संत संग देई सदा…

“भक्तीपाशी देव घाली तसे उडी, धूत असे घोडी अर्जुनाची”. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा(Tukaram Maharaj ) अभंग भक्ती तत्वाचं यथासांग निरूपण करणारा असा आहे. भक्ती हे अध्यात्म शास्त्रातले सर्वश्रेष्ठ असे तत्व आहे. कारण भगवंताला भक्त आणि भक्ती (Devotees and Devotion )याशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही.

देव तर भक्तासाठी उडी घालताना दिसतो. मग तुकाराम महाराजांनी, भक्तासाठी न म्हणता, भक्तीपाशी असं म्हटलंय. भक्तीमय अंतरंग असेल तर भक्तांचे हृद्य विशाल होऊन तो विश्वात्मक भूमिकेवर आरूढ होतो. भक्ती हाच आत्मदर्षणाचा राजमार्ग आहे. भक्तीच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी नीतीच्या मंदिराकडे जावेच लागते.

निर्गुण निराकार अशा परब्रह्माला सगुण साकार करण्याचे सामर्थ्य फक्त भक्तीच्याच ठिकाणी आहे असा तुकोबांचा अनुभव आहे. अन्यथा क्षीरसागराचा आपला निवांत निवास सोडून भगवंताला या भूतलावर येण्याचं कारणच काय?

संत तुकाराम महाराज १७ व्या शतकातील वारकरी संत म्हणून ओळखले जातात. सामन्यां सारखा संसार करून, त्यातील दुःख भोगून, आनंदाची प्राप्ती करून घेणारा, हा असामान्य संत. त्यामुळे इतर संतापेक्षा तुकोबारायां बद्दल नेहमीच आत्यंतिक जिव्हाळा वाटत आला आहे. यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले. यांचा जन्म इसवी सन १५९८ मध्ये देहू(dehu) येथे झाला. वाडवडील देहूचे महाजन. हे घराणे अत्यंत सधन होते व पूर्वापार विठ्ठल भक्ती त्यांच्या घरात होती. “जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे” ही तुकोबांची वृत्ती होती. या सधन संपन्न घराण्यावर नियतीची वक्रदृष्टी गेली. ऐन तारुण्यात पराकोटीचे प्रापंचिक दु:ख तुकोबांच्या वाट्याला आले. आपत्ती, दुःख, चिंता आणि अपमान यांनी दु:खी झालेल्या तुकारामांनी, गावाबाहेरील डोंगराचा एकांत स्वीकारला. हेच दु:ख त्यांच्या परमार्थाला अनुकूल ठरले. जीवनाला सामोरे जाण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात उतरला. ईश्वरचिंतन झाले. स्वप्नदृष्टांत झाला. श्री. केशवचैतन्य यांचेकडून “राम कृष्ण हरी” हा मंत्र त्यांना मिळाला. अत्यंत श्रद्धेने अभ्यासाबरोबर नामस्मरण सुरु झाले. गीता, भागवत हे तुकोबांचे आवडते ग्रंथ. याशिवाय त्यांनी पुराण, विष्णू सहस्त्रनाम, भर्तृहरीची नितीशतके आणि वैराग्य शतके यांचा सखोल अभ्यास केला. आता हळूहळू आपल्या आराध्याची, विठ्ठलाची ओढ(Vitthal’s passion ) तुकोबांना लागली. कधी आपल्या विठ्ठलाला भेटतो असं होवून गेलं. मनाची तडफड व्हायला लागली.

महाराज म्हणतात, “कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठाव असेल तुम्हा कोण”.
“नामदेवे केले स्वप्नामाजी जागे, सवे पांडुरंगे येवोनिया | सांगितले काम करावे कवित्व| वाउगे निमित्य बोलो नये|” अशी आपल्या कवित्व स्फुर्तीची कथा त्यांनी सांगितली आहे. आता, तुकोबांची अभंग रचना सुरू झाली. महाराजांच कार्यक्षेत्र हे देहूच. परंतु पंढरीची वारी मात्र कधी चुकली नाही. तुकोबांनी पंढरीला माहेर म्हटल आहे. “माझिया माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला”. तुकोबांचा पिंड जसा भावना प्रधान भक्ताचा होता, तसाच परखड समाज सुधारकाचाही होता. अनेक संघर्षांचे प्रसंग त्यांच्या जीवनात आले. दाम्भिक्तेच्या आहारी गेलेल्यांचा त्यांनी आपल्या अभंगांतून चांगलाच समाचार घेतला. ढोंगी, दुर्वर्तनी, आणि समाजाला रसातळाला नेणाऱ्या वृत्ती-प्रवृतीन्वर त्यांनी घणाघाती प्रहार केलेत. “वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव, इतरांनी वहावा भार माथा|’ असे परखड विधान ते करतात.

तुकाराम महाराजांचे अभंग हे भवसागर पार करण्याचा अक्षय्य सेतू आहे. काव्य आणि तत्वज्ञान यांचे सुरेख मिलन त्यात आहे. म्हणूनच सर्व कीर्तनकार त्यांचे विविध अभंग निरूपणासाठी घेतात.
“तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, वेगे घाली उडी नारायणा”. ही तुकोबांनी तळमळून केलेली प्रार्थना आहे. कारण “प्रार्थनेचा हा परिणाम, सतीस द्रवला यमधर्म, नि मुमुक्शुस मुक्तिधाम लाभतची| प्रा. स्तोत्र|

निर्वाणीचा प्रसंग आल्याशिवाय कोणी उडी घेत नाही किंवा उडी घालीत नाही, एवढे खरे. म्हणजे उडी घालण्याचा संबंध निर्वाणीच्या वेळेशी बांधला आहे. मग भगवान देखील निर्वाणीच्या प्रसंगीच उडी घालतो आणि असा निर्वाणीचा प्रसंग यायचा असेल तर भक्ताला भक्ति नुसती करून भागत नाही तर ती आपल्या कृतीने सिद्ध करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी”. सद्गुरुपाशी शरणागती एकाएकी किंवा सहज पत्करता येत नाही. त्यासाठी नश्वर देहाला विसरून त्यातील आत्म्यावर प्रेम, त्या प्रेमासाठी यज्ञ, यज्ञ सिद्धीसाठी अहंत्याग, या क्रमाने परमज्ञान, ज्ञानजन्य निष्काम सेवाभाव आणि त्याच बरोबर संयम यांची जोड करावी तेव्हा सद्गुरुपाशी शरणागती पत्करण्याचा अधिकार प्राप्त होतो. भक्तीमध्ये पराभक्ती, गौणीभक्ती असे प्रकार आहेत. नारद भक्ती सूत्रात खऱ्या भक्ताचे लक्षण सांगताना देवर्षी नारद म्हणतात, ”भक्ता एकांतीनो मुख्या:”. परमेश्वराशिवाय अन्य कुणाचाही आश्रय नाही अशी दृढ श्रद्धा म्हणजे अनन्याश्रयी भक्ती. ही श्रेष्ठ भक्ती आहे. तर प्रसंग पडेल त्या त्या वेळी जो जो आश्रय उपयुक्त वाटतो तो स्वीकारणारी वृत्ती, म्हणजे गौण भक्ती. अशावेळी भक्त पण दोन प्रकारांचे होतात. परमभक्त (अनन्याश्रयी) आणि गौणभक्त (अन्याश्रयी). देव भक्तापाशी उडी घालतो म्हणजे परमभक्त जे आहेत त्यांच्यासाठी उडी घालतो.

अध्यात्म शास्त्त्रात भक्ती हे सर्वोच्च तत्व म्हणून मान्यता पावले आहे. या श्रेष्ठतम तत्वाचा सिद्धांत तुकोबांनी आपल्या अनुभवातून सांगितला आहे. म्हणजे महाराजांची अनुभूती किती विलक्षण असेल याची कल्पना येते. तुकोबाराय म्हणतात, “सकल देवांचे दैवत, सद्गुरूनाथ एकला”. स्वतःचे अस्तित्व अर्पण केल्याशिवाय गुरू-शिष्य नात्यात एकरूपता प्राप्त होत नाही. सद्गुरू कृपेने कुठलेही कार्य अशक्य नाही.

तुकाराम महाराज, देवाचे गोडवे गाताना म्हणतात की, देव हा आपल्याविषयी भक्ताच्या अन्त:करणात असणाऱ्या गोडीचे ग्रहण करतो व आपल्या विषयी भावाची जोड़ किती आहे हे पाहतो. याचा अर्थ देवाचे नाव घेताना ते वर-वर न घेता अंत:करणापासून घेतले पाहिजे. दिवसभर काम-धंदा सोडून वर-वर देवपूजा करण्यापेक्षा थोडावेळ जरी अंत:करणा पासून नामस्मरण घेतले तरी देवाला गोड वाटते.

तुकाराम महाराजांची पांडुरंगावर असीम भक्ती. त्यांची साधना ही पराकोटीची. अशावेळी भगवान दत्तात्रेय त्यांना दर्शन देवून जातात. “नमन माझे गुरुराया, महाराजा दत्तात्रेया”. या भगवान दत्तात्रेयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शनच दिलेलं. या दत्तात्रेयांच्या लोभस आणि गोंडस रूपाचे सुंदर वर्णन तुकोबाराय करतात, “तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत| काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे ध्यान | माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर | शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती | तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार|”.

तुकाराम महाराजानी पांडूरंगाची एवढी भक्ति केली की आता ते म्हणतात, “आता देवा, तुझ्याकडून सर्व काही प्राप्त झाले। तुझ्या भक्तितच सर्व काही मिळाले”. त्यामुळे तुमच्या भक्तिशिवाय दूसरा कुठलाही भाव अंत:करणात होवू देवू नका. तुकाराम महाराजाना पांडूरंगाच्या भक्तित सर्व सुख प्राप्त झाले. त्याना आता या त्रैलोक्यात पांडूरंगाची पावले दिसतात। सारा आसमंत(त्रैलोक्य) पांडूरंगाच्या स्वरुपाने व्यापला आहे असे वाटते.

वास्तविक पांडुरंग स्वरूप झाल्यावर, महाराजांना भक्तीची काहीच गरज नव्हती. ज्ञानाशिवाय भक्ती टिकत नाही. ती टिकवायला तिला ज्ञानाची जोड पाहिजे. भक्ती फळली तरी ज्ञान तिला आपल्या मुलभूत प्रार्थनेची, शरणागतीची अखंड दिशा दाखवीत असते. तुकोबाराय म्हणतात, “आधी होता संतसंत, तुका झाला पांडुरंग| त्याचे भजन राहीना, मुळ स्वभाव जाईना ||.

भगवंत ज्यांना ज्यांना आपलासा करतो, त्यांची त्यांची लय तो आपल्याकडे लावून घेतो. ध्रुव बाळाचं, भक्त प्रल्हादाच उदाहरण म्हणजे, भगवंताची नी:सिम कृपाच. “वैराग्याच्या वाटूलीत, सहाय्यक सद्गुरुनाथ, भक्तांना भगवंत, आपुलासा |प्रा. स्तोत्र|.

संतांचे लौकिक-पारलौकिक चरित्र अद्भुत, अलौकिक असते. तुकाराम महाराजांचे चरित्र त्यांच्या जीवनातील चढ-उतार, त्यांचे विरोधक, शिष्य यांमधून फुलत जाते. त्यांच्या चरीत्रा मधुन भक्त, साधक व संत या अध्यात्मिक प्रगतीच्या अवस्था समजून घेता येतात.

आपले अवतार कार्य झाल्याचे जेव्हा तुकाराम महाराजांना जाणवू लागले तेव्हा ते म्हणतात, “आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा”| शके १५७२, फाल्गुन वद्य द्वितीया, या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले. तीच तुकाराम बीज.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असं मागण मागणाऱ्या संत श्रेष्ठ तुकोबारायांना त्यांच्या नीजगमन दिनी कोटी कोटी प्रणाम. अशा या “आकाशा एवढ्या” संतास एकच प्रार्थना ”न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा||”

 

श्रीकांत तिजारे
९४२३३८३९६६

Social Media