संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर(Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे(Makarand Anaspure) यांच्या ‘नाम’ फाउंडेशन(‘नाम’ फाउंडेशन) संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. या सर्व कामांचा आढावा घेत संस्थेचा ९ वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.
या वर्धापन दिनाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गणेश चंदनशिवे आणि सहकाऱ्यांच्या ‘गण’ व ‘गोंधळा’ ने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले तर उदय सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाम संस्थेचे विश्वस्त आणि सीएसआर (CSR) च्या माध्यमातून मदत करणाऱ्या प्रतिनिधींचा यावेळी कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद : उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस
सिर्फ ‘नाम’ ही काफी हे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या कार्याचे कौतुक यावेळी केले. नेतृत्व सक्षम असेल तर समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवता येते, हे ‘ नाम’ ने दाखवून दिले. आपल्या ग्लॅमरचा योग्य तो उपयोग करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करत लोकचळवळ उभारण्याचं काम नाना आणि मकरंद या दोन अवलियानी केलं. या चळवळीने आज अनेेक कामाच्या रूपाने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. दुःख आत्मसात करून जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याचं काम आणि आत्मविश्वास ‘नाम’ ने आपल्या कामातून निर्माण केला आहे. विधायक कामाचा वसा अव्याहत सुरु राहावा यासाठी शासन म्हणून सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी यावेळेस दिली.
“महाराष्ट्र राज्यात ‘नाम’(Nam) संस्थने जलसंधारणाच्या क्षेत्रात खूप उत्तम काम केलं आहे. त्यांचं हे काम आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. नानांनी दिल्लीला येणं गरजेचं असून सर्व ते सहकार्य करण्याची तयारी आहे” अशा शब्दात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर.पाटील यांनी नानांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी २५ लाखाचा निधी त्यांनी ‘नाम’ संस्थेला दिला.
याप्रसंगी बोलताना ना.उदय सामंत म्हणले की, “सामाजिक काम करणारे कलाकार म्हणून मला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विकास प्रामाणिकपणे कामं करणारी ‘नाम फाउंडेशन’ संस्था आम्हा प्रत्येकासाठी आदर्श आहे. ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहिल्याने माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याला नवी ऊर्जा मिळू शकते; या विश्वासाने मी आज इकडे उपस्थित आहे. मार्केटिंग न करता विधायक काम करता येते हे ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने दाखवून दिले आहे. माझ्या राजकीय वाटचालीत ही गोष्ट शिकण्यासारखी आहे असं मला वाटते. व्हिजिलन्स म्हणून नाना ज्याप्रकारे काम करतात ते खरचं कौतुकास्पद आहे. मी नामचा सदस्य आहे हे तुम्ही समजून घ्यावं. ९ व्या वर्धापनदिनाप्रमाणे नामचा ९० वा वर्धापनदिन ही साजरा व्हावा” अशा शुभेच्छा उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.
आम्ही हा जो वसा घेतला आहे त्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी असल्याचे अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले. हे न संपणार कार्य असून सगळ्यांना बरॊबर घेऊन हा वसा सुरु ठेवण्याची जबादारी नव्या पिढीच्या नेतृत्वाने सक्षमपणे सांभाळावी. यासाठी आमचे आशीर्वाद कायम सोबत असतील असा विश्वास ही नानांनी यावेळी नामला सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळींना दिला.