कोविड महामारी आणि ऑनलाईन जमान्याच्या आधी दर शुक्रवारी महत्वाच्या सिनेमा थेटरात म्हणजेच ज्याला ‘बॉक्स ऑफिस’ म्हणायचे, तेथे नव नवे सिनेमे लागायचे. या सप्ताहात कोणते नवे सिनेमे पडद्यावर झळकणार किंवा झळकले त्याच्या समीक्षा मग मुद्रीत माध्यमांतून चवीने वाचल्या (चावल्या नव्हे बरे!) जायच्या! तर त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर किंवा पडद्यावर सध्या काय सीन आहे? किंवा कोणते नवे राजकीय शो झळकले किंवा झळकणार आहेत याचा वृत्तांत पहायचा झाला तर तो कसा असेल?
म्हणजे मविआची सत्ता येणार का? आमचा भाबडा सवाल झटकून पठ्ठ्या म्हणाला, कायतरीच राव! मविआ चा साहेबांचा अनुभव चांगला राहिला नाही, पुन्हा मविआपेक्षा वेगळा मार्ग त्यांनी आता आखला आहे. लोकांना वाटले की, पक्षात पुन्हा फूट पडणार. पण पक्षात काय झाले? ते कसे, कुणामुळे झाले? याचे रोगनिदान झाले आहे. औषध फवारणी सुरू आहे. आता दोन महिन्यात बघा मोप पिक हाती येणार आहे! स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात तरूण महिला आणि सामान्य कार्यकर्त्याना संधी दिली जाणार आहे. त्यातून नव्याने पक्षाची रचना केली जाणार आहे. असे हा कार्यकर्ता म्हणाला. हे सगळे ठिक हो पण नवा मार्ग कोणता? विस्कटून सांगा की, पठ्ठ्याने आमच्याकडे दयाळू नजरेने पहात म्हटले, समजून घ्या की, राज्यत सत्ता दादांची, आमदार जास्त त्यांच्याकडे, केंद्रात सत्ता ताईंची खासदार संख्या जास्त त्यांच्याकडे! जमले की नाही. पण विषय असा की हे सगळ करायचे कसे? एकत्र येवून की वेगळे राहूनच. असा गोंधळ आहे. पण साहेबांनी मते जाणून घेतली आणि म्हणाले विधानसभेत संघाच्या लोकांनी किती छान काम केले पहा, आपल्यालाही कँडरबेस काम जमायला हवे, संघटनेत काय फेरबदल करायचे ते आता करू आठ दिवस वाट पहा असे शेवटी प्रांताध्यक्ष म्हणाले. आता साहेब, निर्णय घेतील तेंव्हा समजेलच ना? कार्यकर्त्याना विश्वास, नेत्यांना आत्मविश्वास, सभा बरखास्त!
नवा दांडू नवी विटी नवा डावची तयारी सुरू?
मध्य मुंबईच्या जुन्या महापौर निवासात स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहाणीसाठी मातोश्रीवरच्या साहेबांनी दादर गाठले. त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे(Adityathackeray) देखील होते. स्मारकाच्या पहाणीनंतर नेते पत्रकारांना सामोरे गेले. पत्रकारांना कामाची माहिती दिली स्मारकाच्या भुमीपूजनाला आपणच मुख्यमंत्री होतो. आता उदघाटनाला जे कुणी पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील ते येतील! कहानी मे व्टिस्ट! माध्यमांना खाद्य मिळाले. त्यानंतर दुस-याच दिवशी शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊतांनी(SanjayRaut) महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा नारा दिला. तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यासह महापालिका आयुक्तांची देखील भेट घेतली आणि मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा केली. माध्यमांच्या सूत्रांचे फोन पुन्हा सुरू झाले! सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात विरोधीपक्ष नेता नाही, मंत्रिमंडळात एक जागा खाली आहे, तर विधानसभेत उपाध्यक्षपद देखील रिक्त आहे. पण नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार शपथविधी झाला तरी ब-याच मंत्र्यानी पदभार घेण्यास उशीर केला, त्यांच्या कार्यालयात आस्थापनेत कर्मचारी अद्याप नाहीत, कार्यालयात लोकांचे टपाल घ्यायला, शिक्का मारून द्यायला माणसे नाहीत, की मंत्र्याला चहा आणायला शिपाई नाही. राज्याचे दुस-या फळीतले अनेक जण दिल्लीत जावून वरिष्ठांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. हे काय सुरू आहे? कुणी म्हणे, जणू ‘पुन्हा येईनचा हट्ट’ पुरवल्यानंतर ‘नवा दांडू नवी विटी नवा डावची तयारी सुरू’ आहे की काय? सेटअप चेंज होणार म्हणे? वरपासून खालपर्यंत परिवर्तन होणार की काय? असे सवाल विचारले जात आहेत. कुणी म्हणे, यंदा संघाच्या शतकमहोत्सवाचे वर्ष आहे. तर कुणी म्हणे मोदींजींच्या वयाच्या हिरक महोत्सवाचे ७५च्या वाढदिवसांचे वर्ष आहे. तर मग? नव्याने काही घडामोडी होण्याची शक्यता आहे. ते काय? सूत्रांकडून उत्तर आले. थांबा आणि वाट पहा!
राष्ट्रीय शक्तींनी एकत्र येण्याची गरज!
रा स्व संघाचे वरिष्ठ नेते विलास फडणवीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपूरमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. भाषण करताना त्यांनी राजकीय वक्तव्य करताना सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.“महाराष्ट्रातील निवडणुकीत आम्ही आरएसएसची विचारधारा मानणाऱ्यांना विनंती केली होती की, अराजकतावादी शक्तींविरोधात राष्ट्रीय शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. संघ परिवारातील विविध क्षेत्रातील लोकांनी अराजकतेविरोधात लढण्यासाठी आपपाल्या क्षेत्रात भूमिका बजावली” असे फडणवीस म्हणाले.
नुकतच शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या भव्य यशाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच कौतुक केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “शरद पवार हे चाणक्य आहेत. त्यांना लक्षात आलं असेल की, लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सेट केलेलं फेक नरेटिव विधानसभा निवडणुकीत कसं पंचर झालं. राष्ट्रीय स्वय़ंसेवक संघ ही राजकारण करणारी नाही, तर राष्ट्र निर्माण करणारी शक्ती आहे, हे शरद पवार यांना समजलं असेल. आपल्या स्पर्धकाच सुद्धा कौतुक करावं लागतं. म्हणून त्यांनी संघाच्या कामाचं कौतुक केलं असावं” असे फडणवीस म्हणाले.
शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष जवळ येण्यासंबंधी किंवा एकत्र येण्याच्या शक्यतेवरही फडणवीस बोलले.“२०१९ नंतर तुम्ही माझी वक्तव्य ऐकली असतील. २०१९ ते २०२४ मध्ये ज्या घटना घडल्या, त्यावरुन मला एक गोष्ट समजली की, राजकारणात काहीच अशक्य नाही. कुठलीही गोष्ट होणार नाही, असं मानून कधी चालू नये. काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिथे जाऊ शकतात, अजित पवार इथे येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा तुम्ही ठामपणे बोलता, असं होणार नाही, त्यावेळी राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही” असे फडणवीस म्हणाले. आणखीही बरेच काही फडणवीस बोलले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव यांच्यात मित्र कोण असे विचारल्यावर ते म्हणाले की उध्दव आधी होते आता राज आहेत पण उध्दव काही शत्रू नव्हेत! असे ते म्हणाले.
सारे काही पहावे साक्षीभूत होवून जावे
या सा-या वास्तवातील ‘दृश्यम’ मधून सामान्यांसाठी कोणता संदेश आहे? पक्ष, तत्व, विचारसरणी, कोणाचे काय चूक? काय बरोबर? यावर आपण काथ्याकूट करत बसू नये. त्यातून आपल्या परिघातील लोकांना दुखावून त्यांच्याशी दूरावा धरून काही उपयोग नाही. सिंहासनच्या दिगंबर टिपणीस सारखी आपली अवस्था करून घेण्यापेक्षा सारे काही पहावे साक्षीभूत होवून जावे. त्याचा भार वाहू नये! कुठेही जा पळसाला पाने तीनच! सारे एकाच माळेचे मणी!