मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीचं विधानसभेशी कनेक्शन?; आदित्य ठाकरे यांचा आरोप 

मुंबई  : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक (Mumbai University Senate election)दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली.  रविवारी २२ सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून दोन दिवसांपूर्वी  जारी करण्यात आले.
त्यावर  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर(Eknath Shinde) निशाणा साधत टिका केली आहे. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिले नाहीत, असे  आदित्य ठाकरें  म्हणाले.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत सिनेट निवडणुका(Senate elections) लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांचे कौतुक केले. तसेच त्यांना आज तुमचा विजय झाला आहे, असेही सांगितले. यावेळी आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुका पुढे ढकलण्यावरुन मुंबई विद्यापीठाच्या(University of Mumbai) कुलगुरुंसह राज्य सरकारवरही टीका केली.
आमच्या सिनेटच्या सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर हसू आहे. एक वेगळाच आनंद आहे. कारण आज आमचा विजय निश्चित झालेला आहे. जेव्हा राज्यात भाजपचे सरकार असतं आणि आता मिंधेंची जी राजवट आहे, आज एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री या महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे डरपोक मुख्यमंत्री म्हणजे नावापुढे उपमुख्यमंत्री लावायला हवं, हे आता स्पष्ट झाले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“२०१० मध्ये आम्ही स्वतंत्र लढलो तेव्हा १० पैकी ८ सीट जिंकलो होतो. त्यानंतर २०१८ मध्ये १० पैकी १० जागा जिंकलो. खरंतर सिनेटची निवडणूक २०२३ ऑगस्ट मध्ये व्हायला हवी होती. पण ती तीनदा रद्द केली. दोन वेळा नोंदणी करायला लावली. हे झाल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सिनेट निवडणूक होईल, असे  न्यायालयांच्या निकालामुळेच ठरले. काल रात्री मुंबई विद्यापीठाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यात त्यांनी शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही निवडणूक स्थगित होत आहे, असे म्हटले होते. मुंबई विद्यापीठाला जर स्वत:च मनं, डोकं, हृदय आणि कुलगुरू असतील तर मग शासनाकडून पुढील आदेशाची वाट का पाहायची आहे? ही निवडणूक स्थगित का गेली?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
“सरकारच्या मनात प्रचंड भीती बसली आहे. विधानसभेच्या आधी कोणतीही निवडणूक घ्यायची नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे CM च्या आधी आता D लावावं लागेल. ते डरपोक आहेत. निवडणुकांना सामोरे जायचं नाही. गेले कित्येक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही ते हरतील, हे त्यांना माहिती आहे, त्यामुळेच ते निवडणुका घेत नाहीत”, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.
Social Media