माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान : नाना पटोले

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाने विख्यात कायदेतज्ञ आपल्यातून निघून गेले असून राज्यातील पुरोगामी विचारांच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना पटोले म्हणाले की, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पी. बी. सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावरही ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. पुरोगामी चळवळीमध्ये ते सक्रीय होते. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यघटनेची मुल्ये आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. केंद्रातील विद्यमान सत्ताधारी लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवून कारभार करताना सावंत संविधान आणि लोकशाहीच्या मुल्यांच्या रक्षणासाठी लढत होते. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सावंत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे पटोले म्हणाले.

Social Media