव्हा मुंबईत त्याच समाजाचा सहपालकमंत्री असताना तोडले जाते त्यावेळी सत्ताधाऱ्यांमधील आपसातील संघर्ष कोणत्या पातळीवर आला आहे याची कल्पना केलेली बरी. म्हणजे पुन्हा सत्ताधाऱ्यांची पंचाईतच ना? मग अश्या अडचणीच्या वास्तवातील मुद्यांची चर्चा होवून ते सामान्य जनतेपासून दूर ठेवायचे असतील तर वेगळ्या विषयांची चर्चा माध्यमांतून घडवण्यासाठी केले जाते ते ‘वास्तव में ट्रुथ’ सारखे बीगबॉस बजेट पॉडकास्ट. आणि मग दुसरा मुद्दा मिळेपर्यंत रगडली जाते. तेच सध्या सुरू आहे. मोठे सिनेमे, बिग बॉस सारखे शो करणारा माणूस चक्क पॉडकास्ट घ्यायला सुरूवात करतो? म्हणजे बिग बजेट काय असेल? कुणाचे असेल न सांगताही समजेल ना? वास्तव मे truth हेच आहे!
वास्तव मे truth हेच आहे!
पुन्हा पहिलाच विषय शिवसेना आणि मनसेना यांचे सख्खे चुलत भाऊ असलेले नेते एकत्र येतील तर कुणाचे नुकसान होणार आहे? हा सामान्य मराठी भाबड्या लोकांच्या मनातला प्रश्न. पण त्या दोघांसारखाच एक तिसरा जो आहे त्याचेच नाही का नुकसान होणार? हा मेसेज सत्ताधारी एका पक्षाने त्यांच्यातील त्या दुसऱ्याला दिला आहे की काय? असे त्यांच्या स्वाभाविक आलेल्या प्रतिक्रियेतूनच दिसले नाही का? मग त्यावर सामान्य लोक, माध्यमांतून उलट सुलट चर्चा होत राहतील पण लोकांसमोर जे खरे ‘वास्तव में ट्रूथ’ जायला नको आहे ते तर थांबविता येते. असेच ना? मित्राने हसत मान हलवत अगदी बरोबरचा संकेत दिला.
आदू आणि दादूच्या पक्षाची भिती?
गोष्ट तर तशीच आहे महेश मांजरेकरने दीड महिन्यापूर्वी घेतलेल्या ‘वास्तव में ट्रूथ’ या पॉडकास्टचा वापर आता चलाखीने करण्यात आला आहे. त्यामागे गणित काय आहे? असा सवाल मग सत्ताधारी पक्षांच्या सूत्रांना विचारला तर त्यांनी सांगितले की, विधानसभेत शिंदेसेना, मनसे सोबत घेवूनही आणि यंत्रणेचा गडबड घोटाळा करूनही शिवसेनेच्या आदू आणि दादूच्या पक्षाला एकूण वीस पैकी फक्त मुंबईत दहा विधानसभा हाती लागल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका जिंकायची असेल तर सत्ताधारी पक्षाला आता यंत्रणेत गडबड झाला त्या प्रमाणात करता येणे शक्य नाही आणि करूनही तसा उपयोग नाही. पण मुंबईत काही झाले तरी आदू जे रोज वर्मी घाव घालणारे मुद्दे उचलतो आहे त्यामुळे आणि दादू ‘शेवटचा मावळा असे पर्यंत लढायची जिद्द’ कमी होवू देत नसल्याने सामान्य मराठी मुंबईकर त्यांच्या मागे जाणारच ना? हेच शासकीय यंत्रणा पुन्हा पुन्हा सांगत आहेत. मग आता त्यांच्या मतदारांना संभ्रमात करण्याच्या युक्त्या केल्या जात आहेत.
‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा’
म्हणूनच दीड महिन्यापूर्वीची पॉडकास्ट अश्यावेळी व्हायरल करण्यात आली की ‘राजा’ परदेशात गेला आहे. म्हणजे दादूच्या पक्षाने सोबत येण्याबाबत खरच मनाची तयारी केली तरी संपर्क लगेच होत नाही. आणि त्यांच्या पक्षात गळती लागली असताना नेमकी त्यांची मनोभुमिका गळपटली आहे की नाही याची देखील चाचपणी केली गेली म्हणे? बाकी या मनोमिलनाच्या गोष्टी म्हणजे ‘हवाहवाई उन्हाळ्यातील गारव्याची झुळूक’ आहे. जोवर दिल्लीशहांची ‘नजर’ आहे तोवर महाराष्ट्राच्या कोणत्याही राजकीय नेत्याला मनाप्रमाणे काम करता येणार नाही अगदी भाजपचे नेतेही त्याला अपवाद नाहीत असे या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र वाल्मिकी गदिमांच्या गीत रामायणात भरतभेट प्रसंगी जे म्हटले आहे तेच ‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा’ हेच सध्या या बंधू बाबतही सत्य आहे असे या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरात जे आहे तेच महाराष्ट्राच्या अनेक राजकीय घराण्यांमध्ये सध्या पहायला मिळत आहे.
कुणालाही राजकीय निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे स्वातंत्र्य सध्या नाही, त्यामुळे पटावरच्या सोंगट्या हलविल्या जातील तश्याच हलत राहतील. कठपुतळ्यांचे राजकारण राज्यात आणि देशात होत राहणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास कितीही विरश्रीचा असला तरी वर्तमानात नेत्यांना स्वराज्याचे स्वप्न पाहता येत नाहीच हेच तर सांप्रत या नेत्यांचे दुर्दैव म्हणायला हवे.
दिल्लीश्वरांना खूष करण्याची स्पर्धा
त्याचेच प्रतिबिंब मागील आठवड्यात रायगड जिल्ह्यात सुतारवाडीत भोजनासाठी आलेल्या दिल्लीश्वरांसाठी दोन कोटीचा खर्च करण्यात आला आहे. या राज्यातील सरकारवर अदृश्य शक्तीचा दबाव आहे, त्याच्या मर्जीनेच येथे राजकारण समाजकारण आणि अगदी पत्रकारिता न्यायपालिका देखील चालावी असा आग्रह आहे. राज्यात सत्ता मिळविण्यासाठी भाजपसोबत गेलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिल्लीश्वरांना खूष करण्याची स्पर्धा पहायला मिळाली. कारण ज्या शिंदेच्या कार्यकाळात एकेकाळी त्यांच्याच ठाण्याचा भाग असलेल्या पालघरमध्ये ८० हजार कोटीचा बंदरविकास प्रकल्प साकारला जात आहे. त्यालाच जोडून त्याच जिल्ह्यात बुलेट ट्रेन(Bullet train), समृध्दी मार्गाचा विस्तार आणि नवे विमानतळ होत आहे. या निमित्ताने तेथील जागा जमिनींना अनन्य साधारण भाव येत आहे. आणि हे सारे प्रकल्पांच्या लाखो कोटींचे कामांचे कंत्राट, उपकंत्राट मिळविण्यासाठी आता सत्ताधारी पक्षासोबत असलेल्या नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. गुजरातच्या जवळच असलेल्या या कामांमध्ये गुजराती कंत्राटदारांचे भले होणारच आहे त्यात उपकंत्राटदार मिळविण्याचा आटापिटा राज्यातील नेते करत आहेत असे या सूत्रांनी सांगितले.
ज्या पक्षाच्या नावात नवनिर्माण आहे त्यांनाही अश्या प्रकारची कामे मिळण्याची अपेक्षा असणारच! राजकीय पक्षांना त्यांच्या विस्तारासाठी आगामी निवडणुकांसाठी पैसा याच कामांतून मिळणार आहे. त्यामुळे सध्या शिवसेना पक्षात जायची कुणाला आस असेल असे वाटत असेल तर त्याला कर्मदरिद्रीपणाच म्हणावे लागेल असे या सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे गणेश नाईक यांच्याकडे याच पालघरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे तर ठाण्यात देखील ते सपर्कमंत्री म्हणून लक्ष घालताना दिसत आहेत. तर कल्याण डोंबवलीचे रविंद्र चव्हाण सध्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून ताकदीने पक्षाची संघटना वाढविताना दिसत आहेत. मागील दोन महिन्यात त्यांनी राज्यातील किमान दोन डझन अन्य पक्षांचे प्रमुख नेते भाजपात जोडले आहेत. त्यामुळे २०२९ पूर्वीच सारे राज्य भाजपमय होण्याची रुपरेषा आखून सत्ताधारी भाजप काम करत आहे. त्यात बहिण भाऊ किंवा भाऊ-भाऊ एकत्र येणार सारख्या भावनिक मुद्यांना काहीच स्थान नसेल हे ही तितकेच खरे आहे. त्यामुळे भाबड्या जनतेला वेड्यात काढणारी स्वप्न दाखवायची आणि आपली राजकीय खेळी पुढे न्यायची हाच या साऱ्या सध्याच्या राजकारणाचा अर्थ आहे. अथ तो मर्म जिज्ञासा!
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
एका दृष्टी क्षेपात मार्मिक सद्य महाराष्ट्रातील राजकारणाची माहिती…खूप छान लेख आहे
सूत्राच्या कहाण्या चांगल्या मांडल्या आहेत…..