असे होते, रतन टाटा

जेष्ठ ,दानशुर,सर्वोत्तम, आदर्श उद्योगपती व टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा(Ratan-Tata) यांचं काल, बुधवार ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. या निमित्ताने वाचू या, त्यांचा जीवन पट. रतन टाटा(Ratan-Tata) यांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

भारतीयांसाठी टाटा ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा (Tata)संस्कृती ! टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योग तोरण म्हणजेच ‘टाटायन’!
असा उद्योगाचा समृध्द वारसा लाभलेल्या घराण्यात रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी झाला.

त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. ते १० वर्षांचे असताना त्यांचे पालक विभक्त झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला.
रतन टाटा(Ratan Tata) यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, चॅम्पियन स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनीषा बाळगून ते अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली.

याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे.आर. डी. टाटा यांच्याशी रतन टाटा यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योग समूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात ते टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली.

नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली, रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते.

रतन टाटांवर १९७७ मध्ये एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती त्यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते.
रतन टाटांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. आपल्या हयातीतच आपला वारस व्यवस्थित रीतीने निवडून ते स्वत:ही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये जाणेही बंद केले. हे करत असतांना रतन टाटा यांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही.

जे.आर.डी. टाटा यांनी १९८१ मध्ये रतन टाटा यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न घडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवर आणले. आधीचे मूळगावकर, केरकर, पेंडसे असे काही सन्मान्य अपवाद जरूर होते; पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले. जे.आर.डी. टाटांच्या अति सज्जनपणाचा फायदा घेत वर्षानुवर्षे कंपनी ही आपली जहागिरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे, कितीही वय वाढले तरी निवृत्त न होणारे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी घरी पाठवले. निवृत्तीचे वय ७५ वर्ष निश्चित केले. यात टिस्कोचे रूसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ असे दिग्गज होते. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यांतून नवे रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीने धावू लागल्या.

केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. या बरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी आय आय टी मुंबई ला ९५ कोटी रुपयांची देणगी दिली . याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करत.
कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपले हॉटेल राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती.

झपाटा ऑर्केस्ट्रा चे संचालक श्री श्रीकांत कुलकर्णी रतन टाटांच्या विषयी बोलताना लोकप्रिय झपाटा ऑर्केस्ट्रा चे संचालक श्री श्रीकांत कुलकर्णी म्हणतात, “रतन टाटा गेले ही बातमी कळताच आपल्या घरातील व्यक्ती गेल्यासारखे वाटतेय. तसा मी सरांना दोन-तीनदाच भेटलो असेन पण त्या स्मृती चाळवल्या. सातत्याने काही वर्षे मी टाटा मोटर्स साठी आमचा ऑर्केस्ट्रा सादर केला होता. साधारणपणे टाटा मोटर्स च्या स्टाफ ला घेऊन त्यांच्या बसेस गोराई बीचवर येत. तेथे एखादी वाडी बुक केलेली असे. दिवसभराचा कार्यक्रम असे. सकाळी नाश्ता पासुन सर्व चोख व्यवस्था असे. दुपारी आमचा ऑर्केस्ट्रा असे. एका वर्षी रत्न टाटा सर आले होते. मला त्यांना आमची 2 टायर रचनेवर आधारित बस दाखवायची होती. (अर्थात चासी टेल्को कंपनीची होती) मी त्यांना भेटलो आणि आमची आगळी-वेगळी बस बघण्याची विनंती केली. मी त्यांना बस मधे घेउन गेलो. ते खुष झाले आणि म्हणाले, तुम्ही कलाकारांची किती काळजी घेता ! मी त्यांना सांगितले, आमचे सतत दौरे असतात. त्या करीता आमचा कलाकार कायम फिट रहावा या करता अशी आगळी वेगळी बस बांधुन घेतली.”

त्यानंतर सरांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला. तेंव्हा मी त्यांना काही डीव्हीडी भेट दिल्या. त्या त्यांनी आवर्जून पाहिल्या. इतक्या मोठ्या महान मानवाची ही एक आठवण जपुन ठेवावी अशी.”

रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.
रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास ते अविवाहित होते.
अशा महान रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— संकलन:संजीव वेलणकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ.

Social Media