रत्नागिरी(Ratnagiri) जिल्ह्यातील खेड येथील निसर्गरम्य परिसर, उत्साह भरल्या वातावरणात, सुंदर सजावटीच्या सभागृहात नोंदणी कक्षात नोंदणी करून, चवदार स्वागत पेय व नाश्ता झाल्यावर मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून रत्नागिरी जिल्हा चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे द्वितीय स्नेहसंमेलन नुकतेच प्रशस्त अशा हॉटेल बिसु मध्ये अत्यंत थाटामाटात झाले.
प्रारंभी रत्नागिरी जिल्हा संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल चिटणीस(Sunil Chitnis) यांनी सर्व मान्यवर , सर्व ज्ञातीबांधवांचे स्वागत करून प्रास्तविक केले. त्यानंतर सर्व ज्ञाती बांधवांचे ओळख सत्र झाले .
यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य माहिती खात्यातून सेवा निवृत्त झालेले संचालक तथा न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ यांचे ‘ आपली सामाजिक बांधिलकी ‘ या विषयावर बोधपुर्ण व माहितीपुर्ण व्याख्यान झाले.
अखिल भारतीयचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर देशपांडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना समाज एकत्र येणे गरजेचे आहे यावर भाष्य केले.
मंडणगड तालुक्याचे ॲडमिन श्री उदय देशपांडे यांनी आपल्या समाजाला जातीचा दाखला मिळत नाही त्यामुळे सध्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे या अत्यंत निकडीच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी स्वानुभावर आधारित त्यांची भूमिका मांडून राष्ट्रीय कार्यकारिणीने यात लक्ष घालणेची विनंती केली.
राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री समीरजी गुप्ते यांनी अखिल भारतीय संस्था आपल्या ज्ञाती बांधवांकरिता कशी कार्यरत आहे, कोणकोणते उपक्रम राबवले जातात, आपल्या समाजानी पुढे येणेसाठी काय करणे आवश्यक आहे हे विचार मांडले.
पहिले सत्र संपल्यानंतर दुपारच्या सत्रामधे खुली चर्चा, प्रश्नोत्तरे असे सत्र सुरू झाले. या सत्रामधे अनेक ज्ञाती बांधवांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन अनेक महत्वाच्या विषयांवर उपयुक्त चर्चा केली. एकमेकांना एकमेकांजवळ सुंदर संवाद साधता आला ही विशेष कौतुकाची बाब होती. सारेच एकत्र बसल्यामुळे छान चर्चा झाली.
चां का प्रभु समाजाचा इतिहास व देवेंद्रजी भुजबळ यांच्या काही पुस्तकांचा विक्री कक्ष आयोजित केला होता त्या पुस्तक विक्रीची जबाबदारी पनवेलच्या गौरी राजे यांनी यथोचित पार पाडली.
या संमेलनाला मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, व रत्नागिरी तालुक्यातील अनेक ज्ञाती बांधव उपस्थित होते.
श्री समीरजी गुप्ते राष्ट्रीय अध्यक्ष, श्री चंद्रशेखर देशपांडे राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्री रामानंद सुळे सचिव, राष्ट्रीय कार्यकारिणीचे विश्वस्थ श्री क्रांतीकुमार कुळकर्णी, श्री नागेश कुळकर्णी, कमिटी मेंबर सर्वश्री श्रीकृष्ण चित्रे, गिरिष गडकरी ,सचिव पनवेल तालुका, सौ. गौरी राजे पनवेल, एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी
श्री अजित कोंढवीकर तथा कार्याध्यक्ष अमोल प्रधान
अशा महनीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग रत्नागिरीकर ज्ञाती बांधवांना लाभला.
विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याशिवाय या संमेलनाला
नागोठणे कायस्थ समाजाचे अध्यक्ष श्री सुभाष गरुडे, प्रकाश गुप्ते फलटण,
भाई ताम्हणे, पुणे असे दूरदूरचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
संमेलनाच्या अखेरच्या सत्रात मान्यवर पदाधिकारी व बाहेर गावावरून आलेली पाहुणे मंडळी यांना सुंदर प्रतिमा व सरसेनापती वीर लढवय्ये कोकाजी प्रधान यांचे छायाचित्र असलेले संमेलनाचे स्मृति चिन्ह व त्यांची थोडक्यात ओळख करून देणारे पत्रक भेट देण्यात आले. उपस्थित सर्व रत्नागिरीकर ज्ञाती बंधू भगिनींनीही सरसेनापती कोकाजींचे स्मृतिचिन्ह देण्यात भेट देण्यात आले.
संमेलनाला उपस्थित सर्वांचे व देणगीदारांचे आभार अध्यक्ष श्री सुनिल चिटणीस यांनी व्यक्त केले.
हे संमेलन यशस्वी करणेसाठी खेड तालुक्याचे ॲडमिन
श्री सौरभ चिटणीस यांनी चार दिवस त्यांचा व्यवसाय बंद ठेऊन सर्वतोपरि मदत केली.
संमेलनाच्या दिवशी रोहित कुळकर्णी, सुदीप गुप्ते, स्वाती गुप्ते, शिवानी प्रधान गौरी राजे इत्यादिंचे मोलाचे सहकार्य लाभले. संमेलनाचे सुत्रसंचालन चिपळूणचे रोहित कुळकर्णी यांनी अत्यंत सुंदर केले.
उपस्थित सर्वांना उत्कृष्ठ संवाद साधता आला हे या संमेलनाचे फलीत आहे अन याचा खूप आनंद आयोजकांना झाला हे नमूद करावेसे वाटते.
संमेलनाचे शिवधनुष्य पेलणे अन त्यावर आर्थिक प्रत्यंचा चढवणे हे अवघडच असते. त्यातही प्रत्यक्ष कार्यक्रम करताना मदतीचे हात कमी असले की जी कसरत करावी लागते याची जाणिव अध्यक्ष सुनिल चिटणीस व ॲडमिन सौरभ चिटणीस यांना अनुभवण्यास मिळाली. संमेलन खर्चाचे कसे भागेल? याची खरंच चिंता होती. परंतु दानशूर ज्ञाती बांधवांनी, राष्ट्रीय कार्यकारिणीने उदार मनाने आर्थिक सहाय्य केल्यामुळेच खर्च वजा जाता श्री शिलकीचा ताळेबंद मांडता येऊन असे संस्मरणीय, दिमाखदार संमेलन करणे शक्य झाले हे सत्यच. या संमेलनाचा जमा – खर्च ताळेबंद दुसऱ्याच दिवशी देणेत आला.