मुंबई : डोळ्यांत तेल घालून देशाचं रक्षण करणारे बहाद्दर सैनिक सणासुदीला आपल्या कुटुंबियांपासून लांब असतात. अशा देशाच्या सीमेवरील सर्व सैनिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करत ‘एक राखी सैनिकांसाठी-सीमेवरच्या भावासाठी’ हा अभिनव उपक्रम राबवून अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ(Padma Shri Dr. Sindhutai Morning) यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण या आश्रमातील अनाथ मुलींनी सीमेवरील सैनिकांसाठी एक हजार राख्या पाठविल्या आहेत. एवढच नव्हे तर देशातील आमच्या तमाम सैनिक बांधवांना सुरक्षित आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे, अशी ईश्वरचरणी सामूहिक प्रार्थना केली.
आपले घर, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यापासून दूर राहून सैनिक आपले कर्तव्य बजावत असतात. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, उद्देशाने अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेरणेतून ममता बाल सदन कुंभारवळण या संस्थेतील अनाथ मुलींनी ‘एक राखी सैनिकांसाठी-सीमेवरच्या भावासाठी’ हा उपक्रम राबविला. मुलींनी आपल्या सैनिक भावाला शुभेच्छा पत्र आणि रक्षाबंधन विषयाचे महत्त्व रेखाटणाऱ्या अतिशय सुंदर आणि आकर्षक चित्र साकारली आहेत. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून मुलींनाही मिळेल, असे संस्थेचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड यांनी सांगितले.
सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. मुलींनी स्वतः शुभेच्छा पत्र लिहून चित्र साकारल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळाली. त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याचीही जोपासना होईल, असा विश्वास ममता बाल सदन कुंभारवळणचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानामुळे आपण व आपले राष्ट्र सुरक्षित आहे अश्या शूरवीर भारतीय सैनिकांबद्दल समाजामध्ये आदर निर्माण व्हावा आणि विध्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी, म्हणून ममता बाल सदनने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याच बरोबर सैनिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. अनाथ आश्रमातील सिंधुताईंच्या लेकींनी पाठवलेल्या एक हजार राख्यांनी सैनिकांचे आत्मबल वाढेल, अशी भावना ममता बाल सदनच्या अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली आहे.
सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत
रक्षाबंधन हे आता बहिण-भावापुरते मर्यादित न राहता, रक्षणकर्त्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेले आहे. निसर्गाशीही रक्षाबंधनाचे नाते जोडले गेले आहे. अशावेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोचवणे म्हणजे सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
‘मला भाऊ मिळाला’ चिमुकल्यांची भावना
सैनिकांविषयी आपणास नेमके काय वाटते हे मुलींनी चार ओळीत शब्दबद्ध केले. कुटुंबापासून दूर राहत देशसेवा करणाऱ्या अनामिक सैनिकांना सलाम करण्यासाठी माझी राखी.. असे सांगत सैनिक हो, ‘तुम्ही आता अनाम नसून आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात” अशा शब्दात मुलींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपल्या भावना तिरंगा, सैनिक, अमर ज्योत अशा चित्रातून व्यक्त केल्या. ‘मला भाऊ नसल्याने दरवर्षी राखी कोणाला पाठवायची हा प्रश्न होता. पण देशाचे रक्षण करणारे सैनिक माझे बांधव आहेत. आता मला भाऊ मिळाला आता मी माझ्या सैनिक भावाला दरवर्षी राखी पाठवणार अशी भावना मुलींनी पत्रात व्यक्त केली आहे.