पत्नीवियोगावर याहून आर्त कोणी लिहू शकेल असं वाटत नाही… किती संयमित शब्द आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. आकांडतांडव नाही. पत्नीवियोगानंतर कवी अनिल(Poet Anil) यांनी ही काळजाचा ठाव घेणारी कविता लिहीली.
खरं तर(in fact) मला हे कुमार गंधर्वानी(Kumar Gandharva) गायलेल एक सुंदर गाणं म्हणून ठाऊक होतं. पुढे या गाण्याच्या लेखनाची पार्श्वभूमी समजली आणि खरोखर ही कविता पुन्हा जेव्हा वाचली तेव्हा मी अक्षरशः हेलावून गेलो.
कवी अनिल (Poet Anil)म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे(Atmaram Raoji Deshpande), यांचं कुसुमावती(Kusumavati) नावाच्या मुलीवर प्रेम होतं. परंतु याला त्यांच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता! तब्बल ९ वर्षांच्या संघर्षातून अखेर त्यांचं प्रेम सफल झालं… आणि त्याचं सुंदर सहजीवन सुरु झालं. कुसुमावतीबाईही लेखिका. असेच एकदा कुठल्याश्या कार्यक्रमाला अनिल गेले होते. यायला उशीर झाला… घराचं दार खूप वाजवलं पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही… अनिलाना वाटले नेहमीसारखी आपली प्रिया रुसून बसली आहे. रात्रभर अनिल बाहेरच… पण नंतर काळजात काही लखलखलं आणि दरवाजा तोडून आत गेल्यावर लक्षात आलं… त्यांची जीवनसंगीनी चिरनिद्रेत गेली होती; जिच्या सोबतीने आयुष्य काढायची शपथ वाहिली होती… तिचा निष्प्राण, निस्तेज, निश्चल देह बघणं नशिबी आलं होतं… अनिल पूर्ण कोसळून गेले. ९ वर्षाच्या घोर तपश्चर्येचे फळ असे उणंपुरं सहजीवन… तेव्हा अनिलांच्या लेखणीतून शब्द झरझरले…
काळजाचा ठाव घेणारी कविता
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना!
आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केले. जिचा चाळीसएक वर्षे सहवास लाभला. ती निघून गेलीय. तिचा निष्प्राण देह शेजारी आहे. तिच्या त्या म्लान चेहऱ्याकडे बघून अनेक आठवणींचे काहूर मनात माजले. तो विचार करतो; ही अशी का रुसून गेली आहे? हा असला कसला रुसवा? तिचा चेहरा असा का म्लान झाला आहे? तिच्या चेहऱ्यावर नेहमीची ती दिलखुलास कळी खुलत का नाहीये. ओठांच्या हळुवार पाकळ्या मिटून गेल्या आहेत अन् त्या खुलता खुलेनात! काय झालेय तिला?
कवि अनिल यांची ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरांनी अमर केलीय…
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना!
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना!
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना!
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना!
ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ कुमार गातील असा अनिलांचा आग्रह होता आणि तसंच झालं. अनिल-कुसुमावतीचं हे गीत कुमारांनी अजरामर केलं.
आज पंडित कुमार गंधर्वांची जयंती!