मालेगावात भारत जोडो न्याय यात्रेचे प्रचंड जल्लोषात स्वागत.
मालेगाव, दि. १३ मार्च
भाजपा व आरएसएसचे(RSS) लोक भावा-भावामध्ये भांडणे लावत आहेत, एका भाषेला दुसऱ्या भाषेविरोधात लढवत लावत आहेत, एका राज्याला दुसऱ्या राज्याविरुद्ध लढवत आहेत. एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात तर एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात लढवत आहेत. देशात आरएसएसचे कट्टरपंथी लोक व्देष पसरवत आहेत, असा आरोप करत ‘नफरत’च्या या बाजारात ‘मोहब्बत’ ची दुकान सुरु करत भारत जोडो न्याय यात्रा काढली असल्याचे, खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ‘नफरत’च्या बाजारात ‘मोहब्बत’ की दुकान उघडली.
धुळ्यातून मालेगावात आलेल्या भारत जोडो(bharat-jodo) न्याय यात्रेवेळी ते जनतेला संबोधित करत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, शेतकरी, कामगार, गरिब यांचे मुद्दे गंभीर आहेत पण त्यावर चर्चा होत नाही. मीडियावर २४ तास बॉलिवूडचे कलाकार, क्रिकेटपटू नाहीतर मोदीच दिसतात, कधी ते समुद्राखाली गेलेले दिसतात तर कधी हवेत विमानातून उडताना दिसतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला पण पंतप्रधान मोदींनी तुम्हाला ताली बजावो, थाली बजाओ, मोबाईल टॉर्च दिखावो हे करण्यास सांगत होते. मोदी सरकारने लावलेल्या जीएसटी व नोटबंदीमुळे मालेगाव सारख्या शहरातील पॉवरलूम उद्योग बंद पडत आहेत. वाढत्या वीज दरानेही पॉवरलुम उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास पॉवरलुमची वीज दरवाढ थांबवण्यावर निर्णय घेऊ. नोटबंदी व जीएसटीमुळेच देशातील छोटे उद्योग बंद पडले आणि तरुणांच्या हातातील नोकऱ्याही गेल्या. देशात बेरोजगारी, महागाई व भागिदारी ह्या तीन मुख्य समस्या आहेत. शिक्षण घेऊन तरुण बाहेर पडतो पण त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून काँग्रेसने तरुणांसाठी पाच गॅरंटी दिल्या आहेत. पहिली नोकरी पक्की, पेपरफुटी कायमची रोखण्यासाठी कठोर कायदा, ३० लाख रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती केली जाईल असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.
भारतीय जनता पक्ष संविधान संपवण्याची भाषा करत असतो. भाजपाच्या एका खासदाराने पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलण्याची भाषा परवा दिवशी केली. भाजपाने त्या खासदाराला तसे बोलण्यास सांगितले होते. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले आहेत, संविधान देशाचा पाया आहे, नरेंद्र मोदीच काय, देशातील कोणतीच व्यक्ती संविधान संपवू शकत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला संविधानाला हात लावू देणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
भारत जोडो न्याय यात्रेला मालेगावात तुफान गर्दी जमली होती. मोठ्या संख्येने लोकांनी राहुल गांधी व न्याय यात्रेचे जल्लोषात स्वागत केले.