मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore)यांनी राजीनामा दिल्याची घोषणा आज अखेर केली आहे. गेल्या वीस दिवसांपासून बंजारा समाजातील तरूणी पुजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी माध्यमांतून विरोधकांनी आपली व्यक्तिगत ,समाजाची आणि पक्षाची बदनामी केली आहे. विरोधकांनी त्या प्रकरणात घाणेरडे राजकारण करत अधिवेशन चालू न देण्याची धमकी दिली आहे त्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे राठोड यांनी जाहीर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षाचे सचिव खा. अनिल देसाई आणि संसदीय कार्यमंत्री ऍड अनिल परब उपस्थित होते.
अटक करून चौकशी नको, तपास पूर्ण झाल्याशिवाय मंजूरी नको : अटीशर्तीवर राजीनामा?
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सहकुटूंब वर्षा निवासस्थानी भेट घेवून संजय राठोड यांनी त्यांना पुजा चव्हाण प्रकरणी अटक करू नये आणि चौकशी पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा राज्यपलांकडे पाठवू नये अशी विनंती केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. संजय राठोड यांच्या प्रकरणात राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्र्यावर विरोधीपक्ष भाजपने राजकीय दबाव बनविला होताच या शिवाय महाविकास आघाडीच्या घटकपक्ष असलेल्या दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील त्यासाठी राजकीय दबाव तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणी राठोड यांनाच वर्षा निवास स्थानी राजीनामा देण्याची घोषणा करण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात येत आहे.
फौजदारी गुन्हा दाखल करा
या प्रकरणी राजीनामा मुख्यमंत्र्यानी स्विकारून राज्यपालांकडे पाठवू नये तसेच पुजा चव्हाण प्रकरणी निष्पक्ष चौकशी करताना अटक करू नये अशी मागणी राठोड यांच्या कुटूंबियानी मुख्यमंत्र्याना भेटून केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केवळ राजीनामा देवून काम संपणार नसून या प्रकरणी राठोड यांच्यावर फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी राजीनामा दिल्याने भाजप शांत बसणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की या प्रकरणी योग्य तो तपास झाला पाहीजे आणि दोषी व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाइ देखील झाली पाहिजे.
निर्दोषीत्व सिध्द व्हावे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नबाब मलिक यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ते म्हणाले की, राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि त्याबाबत माहिती देतील. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी होवून त्यात राठोड यांचा दोष नसल्यास ते देखील समाजासमोर येण्याची गरज असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे