आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार : राहुल गांधी

कोल्हापूर,   : दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची 50 % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि लोकसभा व राज्यसभेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करू अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी केली.
कोल्हापुरातील संविधान सन्मान संमेलनात खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आज कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे ठोसपणे सांगता येत नाही त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. जातनिहाय जनगणना म्हणजे एक्सरे आहे, एक्सरे काढल्यानंतर समस्या काय आहे ते समजेल व नंतर त्यावर उपाय करता येईल पण जातनिहाय जनगणेला भाजपा, आरएसएसचा विरोध आहे. देशातील 90 टक्के जनतेला खरी माहिती कळू नये यासाठी ते विरोध करत आहेत. परंतु देशातील या ९० टक्के लोकांच्या हितासाठी जातनिहाय जनगणना लोकसभा व राज्यसभेत मंजूर करुन घेऊ आणि कोणतीही शक्ती याला रोखू शकत नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
ज्यांच्या हातात कला, कौशल्य, अनुभव आहे त्यांना मागे ठेवले जाते ही परिस्थिती आहे आणि यांच्याबद्दल शालेय अभ्यासक्रमात काहीच नाही. दलित, मागास वर्गाचा इतिहास शिकवला जात नाही, त्यांचा इतिहास पुढे आला पाहिजे. शिक्षण क्षेत्रावर काही विशिष्ट लोकांचा पगडा आहे. गरिब घरातील मुलाला डॉक्टर, वकील, इंजिनिअर व्हायचे आहे पण त्यातील काहीजणांचे हे स्वप्न पूर्ण होते आणि बाकीच्यांचे स्वप्न मोडीत निघते. अशा परिस्थीतीत भारत सुपर पॉवर कसा बनेल? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज(Shahu Maharaj) म्हणाले की, आरक्षणाशिवाय मागास समाजाची प्रगती होणार नाही म्हणूनच राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ साली सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी आरक्षण लागू केले. राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घनिष्ट संबंध होते. शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हक्क देऊन देशभर लागू केले. आज हे संविधान मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. खासदार राहुल गांधी हे संविधान रक्षक आहेत तसेच आपणही देशाचे संविधान अबाधित रहावे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शाहू महाराज यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार शाहू महाराज, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, रजनी पाटील, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, काझी निजामुद्दीन, बी.वी. व्यंकटेश, आ. भाई जगताप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, NSUI चे आमीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रतिभा शिंदे, सिव्हिल सोसायटीचे अशोक भारती, शाबीर अन्सारी, डॉ. अनिल जयहिंद, सुभाष यादव, विजयेंद्र पाल गौतम, पी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
Chhatrapati-Shivaji-Maharaj
त्यापूर्वी खासदार राहुल गांधी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट दिली व त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
Social Media