मंकी बात…

पप्पू पास हो गया… किंवा नक्कीच मेरा देश बदल रहा है!

मित्र हो या लेखाचे शिर्षक वाचून कदाचित कुणाला राग संताप किंवा चिड येईल, पण गेल्या आठ वर्षात देशात जे वातावरण तयार केले गेले आहे, त्यामध्ये समोरच्याला आदराने वागवण्या, बोलण्याचे दिवस गेले असून अच्छे दिन आल्याने या अश्याच उपरोधिक टिपण्या करत विरोधकांना हिणवण्याचा नवा प्रघात सुरू आहे. त्याचाच हा परिणाम समजूया हवे तर ! किंवा मग भक्त अभक्तांच्या टोळ्यांना काय वाटेल? याचा विचार न करता आपले मत मांडूया. कारण अजूनही या देशात संविधान आहे, आणि संविधानाने दिलेला अभिव्यक्तीचा अधिकार देखील शाबूत आहे ना? बाबासाहेंबानी दिलेल्या राज्य घटनेतील उच्चार स्वातंत्र्याचा संकोच होत आहे मात्र अजून त्याला पूर्णविराम मिळायला वेळ आहे.!

तर असो. .  नमनाला घडाभर तेल न घालता विषयाला सुरूवात करूया, तर विषय असा आहे की, देशात बेरोजगारी, भूकमारी, आर्थिक मंदी आणि महागाई या समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. आंतर राष्ट्रीय जगातही ब-या अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. अमेरिका युक्रेन रशिया वादंगात आहे, चिनमध्ये कोरोना आणि आर्थिक तंगीच्या कारणाने विकास दर घसरला असून विदेशी गुंतवणूकदारानी काढता पाय घेतला आहे. तर ब्रिटेनसह युरोपमध्ये इंधनाच्या टंचाईने जनता बेहाल झाली असून येत्या दोन महिन्यात हिवाळ्यात त्याचे हाल बेहाल होणार आहेत. भारताच्या बाजुचे देश नेपाळ श्रीलंका पाकिस्तान बांगलादेशात देखील सामान्यत: दारिद्र्य दैन्य आणि टंचाईची स्थिती आहे. त्याचवेळी आपल्या देशाचा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे, मात्र सत्ताधारी पक्षाला मात्र यापेक्षा महत्वाचे पुन्हा सत्तेवर कसे येता येईल याच समस्येने ग्रासले असून जनतेच्या जागतिक संकटाच्या समाधानापेक्षा सत्तेवर कसे येता येईल याचे वेध लागले आहेत. तर विरोधकांना पुन्हा भाजपच येणार? या विचाराने वेड लागण्याची वेळ आली आहे. त्यांचा आकांत सुरू आहे की कसेही करून मोदीना रोखायला हवे आणि त्यासाठी काहीतरी करून एकजूटीने लढायला हवे.

देशात सर्वात जुना आणि प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे कॉंग्रेस (आय) या पक्षाचे माजी अध्यक्ष आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहूल गांधी यांनी २०१४ नंतर पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेंव्हापासून गेल्या साडेतीन वर्षात पक्षाला नवा अध्यक्ष नव्हता, आता लोकशाही पध्दतीने पक्षाने मल्लिकार्जून खर्गे यांच्या सारखा अनुभवी अध्यक्ष पक्षाने मतदानातून निवडला असून गांधी घराण्याच्या कक्षेतून बाहेर पडत कॉंग्रेस पक्षाने देशात सत्तेवर असलेल्या भाजपापेक्षा आपला पक्ष लोकशाही मुल्यांवर चालतो आहे हे सिध्द केले आहे. राहूल गांधीना पप्पू ठरविणा-यांना हा पहिला धक्का आहे. म्हणून ‘. . .  पास हो गया’ हे शिर्षक त्यासाठीच देताना आत्मचिंता करणा-यांना आत्मचिंतन करण्याची संधी द्यायला हवी!

नव्या अध्यक्षांनी पदभार घेतानाच सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणांवर प्रहार करण्याची प्रतिज्ञा केली आहे. नेमके याचवेळी कॉंग्रेस नेते राहूल गांधी(Rahul Gandhi) यांनी त्याना भाजप आणि संघीय प्रचारकांनी लावलेल्या ‘पप्पू’ या टिकात्मक उपाधीला पुसून टाकत भाजपच्या विचारधारेवर प्रहार करत आपण ‘पप्पू नसून देशाच्या सर्व संस्थावर कब्जा करणा-यांपासून देश वाचविण्यासाठी कठीणातील कठीण आव्हान पेलू शकतो’ हे सिध्द करण्याचा चंग बांधला आहे. ७ सप्टेंबर २०२२ पासून कन्याकुमारी ते काश्मिर अश्या साडेतीन हजार किलोमिटरच्या पदयात्रेला त्यांनी सुरूवात केली असून केरळ(Kerala), तामिळनाडू(Tamil Nadu), कर्नाटक(Karnataka) आंध्रप्रदेश (Andhra Pradesh)आणि तेलंगण (Telangana)अश्या राज्यातून यात्रा सात नोव्हे रोजी महाराष्ट्रात देगलूर येथे प्रवेश करणार आहे.

या यात्रेला दक्षिणेच्या चार राज्यात सामान्य जनतेचा जो पाठिंबा मिळाला तो पाहता सत्ताधा-यांची झोप नक्कीच खराब करणारी ही यात्रा आहे यात शंका नाही, अगदी निसर्गाच्या आव्हांनापासून, सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेची आव्हाने पार करत लोकांच्या मनात प्रेम, आदर, सन्मानाची भावना निर्माण करत राहूल गांधी आणि त्यांचे युवा सहकारी अगदी महिला भगिनी देखील सातत्याने ४८ दिवस हजारो किमी चालत आहेत हा देशाच्या इतिहासातील चमत्कारच म्हणायला हवा. दुर्दैवाने देशाचा चौथा स्तंभ म्हणवला जाणारी देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमे या अभूतपूर्व इतिहासाचा साक्षीदार होण्याच्या भाग्याला मुकली आहेत, आणि यात्रेचे नेमके चित्रण आणि वर्णन करण्यापासून दुरावली आहेत. कारण ही माध्यमे भांडवल शहांची गुलाम झाली आहेत. देशात सध्या अघोषित आणिबाणी आहे. ‘सत्य पाहू नका सत्य बोलू नका सत्य ऐकू नका, सत्य दाखवू नका’ असे यांना महात्मा गांधी यांची तीन माकडे सांगत आहेत असे शिकवले जात आहे. त्यामुळे सध्या ते देशालाही हेच सांगत आहेत. आणि त्यांनी हे ऐकले नाही तर त्यांच्या अभिव्यक्तीला थांबविण्यासाठी दंभ, दमन आणि दुर्व्यवहार करायलाही त्यांचे ‘आका’ मागेपुढे पहात नाहीत अश्या भयाकूल वातावरणात सध्या माध्यमे आहेत. त्यामुळे त्यांनी या जिवंत इतिहासाला नाकारण्याचा कोतेपणा केला आहे.

तरीही कितीही झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसे यात्रेवर टिका करण्यासाठी अश्लाघ्य असत्य आरोप आणि विटंबना करण्यासाठी माध्यमांतून सत्ताधारी टिका होत आहेत आणि त्याचा खुलासा करण्याच्या निमित्ताने यात्रेतील महत्वाच्या गोष्टी जनतेसमोर आपसूक येत असून त्यामुळे सामान्य जनतेचा अत्साह समूह माध्यमांच्या चित्रणातून समोर येत आहे. त्यातूनच हे समोर येत आहे की पप्पू म्हणवला जाणा-या माणसाच्या मनात किती खराखुरा भारतीय मनाचा नातू, मुलगा, नेता दडला आहे. ज्याला हळव्या अबोध मुलांच्या भावना कळतात, ज्याला अबालवृध्दांचे प्रेम मिळते, ज्याच्यात न घाबरता सातत्याने चालत रहात हजारो किमी जाण्याचे धैर्य आहे. जो ४८ दिवस तेच ते कपडे घालून दाढी न करता, पायाला फोड आले तरी हसतमुखाने देशाचा तिरंगा घेवून निघाला आहे. तो पप्पू नक्कीच नाही हे त्याने सिध्द केले आहे. त्याचा व्देष केला जात आहे, कारण तो म्हणतो आहे की, या देशातून नफरत आणि दुभंगाची निती संपवायची आहे. हा गांधीचा देश आहे आणि गोंडसेंच्या विचारांनी त्याचे भले होणार नाही. म्हणूनच तो कोसळत्या पावसांत भारावून भाषण करत राहतो आणि लोकही त्याचे विचार विचलीत न होता जोशपूर्णतेने ऐकून प्रतिसाद देत राहतात.

तो फेकू नाही, कारण हे काही भाड्याचे इवेंट नाहीत, पावसाला भाड्याने घेता येत नाही, रोज तीस किमी चार महिने चालणारे भाडोत्री मिळत नाहीत. सभेत येवून समर्थन देणारे मिळू शकतील कदाचित, मात्र धो धो पावसात नेत्यांच्या मुखातून निघणारे शब्द ऐकण्यासाठी कानाचे द्रोण करणारे भाड्याने आलेले नसतात. त्या यात्रेत तो सांगत असतो त्यांनी माझ्या आजीला मारले, वडिलांना संपविले आणि कदाचित ते मलाही दूर करतील पण हा देश. . . .  हा देश ते कधीच संपवू शकणार नाहीत.    कारण व्देषावर या देशाचा विकास होणार नाही, विवीधतेतून एकता हेच या देशाचे मूळ आहे. जात धर्म प्रांत भाषा अनेक आहेत मात्र हा देश, संविधान एक आहे. या देशाच्या तरूणांना रोजगार हवा आहे, त्यांच्यात प्रेम सदभाव आणि बंधुभाव आहे, त्याला व्देष नको आहे. त्याला विकास हवा आहे. त्याच्या येणा-या भविष्याला आकार हवा आहे. त्यासाठी देशाची संपत्ती गरीब मध्यम वर्गीयांच्या हाती राहिली पाहीजे. ती मुठभर पुंजीपतींच्या हाती दिली जात आहे. त्यामुळे देश नव्याने हुकूमशाही कडे जात असून जनता गुलामीकडे ढकलण्यात येत आहे. या स्थितीला आम्ही बदलू त्यासाठी सगळ्यांनी सोबत आले पाहिजे. म्हणून तो चालत आहे. चालत तो निघाला त्यावेळी त्याची थट्टा झाली, मग त्यांच्या यात्रेत सारे काही थाटामाटाचे आहे असे सांगून बुध्दिभेद करण्यात आला. मग त्याचे बूट टि शर्ट कशी महागडी आहेत म्हणून अपप्रचार करण्यात आला. त्यानंतर तो महिला मुलींशी कशी लगट करतो म्हणून अश्लाघ्यपणाचा आरोप करण्यात आला.

. . . . आणि त्याची यात्रा ४५ दिवसांची हजार किमी गेली त्यावेळी चक्क चमत्कार झाला! देशाच्या पंतप्रधानानी ७५ हजार तरूणांना सरकारी नोकरीच्या नियुक्तीपत्राचे वाटप करण्याचा जाहीर कार्यक्रम केला. हे कधी नेहरूंनी केले नव्हते की वाजपेयींना जमले नव्हते, कुठल्याही स्पर्धा मुलाखती न घेता थेट देशातील तरुणांना रोजगार तो देखील एका क्षणात ७५ हजारांना दयायला हवा ही त्याचीच पहिली मागणी पूर्ण केली जात होती.  जोरदारपणे ती मान्य करताना येत्या वर्षभरात अजून दहा लाख नोक-या देण्यात येण्याची घोषणा देशाच्या प्रमुखानी केल्याचे मुख्य प्रवाहाच्या माध्यमांवरून वाजत गाजत सांगितले जात आहे. ज्याला पप्पू म्हटले होते त्याच्या यात्रेच्या नाकदू-या काढून झाल्यानंतरही तो थांबत नाही म्हटल्यावर त्याच्या यात्रेतील पहिली मागणी सरकार नावाच्या सत्ताधारी यंत्रणेने मान्य केली याला काय बरे म्हणावे? त्याने सत्तेला झुकवले होते. म्हणूनच मग सत्ताधिशांच्या भाषेत शिर्षक द्यावे लागते, ‘पप्पू पास हो गया! नसेल आवडले तर त्याच न्यायाने म्हणूया  मग मेरा देश बदल रहा है. म्हणूया का? तेवढेच आत्मवंचनेत आत्मसमाधान शोधूया! हे ही नसे थोडके!

के शू भा ई!


सत्ताधाऱ्यांच्या कर्तव्यपथावर वल्गना, राहुल गांधीच्या पदयात्रेत देशाच्या वेदना!

Social Media