आला रे आला पोळ्याचा ‘सण’…

हर्षना रोटकर

शेतकऱ्यांचा सण म्हणजे पोळा (Pola)…. पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा सण येतो..  भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे बैलांना फार महत्त्व आहे..पोळा हा शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या ‘बैलांचा सण’ आहे..

आजच्या दिवशी बैलांना शेतात न नेता त्यांना गावातील ओढ्यावर किंवा नदीवर नेवून छान स्वच्छ आंघोळ घातली जाते… विविध रंगाची वस्त्रे म्हणजेच झूल चढवून दागदागिणे घातले जातात.. गळ्याभोवती घंटी, कवड्या-घुंगराच्या माळा घातल्या जातात..शिंगांना शेंदूर तसेच रेशमी गोंदे लावून छान सजवले जाते..आपआपल्या पद्धतीने छान रंगरंगोटी करून मोठ्या उत्साहात ढवळ्या-पवळ्याच्या जोडीचा साजश्रृंगार करून बळीराजा मोठ्या तोऱ्यात आपल्या बैलजोडीला पोळा भरवण्याच्या निश्चित ठिकाणी म्हणजेच  मारूतीच्या मंदिरासमोर जेथे या उत्सवाचे आयोजन केले जाते त्याठिकाणी  घेवून जातो… रांगेत बैलांना घेवून बळीराजा उभा राहतो.. गावातील मानकरी बैलांची पूजा करतात आणि बोजारा देतात..

‘पोळा’ हा सण असल्याने घरोघरी सकाळपासूनच लगबग सुरू असते..घरअंगणात सडा-सारवण करून सुंदरशा रांगोळ्या घातल्या जातात…घरात गोड-धोडासह स्वैपाक केला जातो..पूरणपोळीचा नैवेद्य विशेष असल्याने घराघरातून पूरणपोळीचा सुगंध दरवळत असतो..आणखी एक  पाच प्रकारच्या भाज्या करण्याची पद्धत आहे.. मात्र आता पंचमिश्रित एकच भाजी केली जाते..  सोबत वडा-पुरी, कुरडया-पापड,  शिरा आणि धोप्याच्या पानांची वडीही केली जाते..त्यामुळे जेवणाची तर चांगली चंगळच असते..संध्याकाळी पोळा फुटल्यानंतर बैलांची जोडी घेवून बळीराजा घरोघरी जातो..

आजच्या दिवशी नवीन कपडे परिधान केले जातात.. गृहिणी आधीच पूर्ण तयारीनिशी बैलजोडीची वाट पाहत असतात..पूजेची थाळी, पाय धुण्यास पाणी तांब्या समोर पाट ठेवून वाट पाहिली जाते..बैलांची जोडी आली की हसतमुखाने बळीराजा आणि बैलांच्या जोडीचे पाय धुतले जातात…गंध-अक्षता लावून आरती ओवाळली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो…त्यानंतर बैलांना विश्रांतीसाठी त्यांच्या जागेवर बांधून घरातील थोरामोठ्यांच्या पाया पडल्या जातात..आणि आनंदाने एकत्र पंगतीने बसून जेवणाचा आस्वाद घेवून श्रावणी उपवास सोडला जातो…

बैलपोळा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये साजरा केला जातो.. गावात तोरणं लावली जातात, फुग्यांनी छान सजावट केली जाते..

 

बहिणाबाई चौधरी यांची कविता याठिकाणी द्यावीशी वाटते…

 

आला आला शेतकऱ्या

पोयाचा रे सन मोठा

हातीं घेईसन वाट्या

आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरनं

सजवा रे घरदार

करा आंघोयी बैलाच्या

लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले

शेंव्या घुंगराच्या लावा

गयामधीं बांधा जीला

घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा

आंगावऱ्हे झूल छान

माथां रेसमाचे गोंडे

चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई,

चुल्हे पेटवा पेटवा

आज बैलाले नीवद

पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर

नहीं कष्टाले गनती

पीक शेतकऱ्या हातीं

याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे

बैल कामदार बंदा

याले कहीनाथे झूल

दानचाऱ्याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा

उठा उठा आयाबाया

आज बैलाले खुराक

रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी

होऊं द्यारे मगदूल

बशीसनी यायभरी

आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं

माझं येळीचं सांगन

आज पोयाच्या सनाले

माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता

आदाबादीची आवड

वझं शिंगाले बांधतां

बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले

माझं ऐका रे जरासं

व्हते आपली हाऊस

आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले

फेडा उपकाराचं देनं

बैला, खरा तुझा सन

शेतकऱ्या तुझं रीन !

– बहिणाबाई चौधरी

 

The festival of farmers is pola. The festival falls on the day of Pithori Amavasya.  Since India is an agrarian country, bulls are very important. Pola is a ‘festival of bulls’ which is a friend of farmers.

Social Media