एकनाथी भागवत आणि हनुमान चालिसा झाले, आता राजकीय वाल्या आणि वाल्मिकी रामायण?
राजकारणाच्या साठमारीत सामान्यांचा श्वास गुदमरला!
महाराष्ट्रात पाशवी बहुमताचे सरकार सत्तेवर आले तरी अजूनही प्रत्यक्षात सरकारच्या कामाला सुरूवात होण्याची चिन्ह नाहीत. त्यातच राज्यात भारतीय जनता पक्षाचा गृहमंत्री, मुख्यमंत्री असताना रक्तरंजित राजकारणाची अष्टोप्रहर चर्चा आणि ब्रेकिंग न्यूज सुरू असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या गदारोळात शिल्लक राहिले आहेत की नाही असा प्रश्न पडावा अशी बिकट स्थिती झाली आहे.
महिनाभर होवूनही १८ मंत्र्याचा पदभार नाही?
राज्यात २३ नोव्हेंबरला महायुती सरकार प्रचंड बहुमताने आले खरे पण मंत्र्यांचा शपथविधी अधिवेशन खातेवाटप मंत्र्यांना दालने-बंगले देण्यात आले यात महिनाभरापेक्षा जास्त काळ निघून गेला आहे. तरी अजूनही १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसून हे मंत्री नव्या वर्षामध्येच पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे. अनेक नव्या मंत्र्याच्या नव्या दालनांची कामे मंत्रालयात जोरात सुरू असून मंत्र्याना नवे दालन तयार झाल्यावर त्यात प्रवेश करून कार्यभार हाती घेण्यास वेळ लागला आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. तसेच अनेक मंत्र्याचे मतदारसंघात सत्कार,सुरू असून ३१डिंसेंबर आपल्या कुटूंबासोबत साजरा करण्यासाठी अनेकजण बाहेरगावी जात आहेत. त्यामुळे नव्या वर्षात नवे मंत्री नवे दालन नवा कारभार सुरू होण्याची शक्यता आहे. पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यामध्ये दत्ता भरणे सहकुटुंब परदेशात गेले आहेत. तर दालनांचे काम सुरू असल्याने आशिष शेलार, अतुल सावे, नरहरी झिरवाळ, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दादा भूसे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, योगेश कदम, पंकज भोयर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ , आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर यांचा समावेश असल्याचे समजते.
पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षांत वाद?
दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली मात्र आता पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले. या विजयानंतरही तेथे मंत्रिमंडळ विस्तारासाठी १६ दिवस लागले. या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी प्रकरण शांत झाले असून, नव्याने पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षांत वाद सुरू झाला आहे.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे. पालकमंत्री पदावरून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे कोकणचे तीन जिल्हे, मराठवाड्यात संभाजीनगर, बीड, उत्तर महाराष्ट्रात नगर आणि नाशिक शहर आणि पश्चिम मह्राराष्ट्रात कोल्हापूर, पुणे या जिलह्यात वाद सुरू आहेत. रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे, तर गडचिरोलीत जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद आहे. संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे. बीडमध्ये भाऊ-बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. पुणे जिल्ह्यात अजीत पवार दत्ता भरणे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चुरस आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातही नितेश राणे, उदय सामंत यांच्यात तर पालघर – ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक गणेश नाईक यांच्यापैकी कुणाला पालकमंत्रीपद मिळणार यावर चर्चा सुरू आहेत. १८ जिल्ह्यात एकही मंत्री नसल्याने त्या जिल्ह्यात कुणाला हे पद मिळणार यावरही खल सुरू आहे. नवे सरकार आले तरी नाराजी आणि धुसफूस करणाऱ्या नेत्यांना शांत करण्यात सरकराचा महिनाभराचा काळ निघून गेला आहे.
राजकारणाच्या चिखलात कमळ जोमाने फुलले
बीड जिल्ह्यात तर राजकीय नेत्यांमध्ये अभूतपूर्व आरोप-प्रत्यारोपांची स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यात भर घालण्यासाठी गुणरत्न सदावर्ते, अंजली दमानिया, प्राजक्ता माळी अश्या अराजकीय व्यक्ती देखील रिंगणात उतरल्या आहेत. अहमहिका लागल्या प्रमाणे खून खंडणी बलात्कार अपहार भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून मागील पाच दहा वर्षात बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणाचा चिखल झाल्याने कमळही जोमाने फुलले आहे की काय? असा सवाल केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री बीडच्या आणि परभणीच्या अमानुष घटनांच्या पाहणीसाठी वीस दिवसांपासून जावू शकले नाहीत तर दुसरीकडे सर्वपक्षीत नेते रोज विशिष्ट पध्दतीने टारगेट सेट केल्यासारखे राजकीय आरोप करत सुटले आहेत. त्यात टिआरपी बेस मिडिया आणि सोशल मिडीयाला चविष्ट खाद्य मिळाले असून अमानुष घटना आणि बेबंदशाहीच्या चर्चा करताना कुणाला कशाचेच भान राहिले नसल्याचे दिसत आहे. या बेभान राजकीय वातावरणात सर्वसामान्य गरीब वंचित समाजाचे शिक्षण, रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या, आणि अन्य समस्यांचे प्रश्न संपले की काय असे वाटावे असे सारे जण राजकीय धुळवड खेळण्यात दंग झाले आहेत.
महायुतीचे सरकार बोगस? केवळ १०७ विजयी?
दुसरीकडे येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होण्याची चिन्ह दिसत असून विधानसभा निवडणूकीत १५० मतदारसंघात भाजप आणि महायुतीच्या गडबडघोटाळ्यामुळे १५० मतदारसंघाचे निकाल बदलण्यात आल्याचा गौप्यस्फोट आमदार उत्म जानकर यानी केला आहे. त्यांच्या मते अजीत पवारांसह अनेक दिग्गज नेते हरले असूनही महायुतीने निकाल सेट करून सत्ता हस्तगत केली असून येत्या चार महिन्यात या प्रकाराचा भांडाफोड करून हे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. जानकर यांच्या माहितीनुसार अजीत पवार यांचा बारामतीमध्ये २० हजार मतांनी पराभव झाला आहे. तर महायुतीच्या केवळ १०७ जागा विजयी झाल्या आहेत. या सा-या प्रकाराचा भांडाफोड लवकरच न्यायालयात केला जाईल असे सांगून त्यानी पुन्हा नव्याने निवडणूक घोटाळ्याकडे लक्ष वेधले आहे.
राजकीय वाल्या – वाल्मिकी रामायण आणि एकनाथी भागवत
राज्यात नवे सरकार आले मात्र हत्या, खून, खंडणी, अपहरण, बलात्कार यांच्या बातम्याचे जणू पेव फुटल्यासारखे वातावरण आहे. पुण्यात भाजप आमदाराच्या मामांचे अपहरण आणि खून होतो. त्यात पत्नीच आरोपी सापडते. तर बीडमध्ये दलित तरुणांच्या बचवासाठी गेलेल्या सरपंचाला अपहरण करून अमानुशपणे मारले जाते. हत्या करणारे फरार होतात. त्यांचे राजकीय लागेबांधे असल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू राहतात आणि कारवाई ठोसपणे होताना दिसत नाही. त्याचवेळी उरण मध्येही सरपंचावर हल्ला केला जातो. परभणीत पोलीसांच्या मारहाणीत तरूण वकीलीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू होतो. नाशिक, राजगुरूनगरमध्ये बलात्कार, खूनांचे सत्र सुरूच राहते. पोलीस यंत्रणा काय करते आहे? असा सवाल केला जात आहे. विरोधीपक्ष अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे आणि नव्या सरकारकडून काही न्यायाची अपेक्षा केली जात असताना माध्यमांतून मात्र ब्रेकिंग आणि टिआरपी पलिकडे फार काही जागृती केली जाताना दिसत नाही. समूह माध्यमांवरूनही चटपटीत बातम्यांचा रतिब घातला जात असून सब्सक्राबयर मिळविण्यासाठी फेक न्युज बिनदिक्कत चालविल्या जात आहेत. जणू कुणाची कुणी वाली नसल्या सारखी स्थिती आहे की काय? असे म्हणत राजकीय वाल्या आणि वाल्मिकी रामायण, एकनाथी भागवत आणि हनुमान चालिसाचे पाठ म्हटले जात आहेत. राजकीय साठमारीत महाराष्ट्राच्या सामान्याचा श्वास मात्र गुदमरतो आहे. तूर्तास एवढंच!
किशोर आपटे, मुंबई.
(लेखक व राजकीय विश्लेषक)