बंडखोरी : मतदारांच्या आशा आकांक्षा नव्हे, नेत्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षाचे भेसूर आणि भयावह दर्शन घडविणारी निवडणूक!

विधानसभेच्या निवडणूकीचे नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये एकेक जागा मिळवण्याची चढाओढ पहायला मिळाली आहे. त्यानंतरही महायुती आणि आघाडी यांच्यामध्ये एकमेकांच्या समोर उमेदवार किंवा बंडखोर उभे राहण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहायला मिळाले आहेत. सर्वार्थाने २०२४ची ही विधानसभा निवडणूक जनतेच्या आशा आकांक्षांपेक्षा नेत्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षांचे भेसूर आणि भयावह दर्शन घडविणारी ठरण्याची चिन्ह आहेत. तसे तर नेत्यांच्या व्यक्तिगत फायद्याच्या किंवा तोट्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकच निवडणूकीचे अंदाज अडाखे बांधले जात असतात. मात्र यावेळी कुणा महाशक्तीचा प्रभाव या साऱ्या निवडणूकांच्या एकूणच यंत्रणा, व्यवस्था आणि कार्यकारणावर आहे हे कुणालाही नाकारता न येणारे त्रिवार सत्य आहे नाही का?

Rebellion
त्यामुळे संत तुकोबांच्या ‘तुका म्हणे होय मनासी संवाद, आपलाची वाद आपणासी’ या अभंगओवीनुसार आपणच आपल्या मनात विचार करून पहा. या निवडणूकीत राष्ट्रवादी समोर राष्ट्रवादी, शिवेसेने समोर शिवसेना आणि कॉंग्रेसमधून किंवा अन्य पक्षातून भाजपवासी झालेल्या किती नेत्यांचा सामना आपल्याच जुन्या सहकारी मित्रांशी होत आहे ते लक्षात येईल. यावर एका मित्राने म्हटले, महाभारतामध्ये आपल्याच सग्यासोयऱ्यांना आपल्या समोर शस्त्र घेवून उभे राहिल्याचे पाहिल्यानंतर अर्जुनाला विशाद झाला, की माझ्या बांधवांशी मी भांडू, लढू कसा? तेंव्हा भगवतगीतेच्या माध्यमांतून श्रीकृष्णाने त्याला उपदेश केला आणि क्षत्रियाचा धर्म लढणे हा आहे, कुणाच्या समोर तर शत्रू म्हणून जो कुणी त्याच्यासमोर आहे त्याच्याशी, मग तो भाऊ, काका, मामा आहे की मित्र सहकारी किंवा जवळचा नातेवाईक आहे याचा विचार करता येत नाही. ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेशू कदाचन’ केवळ क्षत्रियाचे कर्म कर फळाची चिंता करू नको. ते जे काही होणार आहे, त्याचे पाप तुला लागणार नाही. मात्र तू तुझ्या कर्माला मुकलास तर मात्र हे जे कोणी तुझे लोक समोर आहेत ते तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाहीत. असा वास्तविक विचार त्यावेळी भगवतगितेने सांगितला होता. तोच विचार आजच्या महाशक्तीने महाराष्ट्रात सांगितला आहे. फरक इतकाच आहे की, जो कुणी जिंकेल त्याच्या सोबत सत्तास्थापनेचा फायदा केवळ महाशक्तीलाच होणार आहे! तर अश्या आजच्या मिलावटी कर्मसिध्दांतावर ही निवडणूक लढवली जात आहे, असे या मित्राचे मत आहे.


हे सारे महाभारत सांगायचे कारण काय? तर मुंबईमध्ये अणुशक्तीनगर या मतदारसंघात अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार माजी मंत्री नबाब मलिक(Nabab Malik) यांचे मंत्रिपद ते महाविकास आघाडीत मंत्री असतानाच अटक झाल्याने गमवावे लागले होते, त्यानंतरही मलिक ज्या एकसंध राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष होते त्या त्यांच्या पदावरून पक्षाने त्यांना दूर केले नव्हते. जवळपास दोन वर्ष मलिक मुंबईतील भायखळा येथील एका व्यवहारात कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंधितांशी भागीदारी केल्याच्या आरोपामुळे राजकीय अडचणीत आहेत. आता ते वैद्यकीय कारणाने जामिनावर बाहेर आहेत, मात्र अजित पवार यांच्या गटासोबत ते गेले आहेत,पण त्यांना स्विकारण्यास सहयोगी भाजपचे नेते तयार नाहीत. इतके की त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या ऐवजी मुलीला सना मलिक खान यांना उमेदवारी देण्यास भाजपने दबावतंत्र वापरले आणि नवाब मलिक यांना राजकारणातून बाहेर करण्याचे प्रयत्न केले. मात्र शेवटच्या दिवशी शेवटच्या मिनीटांपर्यत जिद्द ठेवून मलिक यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्यापक्षाकडून अन्य मतदारसंघात उमेदवारी मिळवून अर्ज दाखल केला आहे. ही उमेदवारी दिली नाही तरी अपक्ष देखील आपण लढू असा त्यांचा पवित्रा राहिला होता. आता भाजपच्या मताप्रमाणे कथित दाऊदशी संबंधित असलेल्या मलिकांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षांनी आपण मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे महायुती कायम आहे अजित पवारांच्या पक्षासोबतच भाजप देखील आहे पण या ठिकाणी भाजपसमोर मलिक असल्याने येथे महायुती राहणार नाही!

Amit-Thackeray
अशीच गंमत शिंदे सेना आणि मनसे यांच्यात माहिम मतदारसंघात आहे. तेथे मनसेचे राज पूत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) मैदानात आहेत, त्यांचा रस्ता साफ करावा म्हणून शिंदेच्या सरवणकरांना माघार घेण्यासाठी दबाव आहे मात्र सरवणकर हटायला तयार नाहीत, वेळ आलीतर अपक्ष राहिन पण मैदानातून पळ काढणार नाही म्हणत आहेत. येथे देखील भाजप शिंदे च्या ऐवजी मनसेचा प्रचार करणार आहे म्हणे. म्हणजे येथे देखील महायुती नाहीच! अजूनही त्याहून गमतीशीर प्रकार आहे तो नांदगाव या मतदारसंघात येथे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी शिंदे सेनेचे सुहास कांदे यांच्यासमोर अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तेथे भाजप अधिकृत महायुतीच्या उमेदवारांऐवजी भुजबळांसोबत आहेत म्हणे! म्हणजे येथेही महायुती नाहीच. मग एकनाथ शिंदे यांच्याकडून शेवटच्या क्षणी देवळाली आणि दिंडोरी या नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या झिरवाळ आणि अहिरे यांच्या समोर उमेदवार उभे करण्यासाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले म्हणे! म्हणजे येथे देखील ‘महायुती खतरे मे’ आहे.

बंडखोरी

जी गोष्ट महायुतीमध्ये तीच महा आघाडीतही आहे. लोकसभेचा सांगली पॅटर्न आता शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये रामटेकसह अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. गंमत म्हणजे परांड्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार समोरही शिवसेनेच्या ठाकरे गटाने शड्डू ठोकल्याने खेकड्यांना धरण फोडायला मदत होणार आहे! आणि हाफकिन नावाच्या माणसाचा फायदाच होणार आहे म्हणतात! तर मग अश्या प्रकारच्या राजकीय युती मैत्री भंग करणाऱ्या तथाकथित मैत्रिपूर्ण लढती कुठे कुठे? होवू घातल्या आहेत त्याचा हा घ्या हिशेब! अर्थात आता दिवाळसणाला या राजकीय कडबोळ्या, भाजणीच्या चकल्या आणि बेसनाच्या लाडूंना छान छान कापडं, दमदार फटाके आणि जोरदार आपटीबार येत्या चार तारखेपर्यंत देण्याचे संकेत मिळाले आहेत. यातील ज्यांना यातले जे काही मिळेल ते कदाचित माघार घेतीलही त्यामुळे चार दिवस या बंडोंबाच्या गोष्टी वाचून मौज करा!  अशी संधी महायुतीमध्ये कोणत्या मतदारांना आहे तर पहा!  अणुशक्तीनगर-  सना मलिक- अविनाश राणे राष्ट्रवादी विरुध्द भाजप,  मानखुर्द-शिवाजीनगर- नवाब मलिक- सुरेश बुलेट पाटील भाजप विरुध्द राष्ट्रवादी, आष्टी- सुरेश धस- बाळासाहेब आजबे भाजप विरुध्द राष्ट्रवादी, श्रीरामपूर- लहू कानडे- भाऊसाहेब कांबळे भाजप विरुध्द शिंदेसेना, दिंडोरी- नरहरी झिरवळ- धनराज महाले राष्ट्रवादी विरुध्द शिंदे सेना, देवळाली- राजश्री अहिरराव- सरोज अहिरे शिंदेसेना विरुध्द राष्ट्रवादी.
बंडखोरी
तर महाविकास आघाडीमध्ये देखील हेच वारं आहे, कुर्ला- प्रविणा मोरजकर- मिलिंद आण्णा कांबळे राष्ट्रवादी विरुध्द ठाकरे सेना, मिरज- तानाजी सातपुते- मोहन वनखंडे ठाकरे विरुध्द कॉंग्रेस, सांगोला- दीपक साळुंके- बाबासाहेब देशमुख शेकाप विरुध्द शिवसेना ठाकरे, पंढरपूर- भगीरथ भालके- अनिल सावंत राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना ठाकरे, परांडा- रणजित पाटील- राहुल मोटे शिवसेना ठाकरे विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार,दिग्रस- पवन जैस्वाल- माणिकराव ठाकरे शिवसेना ठाकरे विरुध्द कॉंग्रेस,दक्षिण सोलापूर- अमर पाटील- दिलीप माने कॉंग्रेस विरुध्द राष्ट्रवादी. मुंबईत भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी पक्षाविरोधात बंडखोरी करत मैदानात आहेत. तर मुलूंड मध्ये राष्ट्रवादी शप विरोधात कॉंग्रेसचे राकेश शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. भायखळ्यात शिवसेना ठाकरेच्या विरोधात कॉंग्रेसच्या मधु अण्णा चव्हाणांनी बंडखोरी केली आहे. याशिवाय कुर्ला,अंधेरी कुलाबा या मतदारसंघातही बंडखोर उभे आहेत. बेलापूरमध्ये शिंदे सेनेचे विजय नहाटा भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हात्रेंसमोर आहेत तर विजय चौगुले यांच्याकडून ऐरोलीत बंडाची भाषा केली जात आहे.

कल्याण पूर्व मध्ये शिंदेचे महेश गायकवाड, कल्याण पश्चिम मध्ये भाजपचे नरेंद्र पवार, वरुण पाटील बंडखोर आहेत. भिवंडी ग्रामिण मध्ये भाजपच्या स्नेहा पाटील, मिरा भायंदरमध्ये भाजपच्या गीता जैन आणि सुरेश खंडेलवाल, कोपरी पाचपाखाडीमध्ये मुख्यमंत्र्यासमोर शिवसेना उबाठाचे केदार दिघे आहेत पण कॉंग्रेसच्या मनोज शिंदेनी बंडखोरी केली आहे. कल्याण पूर्व मध्ये कॉंग्रेसच्या सचिन पोटे, मुरबाडमध्ये शरद पवारांच्या शैलेश वडनेरे भिवंडी पश्चिम मध्ये कॉंग्रेसच्या विलास पाटील मिरा भायंदर मध्ये कॉंग्रेसच्या हंसकुमार पांडे यानी बंडखोरी केली आहे.

भिवंडी पूर्व मध्ये देखील सपाचे रईस शेख आणि शिवसेना उबाठा चे रुपेश म्हात्रे दोघेही मैदानात आहेत. याशिवाय माढा, मोहोळ अश्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बहुचर्चित जागांवर आयत्या वेळी उमेदवार बदलण्यात आल्याने बंडखोरी झाली आहेच. तर नागपूरात कॉंग्रेसच्या अनिस अहमद यांनी वंचितमध्ये जात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
https://www.sanvadmedia.com/bachengetoladeenge/
Social Media