खोक्याभाईचं काय घेऊन बसलेत, विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत; राज ठाकरेंचा सरकारला टोला

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बीड(Beed) जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस(Suresh Dhas) आणि त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याची बरीच चर्चा आहे. यावरुन राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला. मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. त्यासोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी सरकारवर टोलेबाजी केली.

राज्यातील मूळ विषय सोडून बाकीच्या विषयात सर्वसामान्यांना भरकटून टाकलंय असं सांगत राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर टीका केली. मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन असं राज ठाकरे म्हणाले. मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा रविवारी, 30 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. त्यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने मोर्चे बांधणीला सुरुवात केल्यानंतर रविवारी रवींद्र नाट्य मंदिरातील महत्त्वाच्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज ठाकरेंनी दिल्या आहेत . यात शहराध्यक्ष तसेच चार शहर उपाध्यक्षांची नियुक्ती त्यांनी केली आहे.

राज ठाकरेंकडून मनसेच्या पक्षसंघटनेत बदल करण्यात आले आहेत. मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईच्या उपशहर उपाध्यक्षपदी यशवंत किल्लेदार असणार आहेत.

मनसेची मुंबईची नवी यंत्रणा

• संदीप देशपांडेंकडे मुंबई शहर अध्यक्षपद देण्यात आलं आहे.
• यशवंत किल्लेदार हे दक्षिण मुंबईचे शहर उपाध्यक्ष असतील.
• कुणाल माईणकर यांच्याकडे पश्चिम उपनगर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी असेल.
• योगेश सावंत पूर्व उपनगर भागाचे शहर उपाध्यक्ष असतील.
• याशिवाय अमित ठाकरे गटप्रमुख आणि शाखाध्यक्ष प्रमुख असतील.
• नितीन सरदेसाई विभाग अध्यक्ष प्रमुख असतील.
• बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर पक्षाच्या केंद्रीय समितीवर असतील.

राज ठाकरेंच्या सभांना तोबा गर्दी होते. मात्र या गर्दीचं मतात रुपांतर करण्यास राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष नेहमीच अपयशी ठरल्याचं दिसतंय. त्यामुळे आता पालिका निवडणुकांच्या आधी मनसेनं संघटनात्मक बदल करण्याचं ठरवलंय. पण हे बदल महापालिका निवडणुकीत मनसेच्या यशाची खात्री देणार का? हे पाहावं लागेल.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *