मुंबई (किशोर आपटे) : सत्ताधारी महायुतीमधील भाजपचे उत्तर मुंबई(North Mumbai) लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल(Minister Piyush Goyal) सुरक्षीत निवडणूक म्हणून प्रथमतः मैदानात उतरले आहेत. मात्र विरोधीपक्ष महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा सुटल्यास जिंकण्याची शक्यता असलेल्या सक्षम उमेदवार या निकषावर दिवंगत शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यानाच उमेदवारी देण्याचा विचार करण्यात येत आहे.त्यामुळे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला दुहेरी सहानुभूतिपूर्ण वातावरण आणि गुजराती विरुद्ध मराठी अस्मिता अशी मोठी राजकीय खेळी खेळण्याची संधी आहे.
नुकतीच हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकर(Abhishek Ghosalkar) यांच्या पत्नी तेजस्वीनी घोसाळकर(Tejaswini Ghosalkar ) यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस तपास योग्य पध्दतीने करत नसून गृह मंत्री फडणवीस (Fadnavis)यांना सवाल केले आहेत. कुणाला तरी वाचविण्यासाठी पोलीस तपासात दबाव असल्याचा आरोपही त्यानी केला आहे. त्यामुळे भाजपविरोधी संतापाचा राजकीय फायदाही शिवसेनेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकर या निष्ठावंताला विधानसभा उमेदवारी नक्की समजली जात होती. मात्र त्यांच्या आकस्मित मृत्यूनंतर पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह चालू असतानाच शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या लाईव हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. घोसाळकर यांना कुणी गोळ्या घातल्या आणि मारेकरी म्हटला जाणारा मॉरीस याचे चित्रीकरण समोर का आले नाही? यावरुन या प्रकरणात तिसरा व्यक्ती कोण? अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस निघाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.
घोसाळकर यांचा चांगला जनसंपर्क होता. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांना मतदारांची सहानुभूती मिळू शकते. शिवसेना तोडल्यानंतर पहिल्यांदा होणा-या या निवडणूकीत शिवसैनिकांची मोठी सहानुभूतिपूर्ण लाट या भागात आहेच त्यात घोसाळकर कुटूंबातील अन्यायाची चिड आहे त्यामुळे तेजस्वीनी घोसाळकर यांचा दणदणित विजय होऊ शकतो.
त्यातच भाजपने गोपाळ शेट्टी याना उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षात नाराजीचा सुर आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येविषयी प्रतिक्रिया देताना गाडीखाली श्वान मेला तरी आता गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यानी येथील मतदारांमध्ये असलेली चिड संतापाच्या लाटेत बदल ली आहे. त्यातच पियुष गोयल यानी व्टिट करत महाराष्टात गुजराती माणंस म्हणत आपल्या गुजराती मतदाराना चुचकारले आहे. पण या विधानामुळेही मराठी आणि उत्तर भारतीय मतदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. तेजस्वीनी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यास या सा-या मुद्दांवर भाजपाविरोधात प्रचार करता येऊ शकतो. तसेच तेजस्वीनी घोसाळकर यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपाकडे काहीच मुद्दे नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे तेजस्वीनी घोसाळकर यांच्यासाठी आघाडीत तिकीट देण्यासाठी आग्रही आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुजराती मराठी (Gujarati Marathi)अस्मितेच्या या लढतीला महत्त्व येणार आहे.