नागपूरः नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत मंत्री अतुल सावे (Atul Save)यांनी आज विधानभवन येथील दालनात चर्चा केली.
यावेळी भोई समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशीही मागणी करण्यात आली.
आंबेडकरवादी संघर्ष समितीच्यावतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या. महिला आर्थिक विकास महामंडळातून महिलांना कामावरून वगळण्यात आले असून त्यांना सेवानिवृत्ती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ग्राम विद्दूत व्यवस्थापक तांत्रिक संघटनेच्यावतीने वेतन, सुविधा मिळाण्यासाठी निवदेन देण्यात आले.
आदिवासी बिंझवार, झंझवार समाज एकच असून त्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्याची मागणी या संघटनेच्यावतीने करण्यात आली.
माणुसकी सुरक्षा रक्षक सेनेच्यावतीने नागपूर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आरोग्य विभाग कामगार-कर्मचारी संघाच्यावतीने सार्वजनिक आरोग्य सेवेतील बीएस्सी नर्सिंग अहर्ताधारक परिचारिकांना १७ वर्षांपासून रखडलेली पाठ्यनिर्देशिका पदोन्नती मिळण्याची मागणी करण्यात आली.
२४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या ७८ महाविद्यालयांच्या अनुदानासाठी शासन स्तरावर पाचव्यांदा तपासणी झाली असून त्याचा अहवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे आहे. त्यावर मंत्रिमंडळाने निर्णय घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्यावतीने करण्यात आली.
वरिल सर्व निवदेनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असे श्री. सावे यांनी सांगितले.