मुंबई : राज्यातील अंतिम वर्ष परिक्षांवरून सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवल्यानंतर राज्याचे राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. या पत्रात आदित्य ठाकरेंनी परिक्षेच्या विषयात लक्ष घालण्याचे केले आवाहन केले आहे. कोरोना संकटामुळे ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहूनही परिक्षा न घेण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक वर्षाची सुरूवात जून २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यावर विचार असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतःच ट्विट करून या पत्राची माहिती दिली आहे. आपण सगळेच कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परिक्षांकडे मला तुमचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. महामारीच्या या काळात अनेक अभ्यासक्रमांच्या परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. याबाबत तुम्ही लक्ष द्यावे. तसेच जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते. पण महामारीच्या या काळात जानेवारी २०२१पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची परवानगी द्यावी ही विनंती देखील या पत्रातून करण्यात आली आहे. वास्तविक पाहता आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे युवा नेता म्हणून या विषयात लक्ष घातले आहे.
अंतिम वर्ष परिक्षांच्या विषयावर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे पत्र अपेक्षीत असताना राजशिष्टाचार मंत्र्यानी पंतप्रधानाना असे पत्र पाठविणे अनाकलनीय असल्याचा सूर मंत्रालयातील अधिका-यांच्या लॉबीत होता. मात्र हे पत्र लक्ष वेधण्यासाठी असल्याचा सूचक संदेशही देण्यात येत आहे या कडे या अधिका-यांनी लक्ष वेधले!.