मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. भाजप केवळ संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच फोडाफोडी काय असते, हे भाजपला दाखवून देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी नवाब मलिक यांनी म्हटले की, सहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले बरेसचे लोक या निवडणुकीआधी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची इच्छा व्यक्त करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याची त्यांची इच्छा आहे. पक्षाने अद्यापपर्यंत त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मात्र, अलीकडच्या काळात ज्याप्रकारे भाजप संभ्रम निर्माण करत असल्याने या नेत्यांची घरवापसी करुन दाखवणे गरजेचे असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.
त्यामुळे आता आगामी काळात राष्ट्रवादीकडून यासंदर्भात ठोस निर्णय घेतला जाईल. येत्या काही दिवसांत या नेत्यांची घरवापसी सुरु होईल. भाजपचे लोक सातत्याने संभ्रम निर्माण करत असल्याने लोकांना सत्य परिस्थिती कळाली पाहिजे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. भाजपला जर फोडाफोडीचे राजकारण करायची इच्छा असेल, तर कशी फोडाफोडी होईल हे महाराष्ट्रात दाखवण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. याशिवाय, काही काँग्रेसचे लोकही घरवापसीसाठी तयार आहेत. हे मिशन बिगीन अगेन महाराष्ट्रात सुरू करावे लागेल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असे सर्व भागातील हे आमदार आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
सहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे कशाप्रकारे खच्चीकरण करण्यात आले हे लोकांना पाहिले आहे. अगदी वर्षभरापूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनाही हाच अनुभव आला. तिकडे सन्मान, स्वाभिमान नाही. त्यामुळे परत पक्षात आले पाहिजे असे त्यांना वाटते. काही लोक सत्तेसाठी तर काही दबावाखाली गेले होते. काहींच्या इतर अडचणी होत्या. महाराष्ट्रात पन्नास ते साठ आमदारांनी राजीनामा दिल्याशिवाय सत्ता परिवर्तन होणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशसारखी परिस्थिती येथे नाही. अडचणीच्या काळात आमच्याबरोबर राहिलेले आमदार आता पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही यावेळी नवाब मलिक यांनी व्यक्त केला.