नागपूर : गेल्या तीन चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने थंडी ओसरली आहे. रात्रीच्या तापमानात मंगळवारी ३ अंशाने वाढ झाली व ते २१.४ अंशावर उसळले आहे, जे सरासरीपेक्षा तब्बल ७.८ अंशाने अधिक आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या अंगावरचे स्वेटर दूर झाले आहे. दिवसा पारा सरासरीत असल्याने थोड्या प्रमाणात गारव्याची जाणीव होत आहे.
दरम्यान ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानाने चांगलीच उसळली घेतली आहे. नागपूरशिवाय अकोल्यात सर्वाधिक २२ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूरचा पारा सर्वात कमी १७ अंशावर आहे. गोंदिया, वर्धा, बुलढाणा, वाशिम २० अंशांच्यावर आणि अमरावती, भंडारा १९ अंशावर आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणाची ही स्थिती पुढचे तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण राहून वाढलेले तापमान कायम राहील, असा अंदाज आहे. ७ डिसेंबरनंतर ढगांची गर्दी हटून पुन्हा थंडीचा तडाखा वाढेल, अशी शक्यता आहे.
फेंगल चक्रीवादळ पुडूचेरीमध्ये शांत झाले असताना कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो मंगळवारी मध्य अरब सागरात सरकला आहे. यासोबतच तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन पुढच्या दोन दिवसात मध्य पूर्व अरबी समुद्रात तयार होण्याचा अंदाज आहे. या प्रभावाने विदर्भासह महाराष्ट्रात पुन्हा तीन दिवस ढगाळ वातावरण राहून उसळलेले तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.