गानतपस्वी पंडित प्रभाकर धर्माधिकारी यांचे ९० व्या वर्षी देहावसान

मुंबई : बोरीवली येथील गानतपस्वी पं प्रभाकर धर्माधिकारी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. पंडितजींनी अतिशय खडतर मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात खूप मोठी मजल मारली. १९३० साली ग्वाल्हेर या संगीताच्या माहेर घरी त्यांचा जन्म झाला. तिथे माधव संगीत विद्यालयातून त्यांनी पं. कृष्णराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतरत्न आणि संगीतनिपुण या उच्च पदव्या मिळविल्या.

अनेक संस्थाने, राज्यात जाऊन त्यांनी आपली कला सादर केली, रसिकांची वाहव्वा मिळविली आणि खूप नाव कमावले. १९५७ मध्ये त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत पं. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले, पं. प्रल्हादबुवा गानु इ. अनेक नामवंत गुरूंकडून ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा विविध घराण्यांच्या गायकीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. ५० वर्षांहून अधिक काळ आपल्या सरस्वती संगीत विद्यालयातून शेकडो विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. अतिशय मनापासून संगीताच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातले.

विविध अंगांनी नटलेली त्यांची गायकी ऐकायचे भाग्य अनेकांना लाभले आहे. त्यांनी स्वतः मेहनत करून गळ्यात घोटून घेतलेली सरगम ही त्यांच्या गायकीतली विशेष गोष्ट. असा हा संगीतातला सूर्य मावळला असला तरी यू ट्यूब आणि सीडी च्या रूपातून ते कायम आपल्या बरोबर राहतील, अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मागे त्यांची मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

Social Media