सत्ताधारी ‘कर्तव्य विसरले तंव्हा एक पन्नाशीचा युवक आपल्या आजी आणि वडीलांच्या हौतात्म्याच्या मार्गाने देशासाठी कर्तव्य म्हणून पदयात्रेला निघाला : इतिहास नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही.!
भारत देशाच्या संकल्पनेत यात्रा हा विषय किंवा आसेतू हिमाचल पदयात्रा हे विषय अगदी अनादी काळाचे आहेत. ते आजचेच नाहीत तर प्राचीन काळापासून आहेत. रामायण (Ramayana)आणि महाभारत(Mahabharata) या दोन्हीमध्ये नायकांच्या यात्रा आहेत. पांडवांनी वनवास आणि अज्ञातवासाच्या निमित्ताने अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र संचार केला होता. भगवान श्रीकृष्णाने देखील गोकुळातून मथूरेला कंस चाणूर मर्दनासाठी निघाले ती देखील यात्राच होती. तर भगवान रामचंद्राने सिताशोधाच्या निमित्ताने आयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत पदयात्रा करत रावणाचा संहार केलाच पण अनेकांचा उध्दार केल्याचा संदर्भ रामायणात येतो. त्यामुळे ‘यात्रा’ हा शब्द या देशाला नवा नाही,आजही रेल्वे किंवा विमानाच्या प्रवासात उदघोषणा ऐकतो. सूचना देणारी निवेदक / निवेदिका आपली यात्रा सुखाची होवो म्हणून शुभेच्छा देत असते. म्हणजे यात्रा ही शुभ दायक लाभ दायक होण्यासाठी केली जाणारी माणसाची कृती आहे. माणसाच्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत हा यात्रा शब्द त्यांच्या सोबत असतो म्हणूनच मृत्यूनंतरच्या शेवटच्या स्मशानाकडे चार जणांच्या खांद्यावरून जातानाही त्याला अंतिम यात्रा किंवा अंत्ययात्रा म्हटले आहे.
यात्रा शब्द गावची यात्रा – जत्रा या अर्थानेही वापराला जातो. प्रत्यके गावचे ग्रामदैवत आणि स्थान दैवत असते आणि त्यांची विशिष्ट यात्रा असते. या यात्रा शब्दामागे देखील निमित्त काढून सगळ्यांच्या भेटीगाठी व्हाव्या सुख दु:खांची भावना कल्पनांची देवाण घेवाण व्हावी असा त्या काळातला आशय होता, ज्या काळात संवाद आणि देवाण घेवाणीची आजच्या सारखी कम्युनिटी, सोशल मिडिया नव्हता त्या काळातील यात्रा हा सोशल होण्याचा मार्ग होता. जगण्याचा उत्सव म्हणून तो नित्य हौसेने साजरा केला जात होता. आजही अश्या असंख्य यात्रा जत्रांचा वारसा देशभर सुरू आहे, जपला जात आहे. याच शब्दाला जोडून एखाद्याचा किंवा समूहाचा चुकीचा किंवा जनरितीच्या, प्रकृतीच्या विपरीत काही वागण्याचा किंवा पध्दतीचा भाग असेल तर त्याला नाव ठेवताना ‘येड्यांची जत्रा’ असे म्हणून संभावना केली जाते, खिजवले जाते. सध्या कॉंग्रेस नेते राहूल गांधी(Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला देखील संघ भाजप समर्थकांकडून ‘येड्यांची जत्रा’ म्हणून खिजवले जात आहे. पण खरेच वस्तुस्थिती तशीच आहे की नाही. कसे ते पाहूया.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी(Rahul Gandhi) यांनी गेल्या तीन दिवसांपासून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रे दरम्यान ते दररोज २५ ते ३० किमी अंतर पायी चालत काश्मीरपर्यंत जाणार आहेत. राहूल गांधी यांनी कन्याकुमारी येथून यात्रा सुरूवात करण्यापूर्वी श्रीपेरूंबुदूर येथे त्या ठिकाणी जावून आपले दिवंगत वडील राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या ठिकाणीच राजीव गांधी यांची निवडणूक प्रचाराच्या भारत यात्रेवर असताना हत्या करण्यात आली होती. राहूल गांधी(Rahul Gandhi) यांच्या या एकाच कृतीने त्यांच्या मनाचा अंदाज येवू शकतो, जो हजारो वेळा ‘मन की बात’ करूनही कुणा नेत्यांला सांगता येणार नाही. आपल्या आजीचा आणि वडीलांचा ज्या मार्गाने जाताना बळी गेला त्याच मार्गावरून आपण देशाला जोडण्याची हाक देत निघालो आहोत या संदेशात हिंमत, देशप्रेम आणि तत्वनिष्ठा या सा-या गोष्टी दिसतात. इवेंट मँनेजमेंटचे राजकारण करत त्याची खिल्ली उडवणारे काही समजोत पण तुकोबांच्या शंब्दात ‘ तेथे असावे जातीचे. . येरा गबाळाचे काम नव्हे’ हेच दिसून आले आहे.
या यात्रेचा संकल्प जाहीर करण्यापूर्वी दिल्लीच्या रामलिला मैदान येथे राहूल गांधी यांनी जंगी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी यात्रे मागची भुमिका जाहीर केली. त्यांच्या भुमिकेनुसार जेंव्हा तुमच्या मदतीला लोकशाहीच्या चार स्तंभापैकी कुणीच नसते तेंव्हा तुम्हाला लोकशाहीचा मुलाधार असलेल्या जनतेकडे जावून भुमिका मांडायची असते. जे पूर्वीच्या काळात महात्मा गांधी, इंदिरा गांधी जेपी आणि चंद्रशेखर यांनी किंवा लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रेमध्ये केले होते. महात्मा गांधीच्या काळात तर ‘गोदी मिडीया’ नव्हताच, देश पारतंत्र्यांत होता न्यायालये किंवा अन्य लोकशाही संस्था आस्तित्वात यायच्या होत्या देशाची २/३ जनता शिक्षीत, संसाधनयुक्त नव्हती. महात्मा गांधी भारतात आले त्यावेळी त्यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्याने प्रथम त्यांनी देशाचा दौरा केला आणि लोकांच्या प्रश्नांची जाण करून घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर चंपारण्य असो किंवा दांडी यात्रा असो महात्मा गांधी यांच्या यात्रेने त्यांचा राजकीय प्रवास मोहनदास गांधी ते महात्मा गांधी असा झाला होता. त्यामुळेच साम्राज्यवादी सत्ता हलल्या होत्या. पण अगदी जेपी चंद्रशेखर आणि आडवाणीच्या यांत्रेला मिडीया नावाचे भूत जागृत व्हायचे होते किंवा त्याचा कमर्शियल वापर त्या प्रमाणात नव्हता जसा आता सर्रास तो परसेप्सशन तयार करण्यासाठी वापरला जातो. फार कश्याला अगदी ज्या रा स्वसंघाच्या निती धोरणा विरोधात राहूल गांधी शंखनाद करत निघाले आहेत. त्या संघाचे प्रचारक गेल्या सुमारे शंभर वर्षापासून ‘प्रवास’ करत असतात ते काय आहे?. यात्राच आहे. अगदी जैन साधू , बौध्द श्रमण किंवा भिख्खू देखील ‘विहार’ करत म्हणजे असाच पदायात्रांचा प्रवास करत आले आहेत. या देशात म्हणून यात्रा, प्रवास, पदयात्रा काही नवीन नाही. हिंदूच्या इतिहासात तर चार धाम यात्रा, कावड यात्रा, काशियात्रा, अमरनाथ यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा, अश्या असंख्य यात्रांचा उल्लेख आढळतो. त्यातून व्यक्ती ऊर्जावान होतो, अगदी पर्यटन या संकल्पनेतही हेच अभिप्रेत आहे. ते म्हणतात ना ‘केल्याने देशाटन, पंडीत मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार’ म्हणजे माणसाच्या जीवनाला ऊर्जा देणा-या नाविन्य आणि प्रगतीची दिशा देणा-या ज्या गोष्टी आहेत त्यात केल्याने ‘देशाटन’ हे अग्रभागी आहे. म्हणजेच पदयात्रा! त्यामुळे राहूल गांधी यांचा हा यात्रा सुरू करण्याचा घाव सत्ताधा-यांच्या वर्मी लागला आहे नक्कीच. !
गंमत म्हणजे राहूल गांधी जेंव्हा अशी पूर्वजांची विरासत पुन्हा नव्याने ताजी जिवंत करण्यासाठी जिवाचे रान करत होते त्यावेळी सेंट्रल विस्टासह राजपथाचे नुतनीकरण करत याच देशाच्या जनतेच्या माथ्यावर तीस हजार कोटी रूपयांचा महागाईचा कर्जाचा डोंगर रचून गुलामीचा इतिहास पुसल्याचा सोहळा दिल्लीत साजरा होत होता. देशाच्या जनतेला जीएसटी वाढवून आणि इंधनाचे दर वाढवून ब्रिटीशांसारखे ‘लगान वसुली’ करत गुलामीच्या खुणा पुसल्याचे सांगताना रक्ताचे अश्रू कसे असतात ते पहायला मिळत होते. राजपथाला कर्तव्यपथ म्हणून नवी ओळख दिल्याचे सांगताना सत्ताधारी आपले कर्तव्य विसरले होते आणि एक पन्नाशी
चा युवक आपल्या आजी आणि वडीलांच्या मार्गाने देशासाठी कर्तव्य म्हणून पदयात्रेला निघाला होता अशी इतिहास नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. असो.
देशात सध्या काही उद्योगपतींच्या भल्यासाठी सारी सत्ता व्यवस्था आणि संस्था बटीक झाल्यासारख्या काम करत असताना, कोरोनासारख्या महामारीत आणि त्यापूर्वीच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या भयानक धोरणाच्या कचाट्यात सापडून देशातील व्यापार आणि उद्योग उध्वस्त होत गेले. तेंव्हा काही निवडक उद्योगपतींची संपत्ती ‘दिन दुगनी रात चौगुनी कशी वाढली’ हे जनतेला कळायला हवे. पण ते सांगायचे कुणी? चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांना त्यांच्या कंपन्या आणि मालकांना देखील या लक्ष्मीपूत्रांनी विकत घेतल्यानंतर जनतेला देशात खरेच काय बदल झाले आहे आणि कसे झाले? त्याचे भविष्यात काय परिणाम आहेत? हे सांगायचे कसे? सर्वोच्च न्यायालय आणि सीबीआय, इडी किंवा प्रशासकीय व्यवस्था लोकशाही संविधान रूपी द्रौपदीचे वस्त्रहरण होताना कृपाचार्य, भिष्माचार्य जसे हतबल होते तश्या भुमिकेत असतील तर न्यायाची अपेक्षा कशी करायची ? हाच प्रश्न घेवून राहूल गांधी मोठ्या हिंमतीने निघाले आहेत. त्यांनी रामलिला मैदानावरून बोलाताना सांगितले की, माझी पंचावन्न तास काय पाचशे तास किंवा पाच वर्ष चौकशी करा मी दबावाला घाबरत नाही. त्यांच्या या निर्धारातून, शब्दातून हेच सांगायचे होते की ही यात्रा कॉंग्रेस वाचविण्यासाठी नव्हे देश आणि लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी आहे. रा स्व संघ आणि त्यांच्या वैचारीक भुमिकेतून देशाचे जे वर्गीकरण करत वाटण्या करण्याचे धोरण आहे त्या विघटनवादी शक्तीच्या विरोधात देशाला तिरंग्याखाली एकत्र करण्याची शेवटची विचारयात्रा आहे, त्यातून जनतेला जाग आली तर या देशाला केवळ जनताच वाचविणार आहे. हाच या यात्रेचा हेतू आहे. त्यामुळेच त्याला पहिल्या दिवसापासून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून यात्रेच्या यशाच्या भितीने टिका, खिल्ली उपहास करत अगदी राहूल गांधी यांचे कपडे, बुट आणि कंटेनरवर टिका केली जात आहे. पण मारूतीच्या शेपटाला जेंव्हा रावणाने आग लावली तेंव्हा त्याला कल्पनांच नव्हती की हा ‘बंदर’ लंका खाक करून जाणार आहे! त्यामुळे बदनामी ही सही गोदी मिडियाने ध्यान तो दिया अशी स्थिती आहे. स्वामी विवेकांनद यांचे एकवचन आहे तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर जाताना लोक प्रथम दुर्लक्ष करतील नंतर मजा घेत टवाळी करतील पण तुम्ही चालत रहा हेच लोक एक दिवस तुमच्या मागे चालू लागतील राहूल गांधी(Rahul Gandhi) नेमके याच निर्धाराने निघाले आहेत.
राजकीय विश्लेषक किशोर आपटे
aptekishor@rediffmail.com ९८६९३९७२५५