विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा, निवडणूकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू
राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव काढला.
नागपूर, दि. : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण(Yashwantrao Chavan) व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र(Maharashtra) घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र(Maharashtra) गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. निवडणुकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू. महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाभ्रष्ट युती सरकारने मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढला आहे. अदानीला महत्वाच्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या जात आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचाच लिलाव सुरु केला आहे. भाजपा सरकारने दिल्लीतील लाल किल्लाही त्यांच्या बगलबच्च्यांना देऊन टाकला आहे. फक्त शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव या भ्रष्ट सरकारने काढला आहे, महाराष्ट्राची लूट सुरु आहे असे नाना पटोले(Nana Patole) म्हणाले.
हिंडनबर्ग अहवाल(Hindenburg Report) व सेबी प्रमुखांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले(Nana Patole) म्हणाले की, मध्यमवर्गातील लोकही मागील काही वर्षांपासून मोठ्या संख्येने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत, पण त्यांचा पैसाही सुरक्षित राहिलेला नाही. सेबीचे अध्यक्ष, अदानी व त्यांच्यामागे पंतप्रधान अशा प्रकारचे चित्र दिसत आहे. ही भ्रष्ट यंत्रणा केंद्र सरकारने निर्माण केली आहे, म्हणून राहुल गांधी यांनी अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर नरेंद्र मोदी(Narendra Modi) देऊ शकले नाहीत. सुप्रीम कोर्टानेही सेबीच्या(Sebi) प्रमुखाला, तुम्ही काय झोपले होते का? असा प्रश्न केला होता पण सेबीच्या प्रमुखच यात सामिल आहेत, याचाच अर्थ भ्रष्टाचाराची पाळंमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसपास फिरत आहेत असे पहायला मिळत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.