मुंबई : ‘केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच ‘महाराष्ट्र इन्फार्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर(Ajay Asher) नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने(Shinde-Fadnavis government) करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशरसारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी आधी राजीनामा द्यावा’, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २) जाहीर केली. आशर हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक असून मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आशर यांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. याच मुदयावरून बंडखोर सरकारचा पटोले यांनी समाचार घेतला.
नाना पटोले म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नगर विकास विभागाचे निर्णय घेणारा अजय आशर नावाचा व्यक्ती कोण? असा सवाल विचारला होता. देवेंद्र फडणवीस त्यावेळी विरोधी पक्षनेते होते व त्यांचाही असाच आक्षेप होता. आता त्याच लुटारु व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री शिंदेंनी निती आयोगासारख्या महत्वपूर्ण संस्थेत कॅबिनेट दर्जाच्या उपाध्यक्षपदी कशी करू शकतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजय आशर यांच्या नियुक्तीला सहमती आहे का? तसेच कर्नाटकला महाराष्ट्रातील काही गावे देण्याचा घाट घातला जात आहे, उद्योग गुजरातला जात आहेत तसेच राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय घेतला आहे का? याचे उत्तर शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिले पाहिजे.
अजय आशर या व्यक्तीबद्दल भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आक्षेप घेतला होता. मग आता भाजपाचे मनपरिवर्तन झाले आहे का? काल ज्या व्यक्तीवर आक्षेप घेतला त्याच व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणे कितपत योग्य आहे? या नियुक्तीमागे भाजपाचाही काही स्वार्थ आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा या महत्वाच्या पदावर एका लुटारूची नियुक्ती करण्यास तीव्र विरोध आहे. वेळ पडल्यास हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाजही उठवू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.