मुंबई : कंगना राणौत नंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मीटू प्रकरणातील आज अभिनेत्री पायल घोषचा कैवार घेतला आहे. पायलसोबत त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. रामदास आठवले, पायल घोष आणि भगतसिंह कोश्यारी यांनी पाऊण तास चर्चा केली. यावेळी रामदास आठवले यांनी पायल घोषला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी मी याबाबत गृहमंत्र्यांशी बोलतो, असे सांगितले.
अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आज (29 सप्टेंबर) रामदास आठवले, पायल घोष यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली.
“राज्यपालांशी आम्ही अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत ओशिवरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे,” असे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच पायलला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी याबाबतही राज्यपालांशी चर्चा झाली. त्यावेळी राज्यपाल म्हणाले, “मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत बोलतो. ते पायलला सुरक्षा देतील,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.
“तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल,” असे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायलला दिले.“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. माझ्या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असे ट्विट पायलने घोषन काही दिवसांपूर्वी केले होते. अनुराग कश्यपने तिच्या ट्विटनंतर सर्व आरोप आपल्याला गप्प करण्यासाठी केले जात असल्याचे म्हटले आहे.