मंकी बात…

‘अरे कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा?’ जुनाच सवाल नव्याने!

अजूनही गाडी रूळावर येण्याची चिन्ह नाहीत

विधानसभा निवडणूकांचा महिनाभरापूर्वी निकाल लागला. त्यानंतर भवती न भवती, रुसवे-फुगवे, नाराजी, यामध्ये काही काळ गेला आणि  तीघांचे मंत्रिमंडळ झाले. त्यानंतर आमदारांचा शपथविधी, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वास दर्शक ठरावही सरकारने जिंकला. मग डिसेंबर महिन्यात नागपूरात सहा दिवसांत हिवाळी अधिवेशनाचा फार्स ठरला, त्याच्या आदल्या दिवशी ३९जणांना मंत्रिपदाची घाईने ३५ वर्षांनंतर प्रथमच नागपूरात शपथ देण्यात आली. मात्र त्यांना अधिवेशनभर बिनखात्याचे म्हणूनच सभागृहात बसावे लागले. पण अधिवेशन संपले आणु त्याच दिवशी सायंकाळी उशीरा नव्या मंत्र्याचे खातेवाटप जाहीर झाले. त्यानंतर मंत्र्याना मंत्रालयात दालने आणि मुंबईत बंगल्याचे वाटप झाले. पण ऐवढे करूनही अनेकांना अजूनही काही गोष्टीचा आनंद आणि समाधान काही लाभल्याचे दिसत नाही. नव्या सरकारच्या सत्तांतरानंतर राज्यात तीन-चार मोठ्या दुर्घटना झाल्या त्यात बरेच नागरीक मृत्यू पावले. बीडमध्ये अपहरण करून सरपंचाची हत्या झाली तर परभणीत पोलीसांच्या कस्टडीत वकीली शिकत असलेल्या कार्यकर्ता सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. मात्र सरकारच्या लेखी अजूनही गाडी रूळावर येण्याची चिन्ह दिसत नाहीत.

याचे कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर ज्या ज्येष्ठ आमदारांना वगळण्यात आले त्यांची अधिवेशनात उपस्थिती दिसलीच नाही. भाजपच्या अनेक सदस्यांनी दोन दिवस उपस्थिती लावली आणि ते आपल्या मतदारसंघात निघून गेले. इतकेच कश्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे मंत्री मुश्रीफ आणि आबीटकर तर शनिवारी सकाळी सभागृह सुरू असताना सकाळी साडे अकरा वाजताच कोल्हापूरच्या विमानतळावर पोचून कार्यकर्त्यांकडून स्वागत घेताना बातम्यांमध्ये दिसत होते.

राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचा बीडच्या सरपंच हत्याप्रकरणात संबंध असल्याचा घणाघाती आरोप सभागृहात बीडच्या सत्ताधारी आणि विरोधी बाजूच्या सदस्यांनी पाच सहा दिवस  सातत्याने केला. पण या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत सरकारने त्यात मोठ्या वल्गना आणि घोषणा करण्यापलिकडे काही केले नाही. त्याचवेळी धनंजय मुंडे शेवटच्या दिवशी सदनात आले तर त्यांच्या व्यावसाईक भागीदार वाल्मिकीचा वावर नागपूरातच होता अश्या बातम्या प्रसिध्द झाल्या. पण सरकारने यावर ठोस कारवाई केली नाहीच. याचे कारण वाल्मिकी हे मुंडे यांच्या मर्जीतले, मुंडे हे अजित पवारांच्या मर्जीतले, अजीत पवार सध्या फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठांच्या मर्जीतले असल्याचे सांगण्यात येत होते. ओबीसी समाजाच्या या नेत्यांना त्यामुळे अभय दिल्याचेही आरोप केले जावू लागले.

वेट अँण्ड वॉच म्हणजेच छगन कमळ बघ?

दुसरीकडे त्याच राष्ट्रवादीने ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून जाणिवपूर्वक बाजुला केल्याने ते नाराज होत अधिवेशन सोडून नाशिकला निघून गेले. भुजबळ यांच्या नाराजीच्या बातम्या रोज येत राहिल्या पण त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजीत पवार यांनी त्यावर भाष्य टाळले. मात्र अधिवेशन संपताच भुजबळ मुख्यमंत्र्याना भेटले, त्यांनी त्यांना ‘वेट अँण्ड वॉच’ सांगत ‘छगन कमळ बघ’ असा संदेश दिल्याची चर्चा आहे. आठ-दहा दिवसांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे स्वत: भुजबळांनी माध्यमांना सांगितले. तर मुख्यमंत्र्यानी भुजबळ यांना राज्यात शक्य झाले नाही तर राष्ट्रीय राजकारणात सामावून घेण्याचे संकेत दिले. गंमत म्हणजे भुजबळ नाराज आहेत म्हणून त्यांच्या पक्षांच्या अध्यक्षांना भेटलेच नाहीत ते भेटले फडणवीसांना!

महायुतीचा कारभार आठवडा बाजार

कॉंग्रेसचे प्रवक्ता अनंत गाडगीळ यांनी या सा-या प्रकारावर भाष्य करताना हे सरकार म्हणजे आठवडा बाजार झाल्याची टिपणी केली आहे.  त्यानी म्हटले आहे की. निवडणुकीचे निकाल लागून महिना झाला. सरकार बनवायला आठवडा लावला, मुख्यमंत्री निवडायला आठवडा, मंत्र्यांच्या शपथविधीला आठवडा, खातेवाटपाला आठवडा, मंत्र्यांना बंगले द्यायला आठवडा. आणी आता दर आठवड्याला वाढणारी आमदारांची नाराजी घालवायला किती आठवडे लागणार असा सवालही गाडगीळ यांनी केला आहे. यावरून महायुतीचा कारभार म्हणजे “आठवडा बाजार” असल्याचे सिद्ध होते अशी टिका कॅांग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली.

किंचीत राहिली फुणफूण

गंमत म्हणजे महायुतीच्या ३३ मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष  बावनकुळे यांना मंत्रालय विस्तार इमारतीतील पहिल्या मजल्यावर पाच खोल्यांचे एक दालन देण्यात आले. याच इमारतीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाचव्या मजल्यावरील जुने दालन व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांचे तिसऱ्या मंजल्यावरील दालने कायम ठेवण्यात आली आहेत. गिरीष महाजन, मंगलप्रभात लोढा यांची दालने ‘जैसे थे’ आहेत. शिवसेना शिंदे पक्षाच्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (सातवा मजला) गुलाबराव पाटील (चौथा मजला) संजय राठोड ( पहिला मजला) उदय सामंत ( पहिला मजला) यांची दालने कायम आहेत. याच मंत्रिमंडळातील नवीन मंत्री गणेश नाईक (पाचवा मजला), जयकुमार रावल (चौथा मजला), पंकजा मुंडे (चौथा मजला), अशोक उईके (पाचवा मजला), अॅड. आशीष शेलार (चौथा मजला), दत्तात्रय भरणे (तिसरा मजला), शिवेंद्रसिंह भोसले (सहावा मजला), अॅड. माणिकराव कोकाटे (दुसरा मजला), जयकुमार गोरे (मुख्य इमारतीत पोटमाळा), नरहरी झिरवाळ (दुसरा मजला), संजय सावकारे (तिसरा मजला), संजय शिरसाट (सातवा मजला), प्रताप सरनाईक (चौथा मजला), भरत गोगावले (तिसरा मजला), मकरंद पाटील (तिसरा मजला), नितेश राणे (मुख्य इमारतीत दोन क्रमांकाचा पोटमाळा), आकाश फुंडकर (विस्तार इमारतीत पहिला मजला), बाबासाहेब पाटील (पाचवा मजला), प्रकाश आबिटकर (विस्तार इमारतीत दुसरा मजला) यांना दालन वाटप करण्यात आलेली आहेत. तर सहा राज्यमंत्र्यापैकी मेघना बोर्डीकर, इंद्रनिल नाईक, योगेश कदम यांना विधानमंडळात पहिल्या मजल्यावर दालने देण्यात आली आहेत.

नशीबवान मंत्र्याना नशिबवान बंगले?

मंत्रालयात दालनांनतर मंत्र्यांच्या पसंतीचे बंगले त्यांना मिळाले नसल्याची तक्रार आहे. मलबार हिलच्या दाभोळकर मार्गावरील प्रशस्त आणि समुद्रकिनारी असलेल्या ‘रामटेक’ बंगल्यासाठी नेहमी ज्येष्ठ मंत्री आग्रही असायचे पण आता हा बंगला अपशकुनी मानला जातो. कारण या बंगल्यात वास्तव केलेल्या नासिकराव तिरपूडेंपासून, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिपक केसरकर अश्या दिग्गजांवर एकतर बालंट आले वा त्यांचे मंत्रीपद गेल्याचा इतिहास सांगितला जातो.  त्यामुळेहा बंगला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी वाटप झाल्याचा आदेश दुपारी निघाला पण नंतर सूत्रे हलली आणि ‘रामटेक’ निवासस्थान पंकजा मुंडे यांना देण्यात आले. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचे वास्तव्य याच बंगल्यात होते.

महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर मंत्रालयातील दालन व बंगले वाटप करण्यात आले. विश्वासात न घेता दालन, बंगले वाटप करण्यात आल्याने काही मंत्री नाराज आहेत. अनेक मंत्री वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा बघून दालन व बंगले घेत असतात. पण वाटपाचे थेट आदेश आल्याने मंत्री गडबडून गेले. मंत्रालयात सर्व मंत्र्यांना सामावून घेण्याएवढी दालने उपलब्ध नसल्याने तीन राज्यमंत्र्यांची कार्यालये विधान भवनात थाटण्यात आली आहेत. महायुती  सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आणि खातेवाटपाला विलंब लागला त्या तुलनेत मंत्र्यांची दालने व बंगल्यांचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने लवकर केले. पण हे वाटप होताच काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली तर काही जणांनी बंगले बदलून देण्याची मागणी केली. बहुतांशी जुन्या मंत्र्यांची दालने व बंगले कायम ठेवण्यात आले. मंत्र्यांच्या नाराजीनंतर काही जणांचे बंगले वा दालने बदलून दिले जाण्याची शक्यता आहे.

अजूनी रूसूनी आहे?

महत्वाचे म्हणजे अधिवेशनानंतर काही मंत्री लागलीच कामाला लागले तर काहीनी लगेच कार्यभार न स्विकारता गावाला जाणे पसंत केले. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साता-याच्या दरे गावी तीन दिवस मुक्कामी गेल्याने ‘अजूनी रूसून आहे’ या नाट्यगीताची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पण चर्चाना पूर्णविराम देत शिंदे यांनी महाबळेश्वर आणि सातारा नगरपरिषद नगरपालिकांच्या अधिका-यांच्या बैठका घेवून आपण कार्यमग्न असल्याचे दाखवून दिले आहे.

सत्तेची साठमारी

नागपूरच्या अधिवेशनात राजकीय दुकानदारी जिवंत ठेवण्यासाठी कश्या प्रकारें निचतेचा स्तर गाठला गेला आहे अशी खंत या सा-या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली  त्यांनी म्हटले आहे की बहुतेक सर्वच पक्षावर समाजद्रोही नीतिभ्रष्ट  जमातीने  भ्रष्टाचाराने व  सत्तेचा दुरुपयोग करून साऱ्या  संसाधनांवर ताबा मिळवला आहे, लुटारू  सनदी अधिकारी यांचा भागीदारीने त्यांनी सर्व वसुलीचे अवैध धंदे,दारूची दुकाने,मोफत जमिनी लाटणे,सरकारी अनुदानाच्या शाळा महाविद्यालये,सरकारी कंपन्यांचे पुरवडा  गॅस वितरण,सरकारी पुरवठा,सरकारी कंत्राटे ,सरकारी लूट करून आपली दुकाने थाटली असुन या लुटीमध्ये २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात उघडपणे वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती आहे असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

ऑगस्ट २०१४च्या सुरवातीलाच नव्याने केंद्रात सत्तेत आलेल्या तानशाह मंडळीने भाजपची दारे चोरांना उघडी करीत आपल्या सरकारी लूटीला आम्ही आहे तशीच सुरु ठेवणार मात्र आमच्या देश विकण्याचा एकसूत्री कार्यक्रमावर मौन ठेवावे अशी अट ठेवत प्रवेश देणे सुरु केले व भारतामध्ये सरकार लोकविरोधी निर्णयावर बोलणारा संघर्ष करणारा विपक्ष कमजोर होण्याची प्रक्रीया सुरु झाली व आज संधिसाधू लाचार पोटभरु आयाराम गयाराम नासलेल्या राजकीय  मंडळींची जमात निर्माण करण्यात नैतिकतेच्या राष्ट्र निर्माणाच्या गप्पा संस्काराचा जगातील ठेका घेतलेल्या या पाखंडी राज्यकर्त्यांना यश आले आहे याला संघ परिवाराची लाचारी महत्वाची आहे यावर संघ परिवारात चिंतन करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .

“पोटभरू व सत्ताभोगी ” राजकीय नेते

महाराष्ट्रात राजकीय विचारसरणी व तत्वे जपण्याची परंपरा होती मात्र ईडी सीबीआय निवडणूक आयोग न्यायालय यांचा बेकायदेशीर आणि अनयंत्रित बेलगाम वापर करून गुंडगिरीच्या भरोशावर राजकीय साम्राज्य निर्माण केलेल्या नेत्यांना  राजसत्ता व संसाधन लुटी मध्ये सहभागी करीत भाजपाने एक नवीन अनैतिकतेचा व चारित्र्यहीनतेचा नवा कळस गाठला. महाराष्ट्र हि संताची भूमी आहे या ठिकाणी  “पोटभरू व सत्ताभोगी “ राजकीय नेते यांचा नायनाट करण्यासाठी लोक जागरण मोहीम जशी  दक्षिण पुर्व आशियात सुरु झाली आहे भारतात सुद्धा युवा पिढी हातात घेणार व या देशद्रोही सतत सत्तेत राहल्यामुळे “पोटभरू व सत्ताभोगी “ झालेल्या  राजकीय जमातीला नष्ट करतील ,असा विश्वास किशोर तिवारी व्यक्त केला आहे. कोणे ऐके काळी ज्या भाजपनेच  ‘अरे कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा?’ असा सवाल आघाडी सरकारला केला होता आता तोच त्यांना विचारण्याची वेळ आली आहे.

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

किशोर-आपटे

 

मंकी बात…

Social Media

2 thoughts on “मंकी बात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *