मुंबई : महाराष्ट्रातील शेकडो संस्था, संघटनांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महाराष्ट्र सोशल फोरमच्या वतीने १९ ते २२ ऑगस्ट असे चार दिवस सध्याच्या काळात भेडसावणाऱ्या कळीच्या प्रश्नावर ऑनलाइन चर्चा संवाद होणार आहे. या कार्यक्रमाचा आरंभ १९ ऑगस्टला देशाची सद्यःस्थिती आणि त्यावरील उपाय या चर्चासत्राने होईल. त्यात गायक संगीतकार टी. एम . कृष्णा, प्रा. सोनलिहाजा मिन्झ, प्रा. झोया हसन आणि डॉ. सुखदेव थोरात हे विचार मांडतील. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम पाहता येईल. २० ऑगस्टला दुपारी १ते ४ या वेळेत राज्यातील सर्व जिल्यातील प्रश्नांवर चर्चा होईल आणि ठराव महाराष्ट्रापुढे मांडण्यात येतील. त्याबद्दल मिनार पिंपळे, मनीषा गुप्ते, अविनाश पाटील, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन, अंजली आंबेडकर हे विश्लेषण करतील.
२१ ऑगस्टला दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत समाजातील कळीच्या प्रश्नांवर चर्चा होईल. त्यात महिला आणि नव्या युगातील संघर्ष या विषयावर मनस्विनी लता रवींद्र, अरुणा सबाणे, निशा शिवूरकर, प्रज्ञा दया पवार, वर्षा देशपांडे यांचे विचार ऐकायला मिळतील. आदिवासी, भटके विमुक्त आणि उपेक्षितांची आंदोलनं याविषयी सुरेखा दळवी, वाहरु सोनवणे, धनाजी गुरव, लक्ष्मण माने, मंगेश भारसाखळे आणि अजित शिंदे हे बोलतील. श्रमिक आंदोलनावर एम ए पाटील, डी ऐल कराड , विश्वास उटगी, पौर्णिमा चिकरमाने आणि संजय सिंघवी उहापोह करतील. देश आणि महाराष्ट्रासमोरील आर्थिक आव्हानावर शेतकरी नेते राजू शेट्टी, भालचंद्र कांगो, अशोक ढवळे, संजीव चांदोरकर, सुशिलाताई मोराळे आणि कामगार नेते शशांक राव संवाद साधतील. बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादाचं आव्हान या आजच्या ज्वलंत प्रश्नावर निखिल वागळे, डॉल्फि डिसोझा, हसीना खान, राहुल कोसंबी आणि रवी आंबेकर चर्चा करणार आहेत.
२२ ऑगस्टला समारोपाच्या कार्यक्रमात ख्यातनाम टीव्ही पत्रकार रवीशकुमार महाराष्ट्राशी संवाद साधतील. यावेळी डॉ. बाबा आढाव यांचा एक हजार संस्था संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात येईल. कपिल पाटील बाबा आढाव यांच्याविषयी यावेळी बोलतील तर लोकशाहीर संभाजी भगत संविधान सुरक्षा गीत सादर करतील. बाबा आढाव सत्कारानिमित्त मनोगत व्यक्त करतील. आणि शेवटी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी हे पुढचा अजेंडा मांडतील. राज्यभरातील एक हजाराहून जास्त संस्था संघटना, श्रमिक, मजूर संघटना आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा या उपक्रमात सहभाग आहे, राष्ट्र सेवा दलाच्या युट्युब चॅनल वर राज्यातील आणि देशातील सर्वांना हा कार्यक्रम पाहता येईल, अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी दिली आहे.