रतन टाटांच्या निधनाने भारतीय उद्योग विश्वातला दीपस्तंभ हरपला : नाना पटोले

मुंबई : भारताला उद्योग क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणा-या रतन टाटा (Ratan Tata)यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. टाटा या नावाने भारतीयांच्या मनामनात घर केले आहे. स्वत:च्या जगण्याने आणि अलौकिक कर्तृत्वाने मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणारे उद्योगपती व टाटा उद्योग समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योग विश्वातील दीपस्तंभ हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोकसंदेशात नाना पटोले(Nana Patole) पुढे म्हणाले की, रतन टाटा भारतातील सर्वोत्तम उद्योगपतींपैकी एक होते. अतिशय नम्र स्वभाव, सभ्यता, साधेपणा, प्रेम आणि करुणेने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
रतन टाटा यांनी 1961 मध्ये टाटा ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी अडचणीत असलेल्या ‘नेल्को’चे प्रभारी संचालक म्हणून काम पहात ही कंपनी नावारुपाला आणली. 1991 मध्ये रतन रतन टाटा यांनी टाटा समूहाची जबाबदारी स्वीकारली व 28 डिसेंबर 2012 रोजी ते स्वतः या पदावरून निवृत्त झाले. रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचे मूल्य 50 पटीने वाढले.
भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात रतन टाटा यांचे मालाचे योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक स्तरावर ब्रँड इंडियाचे नेतृत्व केले. पोलाद उद्योग, ऑटोमोटिव्ह, माहिती तंत्रज्ञानासह बहुतांश क्षेत्रात टाटाने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. रतन टाटा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने टाटा समूहाला केवळ नवीन उंचीवर नेले नाही तर लाखो रोजगार निर्माण करून भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात हातभार लावला आहे. उद्योगाशिवाय राष्ट्र उभारणीच्या सामाजिक कार्यातही टाटा यांचे योगदान अतुलनीय आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या परोपकारी प्रयत्नांमुळे देशभरातील लाखो लोकांचे जीवनमान उंचावले आहे.
त्यांचे नेतृत्व आणि योगदान भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रवासाला पुढील अनेक वर्षे मार्गदर्शन करत राहील.
रतन टाटा यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नाना पटोले(Nana Patole) यांनी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Social Media