लवकरच शेतमजुरांसाठी मंडळ स्थापन करण्याचे अजित पवार, नाना पटोले यांचे रिपाइंला आश्वासन!

मुंबई :  शेतीप्रधान देशात शेतावर राबणाऱ्या शेतमजुरांसाठी कोणतेही महामंडळ अस्तित्वात नाही. पण आता लवकरच शेतमजुरांसाठीही शेतमजूर मंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार यासाठी सकारात्मक विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट) पक्षाने याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली होती.

राज्यातील हमालांच्या उन्नतीसाठी माथाडी महामंडळ आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांकरिता मजूर सहकारी संस्था कार्यरत आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघाटीत कामगारांसाठी सुद्धा नोंदणी करण्याची तरतूद आहे. पण शेतावर राबणाऱ्या भूमिहीन आणि शेतमजुरांकरिता कोणतेही मंडळ नाही. त्यामुळे ज्या शेतमजुरांवर शेती टिकून आहे. देशाचे पोट भरले जाते. त्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने एखादे स्वतंत्र मंडळ निर्माण करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) च्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाधान नावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुस्ताक मलिक, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष बनसोडे, राष्ट्रीय सचिव संजय कांबळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरभाऊ सोनावणे, मुंबई युवा अध्यक्ष भास्कर खरात, युवा नेते निरंजन लगाडे, या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.

शेतमजूर मंडळाची मागणी रास्त असून हे मंडळ, कामगार विभाग, कृषी विभाग अथवा महसूल विभागा अशा नेमके कोणत्या खात्यात बसते त्याची माहिती घेऊन मंडळ स्थापन करण्याबाबत विचार केला जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हे अधिवेशन दोन दिवसाचे आहे. मात्र मागणी चांगली आहे. मी नक्कीच मार्ग काढेन. या मागणीसाठी नावकर यांनी कार्यकर्त्यां समावेत राज्यपालांची देखील भेट घेतली. त्यांनीही मागणीचे कौतुक करीत याबाबत राज्य सरकारला कळवू असे आश्वासन दिले अशी माहिती अध्यक्ष समाधान नावकर यांनी दिली.

Social Media