मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) अनेकदा चर्चेत असते. पण सध्या प्रियांका तिच्या लग्नाच्या बाबतीत चर्चेत आहे. प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन पॉप स्टार निक जोनाससोबत (Nick Jonas)लग्न केले. तेव्हापासून पॉवर कपलमध्ये निक आणि प्रियांकाचा समावेश झाला. पण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर प्रियांकाने असे काही केले आहे ज्यामुळे निक आणि प्रियांकाच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निक जोनाससोबत लग्न केल्यानंतरच प्रियंका चोप्राने तिचे नाव बदलून ‘प्रियांका चोप्रा जोनास’ असे ठेवले होते. मात्र अलीकडेच प्रियांकाने सोशल मीडियावर अचानक तिच्या नावामधून पतीचे आडनाव हटवले आहे. त्यामुळे निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांच्यात मतभेद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रियांका चोप्राच्या(Priyanka Chopra) या हालचालीनंतर लोकांना वाटते की हे दोघे लवकरच वेगळे होणार आहेत.
प्रियांका चोप्राच्या या हालचालीनंतर तिच्या अनेक चाहत्यांची मनंही तुटली आहेत. ज्यांना निक आणि प्रियांकाची जोडी आवडते त्यांना कधीही असे वाटत नाही की त्यांच्यात विभक्त व्हावे किंवा जोडी तुटावी. मात्र, प्रियांका चोप्रा किंवा निक जोनास यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्रियांका चोप्रानेही पतीचे आडनाव काढून टाकण्याचे कारण दिलेले नाही. पण प्रियांकाच्या या निर्णयानंतर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे.
याआधी कमाल रशीद खाननेही प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या विभक्त होण्याचा अंदाज वर्तवला होता. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर लवकरच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास देखील वेगळे होतील, असे केआरकेने भाकीत केले होते. प्रियांकाच्या सोशल मीडियावर जे अंदाज बांधले जात आहेत, ते खरे ठरले तर केआरकेचा अंदाजही १० टक्के खरा ठरेल.