नव्या वर्षात राज्यात सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना भाकरी फिरविण्याचे वेध !

मुंबई :  (किशोर आपटे) – नव्या वर्षात राज्यात सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना भाकरी फिरविण्याचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) पक्षांची जम्बो बैठक ८ आणि ९ जानेवारीला मुंबईत होत आहे. तर भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारीणी अधिवेशन १२ तारखेला शिर्डीत होवू घातले आहे. या दोन्ही पक्षांमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी बदलाचे वेध लागले आहेत. तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच केंद्रीय निरिक्षक महाराष्ट्रात येवून पक्ष संघटनेची बैठक बोलावून नव्या नेत्याची तसेच संचाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शरद पवार भाकरी फिरवणार

विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसल्यानंतर आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अजित पवार यांच्या पक्षांत किंवा काँग्रेस पक्षात विलीनीकरण होणार का? असा सवाल केला जात होता. मात्र तुर्तास या पक्षाच्या नेतृत्वात शरद पवार भाकरी फिरवणार असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ऐवजी पक्षात नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवड होण्याची शक्यता असून या पदासाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे याची चर्चा दि ८ आणि ९ जानेवारीला स्वत: शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात होणार आहे. यावेळी नव्या कार्यकारिणीसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनिती देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पक्षाने अद्याप विधीमंडळ नेत्याची निवड केली नसून त्याबाबतही या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षात नव्याने आलेल्या हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, यांच्या नावाची चर्चा आहे. यावेळी महिला युवती विद्यार्थी विभागांच्या प्रमुख पदांवरही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

बावनकुळेंच्या उत्तराधिकाऱ्याची निवड?

१२ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारीणीचे शिर्डी येथे अधिवेशन होत असून यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदे मिळाल्याने त्यांच्या जागेवर नव्या नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ओबीसी मराठा अश्या दोन्ही समाजाच्या नेत्यांच्या नावांची चर्चा असून त्यात बबनराव लोणीकर, रविंद्र चव्हाण, संजय कुटे, यांची प्रदेशाध्यक्षपदासाठी तर मुंबई अध्यक्ष पदासाठी योगेश सागर, सुनील राणे , अतुल भातखळकर यांच्या नावांची चर्चा आहे.

काँग्रेसचेही खांदेपालट?

प्रदेश काँग्रेसकडूनही जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी पदाधिकारी बैठक घेतली जाण्याची शक्यता असून पक्षाच्या विधीमंडळनेते, गटनेते, प्रतोद यासोबत मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदावर नव्या नेत्यांची निवड होण्याची शक्यत आहे. नव्या नेत्यांमध्ये मुंबई अध्यक्षपदी पुन्हा भाई जगताप, चरणजीत सप्रा यांच्यासह प्रिया दत्त, नसिम खान यांच्या नावांची चर्चा असून प्रदेशाध्यक्ष पदासाठी तरूण चेहऱ्याला संधी देताना विश्वजीत कदम, सतेज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, किर्ती गांधी, इत्यादी नावांची चर्चा आहे. पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदासाठी नाना पटोले यांच्यासह विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी यशोमती ठाकूर याची निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

मंकी बात…

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *