विविध समाजाने निर्माण केलेल्या वस्तूंचे नागपूर निर्यात केंद्र बनावे : ना. नितीन गडकरी

गठई कामगारांना स्टॉलकरिता अस्थायी जागांचे परवाने वाटप : महापौरांचा पुढाकार

नागपूर : चर्मकार समाजबांधव जसे जोडे-चपला बनवितात तसेच विविध समाजाचे निरनिराळे उद्योग आहेत. या पारंपरिक उद्योगांना आता आधुनिकतेची जोड द्यावी. उत्तम वस्तू निर्मितीचे नागपूर केंद्र बनावे आणि येथून जगात सर्वत्र वस्तू निर्यात व्हाव्यात. स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त नागपूरसोबतच हे शहर आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे, त्या दृष्टीने आता प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गठई कामगारांच्या स्टॉलकरिता ३६ कामगारांना अस्थायी जागांचे परवाना पत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. मंचावर उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, आज परिस्थिती बदलली आहे. मार्केट बदलले आहे. कुठलाही समाज जो पारंपरिक व्यवसाय करतो, त्यांनी स्वत:त आणि मार्केटच्या दृष्टीने व्यवसायात बदल घडविणे आवश्यक आहे. आधुनिकतेची जोड देऊन नवे उत्पादन बाजारात आणणे आवश्यक आहे. चर्मकार समाजातील काही होतकरू, हुशार कामगारांना आपल्या मंत्रालयांतर्गत सुरू असलेल्या केंद्रात विशेष प्रशिक्षण देऊ. भविष्यात नागपूर हे जोडे-चपला जगात पुरवठा करणारे केंद्र बनायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. कचऱ्यातून वैभव तयार करण्याकरिता अनेक प्रकल्प आपण सुरू करीत आहोत, केले आहेत, हे सांगताना ना. गडकरी यांनी स्वयंपाकघरातून निघणाऱ्या शिळ्या अन्नाचा वापर घरून त्याचे खतात रूपांतर करून घरीच कसा भाजीपाला सेंद्रीय पद्धतीने तयार करता येतो, हे सांगत एका मुलाखतीतील ज्येष्ठ कलावंत अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा प्रसंग सांगितला. नागपूरला स्वच्छ, सुंदर नागपूर करण्यासोबतच प्रदुषणमुक्त नागपूर करण्याच्या दिशेने कार्य करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. नागपूर महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी यापुढे इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वाहनांचा वापर करावा. मनपाच्या आवारात सीएनजी स्टेशन तयार करण्याची सूचना केली. यावेळी त्यांनी नाग नदी प्रकल्प, ई-रिक्षा, फुटाळा तलावाचा होणारा कायापालट, अजनी स्टेशनवर भविष्यात करण्यात येणारा बांबूंचा उपयोग याबद्दल माहिती दिली. गठई कामगारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ना. गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे अभिनंदन केले.

तत्पूर्वी ना. नितीन गडकरी, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह सर्व मान्यवरांनी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. प्रास्ताविकातून चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे यांनी गठई कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे लढ्याची माहिती देत कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. संचालन उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी केले.

गठई कामगारांसाठी मनपात विशेष कक्ष : महापौर दयाशंकर तिवारी
समाजातील प्रत्येक घटकाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास आपण प्राधान्य देत आहोत. गठई कामगारांचा प्रश्न गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित होता. तो नऊ दिवसात सोडविण्याचा संकल्प केला. अधिकाऱ्यांच्या मदतीने आज ३७ गठई कामगारांना परवाना पत्र देण्यात येत आहे, याचा अतीव आनंद होत असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. गठई कामगार मेहनती आहे. त्यांना आपले काम सोडून केवळ कार्यालयात चकरा माराव्या लागू नये यासाठी मनपातील स्थावर विभागात त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आल्याचे यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. यापुढे कुठलाही प्रश्न असल्यास तो सोडविण्यासाठी सरळ आपल्याला संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उर्वरीत कामगारांना पुढील टप्प्यात परवाने
सर्व गठई कामगारांना संत रविदास आश्रय योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदान देऊन स्टॉल बांधून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मनपाला एकूण १३३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १०६ अर्ज मंजूर करण्यात आले. यापूर्वी ३५ जणांना स्टॉल वाटप झालेले आहेत. २८ जानेवारीपर्यंत ६३ मागणीपत्र प्राप्त झाले. त्यापैकी ३६ जणांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. या लोकांना आज अस्थायी जागांचे परवाने वाटप करण्यात आले. इतरांची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून पुढील टप्प्यात त्यांना परवाने वाटप करण्यात येणार आहेत.

Tag-Nagpur should become an export hub for goods produced by various communities/Nitin Gadkari

Social Media