‘चोराच्या (आयोगाच्या) मनात चांदणे’ तर नाही ना? मग हे संशयकल्लोळ एकदा बॅलेट घेवून दूर करायलाच हवे!
सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांचा निकाल लागून पंधरवडा झाला तरी या निकालातील आकडेवारीचा घोळ कसा आहे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगी-तूरा सुरूच राहिला आहे. लोकांनी मतदान केले पण नेमके त्यानुसार निकाल का लागले नाहीत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील १४०० मतदान झालेल्या गावाने तपासून पहायचे ठरविले. त्यांनी स्वखर्चाने मतपत्रिका छापल्या आणि त्या नुसार फेरमतदान घेवून पहायचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करत तो हाणून पाडला. इतके करून सरकार थांबले नाही. त्यांनी हा प्रयत्न करणाऱ्या काही जणांना नोटीसा पाठवल्या तर काही जणांवर गुन्हे दाखल करून अटक देखील केली.
पोटनिवडणूक बॅलेटवर घ्यायला काय हरकत आहे?
त्यानंतर या गावाची देशभर चर्चा होवू लागली असून राहूल गांधी यांनी इवीएम विरोधी आंदोलनाची सुरूवात याच गावातून करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज या गावात भेट दिली. या गावचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर हे विजयी झाले आहेत. पण आपल्या निष्ठावंत गावातील मतदानाची परस्पर चोरी झाल्याचा शोध घेण्यासाठी आता त्यांनी आमदारकीची शपथ देखील न घेताच राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. अट फक्त एकच आहे, पुन्हा पोटनिवडणूक घेताना सरकारने ती बॅलेटवर घेवून पहावी. काय हरकत आहे? लोकांना त्यांचे मत कुठे जाते हे जाणून घ्यायचा अधिकार आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
पवार विरुध्द भाजप नेते? पण आयोग गप्प का?
या मुद्यावर कोल्हापूरमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी देत काही प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत ८० लाख मतं पडली तरी त्यांच्या १६ च जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मतं पडली काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मत पडली तरी त्यांच्या ५७ जागा आल्या यावर संशय व्यक्त करत शरद पवार यांनी आकडेवारीचा घोळ असल्याचा मुद्दा मांडला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला झालेल्या मतदानाची आकडेवारी देत प्रत्युत्तर दिलं आहे.
त्यानी एक्सवरून म्हटले आहे की, ‘श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला २०२४ लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं १,४९,१३,९१४ आणि जागा ९, पण काँग्रेसला मतं ९६,४१,८५६ आणि जागा १३. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मतं आणि ८ जागा.
२०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मतं होती आणि जागा ४ आल्या. ‘पराभव स्विकारला तर यातून लवकर बाहेर याल तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.’ असे फडणवीस म्हणाले.
पाच नंतर नेमके किती बूथवर मतदान झाले?
त्या नंतर आता मतांचे विभाजन कसे झाले आणि महाआघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे यांच्यातील मतांचा फरक पडला याचे दाखले दिले जात आहेत. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने यावर समोर येवून खुलासा द्यायला हवा तो निवडणूक आयोग मात्र यावर गपचूप बसला आहे. या आयोगाकडून फॉर्म-१७वर मशिन बंद करताना जे मतदान झाल्याचे आकडे देण्यात आले ते २३ तारखेला मतमोजणी पर्यत तीन वेळा वाढले कसे? यावर देखील अद्याप योग्य तो खुलासा झालेला नाही. सायंकाळी पाच नंतर नेमके किती बूथवर उशीरा पर्यंत मतदान झाले? आणि त्याचे कोणते चित्रीकरण, कोणती माहिती आहे? याचा खुलासा आयोग का करत नाही? त्यामुळे लोकांना त्यांचे मतदान जिथे दिले तिथे ते न जाता बोगस फुगवटा करून हाणून पाडण्यात आल्याचा संशय आहे. तो निकोप लोकशाहीसाठी दूर करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. पण आयोग बाजुला राहिला आणि फडणवीस समोर येवून का प्रतिवाद करताना दिसत आहेत? यात सरकारचा विषय कोणता आहे? की भाजपला आणि त्यांच्या नव्या सरकारला आपले पितळ तर बाहेर पडणार नाही ना? अशी भिती वाटली असल्याने ते हिरीरीने खुलाश्यांसाठी पुढे येताना दिसत आहेत.?
खुलासे भाजप,सरकारचे का? हा मुद्दा आयोगाचा!
अगदी मतदानापूर्वीच विरोधकांनी मतदार याद्यांमध्ये २०१९मध्ये जी मतदार संख्या होती ती लोकसभा २०२४मध्ये किती वाढली? आणि विधानसभेपर्यंत केवळ चार महिन्यात दोन पट कशी वाढली याचे देखील उत्तर आयोगाने दिले नाही. आजही आयोग त्यावर काही खुलेपणाने सांगायला का धजावत नाही. जे मतदार यांद्यामध्ये बोगस मतदार घुसविण्यात आले त्या व्यक्ती आता मतदानानंतर कुठे गेल्या आहेत ? हे समोर यायला हवे नाही का? या सगळ्या मुलभूत मुद्यावर आयोगाने समोर यायला हवे पण तसे न होता फडणवीस, अजीत पवार, बावनकुळे आणि आता माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळबोध त्याच त्याच खुलाशांना समोर करायचा प्रयत्न केला आहे. “लोकांचा कौल स्वीकारला पाहिजे. रडीचा डाव बंद केला पाहिजे. जनतेने कौल दिला आहे. पुन्हा गिरेंगे तो टांग उपर असा प्रकार आहे”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
तर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल.
देशभक्तांचा पक्ष भाजप आणि त्यांच्या, नेत्यांनी पुढाकार घ्यावा!
इतके खुलासे केले जात आहेत पण लोकांना त्यांच्या मनाचे समाधान करून घेण्यासाठी बॅलेटवर चाचपणी करून देण्यास भाजपच्या नेत्याना आक्षेप का आहे? त्याने तर काही त्यांच्या सत्तेचा निकाल बदलणार नाही? मग इतका आटापिटा कश्यासाठी सुरू आहे? हिंदी भाषेत म्हण आहे ‘चोर के दाढी मे तिनका’ किंवा मराठीत म्हणतात तसे ‘चोराच्या मनात चांदणे’ असा तर प्रकार नाही ना? हा संशयकल्लोळ सरकारने हिंमत करून बॅलेट होवू द्यायला हवे तेंव्हाच दूर होणार आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना तसे आवाहनच केले आहे. कारण प्रश्न ‘म्हातारी मेल्याचा नाही काळ सोकावता कामा नये’ असा हा प्रयत्न असायला हवा. या देशाला फार मुश्कीलीने स्वातंत्र्य आणि मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी देशभक्तांचा पक्ष भाजप आणि त्यांच्या सरकारने, नेत्यांनी सर्वात मोठा पुढाकार आता घ्यायलाच हवा नाही का?
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)