मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही, १०४ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा त्रास होणार नाही, असा दावा पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेने केला होता. परंतु बुधवार ९ जून रोजी मुंबईत पावसाचे आगमन झाले आणि पावसाच्या पहिल्याच इनिंग मध्ये पालिकेचा दावा फोल ठरला. सायन, माटुंगा, घाटकोपर, सांताक्रूझ आदी परिसरात रस्ते पाण्याखाली गेले. तर रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्याने मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, पुढील तीन महिने पावसाच्या हलक्या सरी बरसताच मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागणार, असा टोला विरोधी पक्षनेते रविराजा यांनी लगावला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला असून मुंबईसह कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट जारी केले आहे.
मुंबईत अखेर पावसाचे आगमन झाले आणि उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र वरुणराजाच्या पहिल्याच एंट्रीत मुंबई महापालिका व सत्ताधारी शिवसेनेचे सगळे दावे वाहून गेल्याचे दिसून आले. मंगळवार रात्रीपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळी चांगलाच जोर धरला. सकाळपासून जोर धार सरी व सरी बरसल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाली. भायखळा, हिंदमाता, दादर, माटुंगा, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी सब वे, परिसरात गुडघाभर पाणी भरल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. तर मध्य रेल्वेच्या सायन, माटुंगा कुर्ला स्थानकांदरम्यान रुळावर पाणी भरल्याने मुलुंड – सीएसएमटी व हार्बर मार्गावरील वाशी – सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा बंद पडली होती. रात्री उशीरा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दोन्ही रेल्वे मार्गावरील लोकल सेवा हळुवार सुरु झाली. मुंबईतील अनेक भाग जलमय झाल्याने बेस्ट बसेची वाहतूक अन्य मार्गावरुन वळवण्यात आली होती. हिंदमाता, माटुंगा, सायन परिसरात पाणी तुंबल्याने बसेस वडाळा अण्टाॅप हिल मार्गे वळवल्या होत्या.
मुंबईत चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा पूर्व इशारा हवामान खात्याने दिला आहे. बुधवार पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी ११.४३ वाजता समुद्रभरतीला सुरुवात झाली. समुद्रात ४.१६ मिटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. तर सायंकाळी ५.३६ वाजता ओहोटी लागली. अतिवृष्टीच्या काळात जर समुद्रात मोठी भरती असेल आणि समुद्रात ४.५० मिटर उंचीच्या लाटा उसळणार असतील त्यावेळी बशीसारखा खोलगट आकार असलेल्या मुंबई शहरात सखल भागात पाणी साचते. शहरात पडणाऱ्या पावसाचे साचलेले पाणी आणि सांडपाणी ज्यावेळी समुद्राला भरती नसते. त्यावेळी समुद्रात ज्या ठिकाणी सोडले जाते. तेथील फ्लडगेट बंद करण्यात येतात. ज्यामुळे शहरातून समुद्रात सोडण्यात येणारे पाणी समुद्री लाटांच्या जोरामुळे फ्लड गेट मार्गे शहरात उलटया दिशेने शिरून पूरस्थिती निर्माण होऊ नये. म्हणून हे फ्लडगेट बंद करण्यात येतात .समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली नाही.
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली होती. एकाच दिवसात ९४४” मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला मोठी भरती होती व साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. फ्लड गेट बंद केल्याने शहरातील पाणी समुद्रात जात नव्हते. तसेच, अतिवृष्टी झाल्याने मोठया प्रमाणात पाणी साचल्याने आणि मिठी नदीसह इतर नद्यांना पूर आल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. आजच्या पावसाने या आठवणी ताज्या झाल्या आणि मुंबईकरांच्या छातीत धडकी भरली होती. दुपारी ५ नंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र रस्तावर भरलेल्या पाण्याचा निचरा बराच ओसरला नसल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. अर्ध्यावर अडकलेल्या प्रवाशांनी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत कसेबसे घर गाठले. यात मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.
मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा!
Review of the situation from the CM!
मुंबईला बुधवार सकाळपासून झोडपून काढणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. आजची सकाळ मुसळधार पाऊस घेऊन उगवली.मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली. मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत. जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले. कोरोनासह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, हे पाहण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.
मुंबईत पम्पिंग स्टेशन्स कार्यरत राहतील. साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे. तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस आणि इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांची पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट,पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश
CM visits emergency control room of municipality, directs drainage
मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षास आज दुपारी भेट देऊन मुंबई महानगरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासह निरनिराळ्या कार्यवाहीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी निर्देश दिले.
महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हिंदमाता येथे केली संयुक्त पाहणी
मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सकाळीच आपत्कालीन नियंत्रण कक्षास भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रारंभिक माहिती जाणून घेतली. यानंतर महापौर व आयुक्त यांनी हिंदमाता परिसरातील सखल भागामध्ये संयुक्त भेट देवून पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
पाणी भरणारच नाही, असा दावा कधी केलाच नाही – महापौर
मुंबईत पाणी भरणार नाही, असा दावा कधीच केला नाही. मात्र चार तासात निचरा झाला नाही, तर मात्र आरोप योग्य आहे, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. पावसाचे पाणी शहरात भरणारच नाही, असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस यामुळे पाणी भरणार,पुण्यातही पाणी तुंबले आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांतील पाण्याचा निचरा झाला आहे, असे त्या म्हणाल्या. मुंबईतील काही ठिकाणी त्यांनी भेट देउन पाहणी केली.त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
अजून ३० दिवस त्रास सहन करा – आयुक्त
हिंदमाता ते दादर पुर्व येथील स्वर्गिय प्रमोद महाजन उद्याना पर्यंत पर्जन्यवाहीनी टाकण्याचे काम पुर्ण होण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे.त्यानंतर हिंदमाता,परळ परीसराला पावसाळ्यात दिलासा मिळेल, असा दावा महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला. हिंदमाता,परळ परीसरात दरवर्षी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगर पालिका भुमिगत टाक्या बांधत आहे.परळ येथील संत झेविअर्स मैदान आणि दादर पुर्व येथील स्वर्गिय प्रमोद महाजन मैदानात या टाक्या बांधण्याचे काम सुरु असून पहिल्या टप्प्याचे काम पुढील दोन तीन दिवसात पुर्ण होणार होते.मात्र,या बांधकामालाही पावसाचा फटका बसला आहे.
मुंबईत प्रत्येक वर्षी मोठ्या पावसात किंग्ज सर्कल, माटुंगा, मानखुर्द, अंधेरी सबवे, कुर्ला, अँटॉप हिल, मालाड-दहिसर सबवे अशी अनेक ठिकाणे पाणी साचण्याचे प्रकार उद्भवत असतात. त्यामुळे, पालिकेने हिंदमातासारख्या ठिकाणी यंदा पाणी साचणार नाही, याची दक्षता घेतल्याचा पालिकेचा दावा अपेशी ठरला आहे. त्यात पालिकेने १०० टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई केल्याचेही वारंवार दावे केले. मात्र, नालेसफाईचे दावेदेखील पोकळ असल्याची टीका भाजप, काँग्रेसकडून सुरू होती. विरोधकांनी व्यक्त केलेल्या भीतीचा दाखला मुंबईतील पहिल्याच पावसात प्रत्यक्षात आल्याने मुंबईकरांमध्ये क्षोभ निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी हिंदमाता येथे सहा तास पाणी तुंबले!
याचवर्षी नव्हे तर गेल्यावर्षी हिंदमाता भागात सुमारे सहा तास पाणी तुंबल्याची आठवण स्थानिकांकडून सांगितली जाते. ही स्थिती यावर्षी उद्भवू नये म्हणून पालिकेने आखलेली योजना अद्याप पूर्ण झालेली नाही.
भाजपचा इशारा खरा ठरला! भालचंद्र शिरसाट
यंदाही हिंदमाता, मुंबई सेंट्रलमध्ये पाणी तुंबणार, असा इशारा भाजपने दिला होता. हिंदमातासाठी पालिकेने कोणतीही प्रक्रिया न राबविता, स्थायी समितीची परवानगी न घेता १५० कोटी रु. कार्यादेश देण्यात आले. हे काम ५० टक्के पूर्ण झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. मग, त्याच कामांसाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव कशासाठी असा प्रश्न भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला होता. हिंदमाता परिसर आणि मुंबई सेंट्रल परिसरासाठी होणारा ४१६ कोटींचा खर्च पाण्यात वाहून जाणार आहे. पाणी तुंबल्यानंतर त्याचे खापर सल्लागारांच्या माथी फोडण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट –
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार : बाळासाहेब थोरात