ठाकरे गटाची स्थगितीची मागणी उच्चन्यायालयाने फेटाळली!
मुंबई : पाच वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषद राज्यपाल नियुक्त आमदारांची झटपट नियुक्ती करत १२ पैकी ७ जणांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी १२ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे(Dr. Neelam Gorhe) या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.
राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुतीकडून राजकीय खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी महायुतीचा फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला होता. यानुसार भाजप ३, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी २-२ जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना आमदारकीची संधी देण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्यापूर्वी सर्व आमदारांचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासोबत फोटो सेशन पार पडले. यावेळी शिंदे गटाचे नेते माजी खासदार हेमंत पाटील यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. यानंतर शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. यानंतर सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर आणि अजित पवार गटाने नेते इद्रिस नायकवडी यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर भाजप नेते आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी शपथ घेतली. यानंतर वाशिममधील पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांचा राज्यपाल नियुक्त आमदारपदी शपथविधी सोहळा पार पडला.
चित्रा वाघ (भाजप) विक्रांत पाटील (भाजप) बाबूसिंग महाराज राठोड (भाजप) मनीषा कायंदे (शिंदे गट) हेमंत पाटील (शिंदे गट) पंकज भुजबळ (अजित पवार गट) इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)
राज्यपाल नियुक्त सात आमदारांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याविरुद्ध ठाकरे गटाकडून सकाळी साडेदहा वाजता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली ठाकरे गटाच्या वतीने अॅडव्होकेट सिद्धार्थ मेहता सकाळी साडेदहा वाजता याचिका तातडीने सुनावणी साठी घेण्याची विनंती करत शपथग्रहण कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी केली मात्र न्यायालयांकडून ती फेटाळण्यात आली.