शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा!: नसीम खान

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह नेते व कार्यकर्ते २५ जानेवारीच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार

मुंबई : केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर लादलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना व स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत २३ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजीत केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. २५ तारखेला आझाद मैदान येथून राजभवनवर काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चमध्येही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते व माजी मंत्री नसीम खान यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, मोदी सरकारने शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचा विडा उचलला असून शेतक-यांना भांडवलदारांच्या हातचे गुलाम बनवण्याचे काम या कृषी कायद्याच्या माध्यमातून केले आहे. या काळ्या कायद्यांना काँग्रेस पक्षाचा पहिल्यापासूनच विरोध राहिला आहे. संसदेतही राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेस खासदारांनी या कायद्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत देशभर काँग्रेसने आंदोलने केली आहेत. महाराष्ट्रातही विविध आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने या काळ्या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत आहे. केंद्र सरकारचे जुलमी कायदे महाविकास आघाडी सरकार राज्यात लागू करणार नाही.

दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आंदोलन केले जात आहे त्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून काँग्रेस नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील असेही नसीम खान म्हणाले.

Tag-Congress supports farmers’ movement/Naseem Khan

Social Media