नमन माझे गुरुराया…

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:| गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।।
आज भगवान वेद व्यासांचे नामस्मरण करून त्यांच्या पूजनाचा पवित्र दिवस असून या दिवशीच आपल्या सद्गुरूंचे पूजन करण्याचा प्रघात आहे.
नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे। फुल्लार विंदायतपत्रनेत्र:।
येन त्वया भारत तैलपूर्ण:। प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप:।।
अध्यात्म साधनेची वाटचाल करणार्‍या साधकांचा हा पर्वणीचा दिवस. संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबांच्या भाषेत ‘शुद्धस्वरूपी त्रिगुणातीत आत्मरूप उदार कृपेचा अखंड वर्षाव करणार्‍या’ सद्गुरुंचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा.
आपले सद्गुरु हेच आपले सच्चिदानंद सद्गुरु आहेत. सद्गुरूंचे नेमकेपणाने वर्णन करणे अशक्य आहे.
पुष्पदंत नावाच्या शिवभक्ताने शिवमहिम्नस्तोत्र लिहिले असून ते भगवान शिवाच्या महात्म्यासंबंधी म्हणतात,
असितगिरी समस्यात कज्वलम सिंधुपात्रे। सुर तरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी।
लिखती यदिगृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपितव गुणांनां मीश पारं न याती।।
हीच बाब सद्गुरूंच्या बाबतीत प्रत्ययास येते.
देणे, सांभाळणे हे त्यांचे कार्य असते. सूर्य ज्याप्रमाणे स्वतः जळत अवघ्या ब्रम्हांडाला प्रकाश देतो, याची त्याला जाणीव नसते. कारण प्रकाश देणे हा त्याचा स्वभाव धर्म असतो. तसेच सद्गुरु असतात. गुरूंच्या बाह्यरूपापेक्षा, अंतःस्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे. सद्गुरू कृपे शिवाय स्वबोधाची जाणीव होत नाही.
सद्गुरू हे भोळ्या भक्तांची काळजी घेतात. ते म्हणतात, तुझा भाव शुद्ध आहे ना, मग तू “रुपा” चे ध्यान कर. तुझा भाव शुद्ध असेल तर डोळे मिटल्या बरोबर डोळ्यांसमोर गुरु प्रगट होतात. जशी वासना असेल, दृष्टी असेल तसे प्रगटीकरण होत असते. भाव तिथे देव ही संतांची वाणी.
मनातील “भया”ची सगळी भावनाच ज्यांच्या प्राप्तीने लोप पावते, त्या गुरूंना नमन.
जे आम्हाला आमच्या “स्व”त्वाची खरी ओळख करून देतात त्या गुरूंना नमन.
ज्यांच्या मधुर वाणीने आपण आत्मानंदात मग्न होऊन जातो, त्या गुरूंना नमन.
ज्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते, त्या गुरुंना नमन.
जे कुबेराचा अनमोल, अक्षय्य खजिनाच आहेत त्या, गुरुंना नमन.
जे प्राप्त झाले की काही मागण्याची इच्छाच उरत नाही, अशा गुरुंना नमन.
जे वर्णनातीत आहेत अशा, गुरुंना नमन.
ज्यांचे चरणी नि:सीम भाव ठेवला असता देवाची प्राप्ती होते अशा, सद्गुरुंना नमन असो.
गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सदगुरुंमध्ये आपले सदगुरु आपण बघतो.
“कोण तुजविण सांग मज गुरुराया, कैवारी सदया। गुरुराया..।
आजच्या या गुरूपौर्णिमेच्या दिवशी सर्वांच्या हृद्यस्त सद्गुरुना शीर साष्टांग नमस्कार.

 

श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा. ९४२३३८३९६६ / ७०३८८३९७६२
Email: devima9762@gmail.com

Social Media