तीन तिगाडा काम बिगाडा… वर्षभर तरी तीन पायांची सर्कस फडणवीसांना करावी लागणार!?
मायबोली मराठी भाषेतल्या अनेक म्हणी वाक्प्रचार फारच वस्तुनिष्ठ वर्णन करणारे असतात. असे येथे म्हणायचे कारण लहानपणापासून कोणत्याही शुभ कामाला जायचे असेल तर ‘तिघे जण नको’ असे सांगितले जाते. कुणी म्हणेल काय राव? ज्या राज्यात अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा झाला त्या राज्यात हे सांगता म्हणजे काय? हे खरे असले तरी अजूनही बहुतांश लोकांचा हा समज गैरसमज किंवा काही म्हणा. हे आहे. तिघे असले की होणारे काम देखील होत नाही म्हणतात. असे का? तर ‘तीन तिघाडा काम बिघाडा!’ म्हणून मग तिघांना जाणे आवश्यकच असेल तर सोबत एक गोल गरगरीत गोटा खिशात घेतला जातो आणि तीन नाही तर चौघे झालो असे समजून जायचा ग्रामीण भागातील जुन्या लोकांचा रिवाज होता, आजही बरेच लोक अश्या गोष्टी मानतात आणि पाळतात देखील. असो.
विधानसभेचा निकाल भुताटकी झाल्यागत?
तर सध्या महाराष्ट्रात महायुतीचा भला बलदंड विजय झाला. ‘न भुतो न भविष्यती’ असे त्याचे वर्णन ‘गोदी मिडियाचे अँकर-टँकर असल्यासारखे तोंड भरभरून बडबड करत करताना दिसत आहेत.! पण खरेच सांगा महाराष्ट्रात जे गावोगाव जिंकले, त्यांचे कार्यकर्ते खरच या विजयाच्या सुखद धक्क्याने जल्लोष करताना दिसले का? काही ठिकाणी तर नेमके जिंकले कोण आणि हरले कोण? हेच समजेना अशी सुतकी कळा चेहऱ्यावर आणून लोकं वावरताना दिसत आहेत. याचे काय कारण असावे? अनेकांना हे निकाल भुताटकी झाल्यागत वाटत आहेत.
कारण माध्यमांशी महाआघाडीचे नेते आणि देशाच्या राजकारणातील भिष्माचार्य शरद पवार यांनी म्हटले आहे की, नेहमी महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर जिंकलेल्यांच्या गोटात उत्साहाचं वातावरण असते. पण यावेळी मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. उगीच आरोप करणे योग्य नाही. कारण माझ्याकडे पुरावा नाही. मात्र प्रत्येक राजकीय पक्षांना एकंदरीत मते किती पडली आणि लोक किती निवडून आले याची आकडेवारी काढली. तर काँग्रेसला राज्यात ८० लाख मते आहेत. आणि काँग्रेसचे १५ लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना ७९ लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. त्यांचे ५७ लोक निवडून आले. म्हणजे ८० लाखवाल्यांचे १५ आणि ७९ लाख वाल्यांचे ५७.? शरद पवार गटाचे ७२ लाख मते आहेत. आमचे उमेदवार निवडून आले १०. अजित पवार गटाचे ५८ लाख मते आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले ४१.? ७२ लाखांचे १० आणि ५८ लाखवाल्यांचे ४१. हे काही तरी गडबड आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. हे कोण सांगत आहेत? ज्यांनी स्वत: पन्नास वर्षापेक्षा जास्तकाळ सक्रियपणे निवडणूकांचे राजकारण अनुभवले, जगले आहे. ते देशाचे अव्वल ज्येष्ठ राजकारणी? म्हणजे हे निकाल भुताटकीचे नाहीत तर काय म्हणायचे? असो.
सत्तास्थापनेचा दावा नाही तरी ग्रँड शाही सोहळा?
अश्या पार्श्वभुमीवर हो-ना करता करता महायुतीच्या तीन नेत्यांचा सत्तास्थापनेचा सोपस्कार पार पडला. या सोहळ्यासाठी झाडून सारे बॉलीवूड, कॉर्पोरेट, संत-महंत, सामान्य जनता, लाडक्या बहिणी, विदेशी वकिलाती, उद्योगांच्या मुंबईतील कार्यालयांचे प्रमुख, अगदी राज्यमाता असलेल्या सवत्स गोमातेसह नवनियुक्त आमदारांचा कुटूंबकबिला, मित्रमंडळी, कार्यकर्ते, यांचा सुमारे पन्नास हजारापेक्षा जास्त समुदाय जमा झाला होता. हा इवेंट इतके मोठे आयोजन राजभबनात महायुतीच्या नेत्यांनी शपथविधीच्या सोहळ्याच्या आधी केवळ जेमतेम २४ तास आधी जावून दावा केल्यानंतरही झाले होते हे देखील अविश्वसनीय वाटावे असेच नाही का?
या भव्य दिव्य शपथग्रहण सोहळ्यासाठी मैदान आरक्षित करण्याचे तेथे इतके व्हिव्हिव्हीआयपी सुरक्षेसह अभ्यागंतांच्या खानपानापासून गाड्यांच्या पार्किंग आणि ये-जा करण्यापर्यंतचे नियोजन सत्तास्थापनेचा दावा न करताच झाले होते! हा काही शाही विवाह सोहळा नव्हता. राज्याच्या घटनात्मक प्रमुखांच्या मान्यतेची मोहर उमटविण्याचा गंभीर राजकीय प्रशासकीय कार्यक्रम होता. मात्र त्याचा यावेळचा थाट मात्र कोट्यावधी रूपये खर्च करून करण्यात आला होता. आणि कुठे? ज्या राज्याच्या तिजोरीवर आता संकट आल्याच्या चर्चा केल्या जात आहेत त्या राज्यात? जेथे पायाभूत सुविधांना, सामान्य शेतकरी, कामगारांना तुटपुंज्या मदतीसाठी निधी नसल्याचे सांगण्यात येते त्या राज्यात? पण गोदी माध्यमांतून यावर चकार शब्द लिहिला गेला नाही.
२०१९मध्ये आपणा सर्वाना आठवत असेल फडणवीस यांचा भल्या पहाटे अजीत पवारांच्यासोबत शपथविधी झाला होता, पण पळून जावून लग्न करणा-या वधुवरांचे जसे फटाफट घरच्यांना समजायच्या आत उरकले जाते तसे मंदीरात केलेल्या लग्नासारखे या शपथविधीच्या सोहळ्याचे झाले होते. तेंव्हा देखील सगळ्यांना त्या बातमीने धक्का दिला होता. पण यावेळी मात्र कदाचित इतका वेळ आपण चर्चा करत आहोत त्या सगळ्या कारणांमुळे, त्यावेळच्या आणि सध्याच्या सा-या कमतरतांची भरपाई करण्यासाठीच तर ही शाही तयारी केली असावी? असे तर नाही ना? असो.
जेंव्हा हा ५ डिसेंबरला या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. पंतप्रधान मोदी केवळ तासाभरात मुंबईत दाखल व्हायचे होते. त्यावेळेपर्यंत ज्या तीन पक्षांच्या मुख्य नेत्यांचा शपथविधी होता त्यातील एका पक्षाकडून फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा दिल्याचे पत्र सुध्दा देण्यात आले नव्हते म्हणे. दुपारी सव्वादोन नंतर धावत पळत एका शिवसेना उपनेत्याने ते राजभवनात जावून दिले त्यानंतर राज्यपालांच्या खुर्चीच्या बाजुला आणखी एक खुर्ची आयत्यावेळी लावण्यात येवून मावळत्या मुख्यमंत्र्याना ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून शपथ देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.! त्यामुळे शपथ तिघांची होताना दोघे सोबत बाजु बाजूला आणि एक दूर पाच सहा खुर्च्यांनंतर बसलेले दिसले म्हणे!
तीन पायांची सर्कस?
त्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आता सुरू झाले आहे, मात्र तीनही पक्षांच्या नेत्यांची, सदस्यांची एकत्र बैठक झाली नाही किंवा खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटण्याची चिन्ह नाहीत. ज्या पक्षांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे, त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यावे याचा देखील अधिकार नाही. जुन्या मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्याना घ्यायचे असेल तर त्यांच्या पूर्वीच्या कारभाराचे मुल्यांकन भाजप करणार असून त्यानंतर कुणाला वगळावे ते ठरविले जाणार आहे. अश्या प्रकारे ही सक्तीची भक्ती आहे म्हणे! महायुतीच्या भाजप पक्षामध्ये देखील ज्यांना पूर्वी पदे आणि जबाबदा-या दिल्या होत्या त्यांना बाजुला ठेवून पूर्णत: नवी टिम द्यावी असा सूर व्यक्त होत आहे. तर मंत्रिमंडळ बैठकीत या नवख्यांसमोर घटकपक्षांचे दिग्गज नेते असतील तेंव्हा त्यांचे सरकार कसे चालणार? असा प्रतिसवाल भाजपचे ज्येष्ठ लोक विचारत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये देखील बहुसंख्य नेते सत्तापिपासू झाल्याचे चित्र आहे! अशी जाणकारांची माहिती आहे. त्यामुळे विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्या झाल्या फडणवीस यांना पहिल्याच वक्तव्यात आनंद व्यक्त करता आला नाही, ते काय म्हणाले हे जरी समजून घेतले तरी त्यांच्यासाठी हे नवे सरकार म्हणजे ‘तीन पायांची सर्कस’ आहे हे सहजपणे आपल्या लक्षात येते. फडणवीस म्हणाले की, ‘आपल्या पक्षाला बहुमताच्या जवळची संख्या मिळाली आणि महायुती तर सव्वा दोनशे पार झाली त्यामुळे कुणाला फार काही मिळेल अशी आशा बाळगून वागू नका. सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे.’
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या काही महायुतीच्या आमदारांनी मग खाजगीत कुजबूज सुरू केली. शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी संयुक्त बैठकीत देखील हेच भाषण केले होते की, फडणवीस साहेबांनी!? मग पक्षात आपल्याला ‘अच्छे दिन’ येणार तरी कधी? अरे १०५ होते तेंव्हा देखील थांबा त्याग करा फार अपेक्षा नको असे सांगण्यात आले आता १३२ + १२ झाले शिवाय महायुतीचे २३५ झाले तरी हेच रडगाणे ऐकत पाच वर्ष काढायची काय? असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता.
पण गड्या गोष्ट तशीच आहे! फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाच वर्ष या गोष्टीसाठी त्यांना, उभ्या महाराष्ट्राला काय काय पापड लाटावे लागले आठवा! एव्हढे करून राज्याच्या मागची आव्हांनाची साडेसाती संपलेली नाही. राजकीय जावू द्या आर्थिक, सामाजिक, स्थिती भयानक आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक आव्हाने आहेत, नव्या विकासाच्या कामांची जंत्री मोठी आहे मात्र त्या तुलनेत पैसे नाहीत. शेतक-यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत प्रकल्पांसाठी स्थिती आणिबाणीची आहे. त्यात राजकीयदृष्ट्या खातेवाटपा पासून घोडे अडले असेल तर दररोजच्या कामकाजात देखील आता हा लपाछुपीचा लपंडाव होत राहणार आहे. समजले ना? सुरूवातीला का म्हटले आहे तीन तिघाडा काम बिघाडा? ही तीन पायांची सर्कस आता पाच वर्ष फडणवीस यांना चालवावी लागणार आहे. किमान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होईपर्यंत तरी त्यांना कुणाला दुखावता येणार नाही. हे माहिती असल्याने मग अजून त्यांची परिक्षा घेतली जाणार आहे. राजकीय साठमारीत महाराष्ट्राच्या जनतेकडे मात्र फडणवीस यांना लक्ष दयावे लागणार आहे कारण त्यांच्यासाठी देखील ही एका मोठ्या इनिंगची कठीण सुरूवात आहे! तुर्तास इतुकेच!