“गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला” म्हटलं की, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके, डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, अंगात चिंध्यांचा सदरा अन गळ्यात अटकविलेली एक लहानशी पिशवी असा पेहराव असलेले आणि संपूर्ण समाज मनाला भुरळ घालणारे व्यक्तिमत्व, म्हणजे संत गाडगे बाबा, यांची मूर्ती समोर येते.
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”| हा तुकाराम महाराजांचा अभंग. आजही त्याची गोडी अवीट आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांची कर्मभूमी आहे. येथील मरगळलेल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य यांच्यात होते. त्यानीच येथील माणसाला अंधकारातून बाहेर पडण्याची वाट दाखविली.
श्री गाडगेबाबा, वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले एक महान क्रांतिकारक साधू आणि समाज सुधारक होते. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगे बाबा अधिक रमत. सामान्य माणसाच्या दुःखावर फुंकर मारून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन, त्यांचे अश्रू पुसून, त्यांना दिलासा देणारा, महापुरुष, समाजाच्या उन्नतीसाठी गाडगेबाबांनी आपले आयुष्य वेचले. रंजल्या-गांजल्या बद्दलचा कळवळा त्यांच्या ठिकाणी होता. तो ठायीठायी जाणवत होता. कीर्तना सारख्या माध्यमातून अगदी निरक्षर माणसालाही सहजगत्या आकलन होऊ शकेल अशा शब्दांत ते समाज प्रबोधन करीत. कीर्तनातून रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याची किमया त्यांच्या ठिकाणी होती. ते समाजशिक्षक होते, प्रबोधनकार होते म्हणून त्यांच्या बद्दलची ओढ जनमानसात होती. आजही आहे.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी विसाव्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली. “महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ” असे उद्गार संत गाडगेबाबांच्या संदर्भात आचार्य अत्रे यांनी काढले आहेत.
अशा या थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारकांचा जन्म, अमरावती जिल्ह्यातील, शेणगाव येथे, २३ फेब्रुवारी १८७६ रोजी परिट म्हणजेच धोबी कुटुंबात झाला. वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचं नाव सखुबाई. महाराजांचे मूळ नाव “डेबू”जी जाणोरकर असे होते. संपूर्ण भारतात ते विविध नावांनी ओळखले जात. चापरेबुवा, गोधडे महाराज, लोटके महाराज, चिंधेबुवा, “बाबा”, अशी त्यांची ओळख. परंतु नावाला प्रसिद्धी मिळाली ती “गाडगेबाबा” म्हणूनच. माणसाला माणुसकी शिकविणारे असे हे महान नाव, “गाडगे बाबा”.
अखंड कष्टांची, साहसाची, आवड उपजतच त्यांच्या अंगी वाढल्यामुळे, ते कणखर बनत गेले. पडेल ते काम कुशलतेने करायचे, ही डेबूजींची कर्मयोगी वृत्ती लहानपणापासूनच होती.
काही माणसांचा जन्म स्वतःसाठी नसतोच मुळी. “देह कष्टविती, परोपकारे”. लोकांसाठी देह झिजवणे हा त्यांचा जीवनधर्म. रंजल्या-गांजल्या साठी वात्सल्य ओसंडून वाहणारा एकच त्यांचा चेहरा. “कनवाळू” हे नामाभिदान अगदी चपखल बसावं अशा व्यक्तिमत्वाचे ते धनी. लहानपणापासूनच भजन, कीर्तनाची आवड आणि परोपकारी वृत्ती असल्यामुळे पुढे समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचे प्रामुख्याने बोलीचा भाषेचा उपयोग करीत असत.
त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये, जातीभेद, अस्पृश्यता पळू नये, गरीब श्रीमंत असा भेट करू नये, निराश्रीताना आसरा द्यावा, बेरोजगारांना काम द्यावे, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनातून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. आपल्या कीर्तनातून लोकजागृती करत. देव दगडात नसून तो माणसांत आहे, आपण आपल्या मुलांना शिक्षित करा, स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्या, हा बहुमोल उपदेश त्यांनी कीर्तनातून सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरू मानीत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकां पर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत.
अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात देव देव न करताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी-सरळ शिकवण त्यांनी समाजात दिली. संतसेवा ही केवळ त्यांचे अभंग गावून होत नाही. त्यांचे विचार आचरणात आणले तर खरी संत सेवा. गाडगे बाबांनी “आधी केले मग सांगितले”. त्यांनी आपल्या उक्ती आणि कृतीत कधीच अंतर ठेवले नाही. म्हणूनच गाडगे महाराजांविषयी संपूर्ण समाजात कमालीचा आदर भाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. आत्यंतिक निरिच्छता हा गाडगे बाबांच्या चारित्र्याचा आत्मा.
स्वच्छता प्रामाणिकपणा व भूतदया यावर त्यांचा विशेष भर असे. बाबांनी खराट्याचा धर्म जगाला दिला. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. तीर्थक्षेत्री ते जात, परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करीत. कोणत्याही गावात प्रवेश करताच हाती खराटा घेऊन जेथे-जेथे घाण दिसेल ती दूर करावी, स्वच्छतेचा प्रकाश निर्माण करावा. “स्वच्छता दूत” म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या मातीस बहुमुल्य योगदान दिले.
खाण्यापिण्याच्या बाबतीत ही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी भाकर मागून आणून खात. अध्यात्माला विज्ञानाच्या परिसरावर घासण्याचा हितोपदेश गाडगे महाराजांनी केला.
गाडगे बाबा त्यांचा देव नेहमी गोर गरीब जनता जनार्दनात पहायचे. तीर्थक्षेत्री, गाडगे बाबांनी देवालये, मंदिरे बांधली नाहीत, तर तिथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी निवाऱ्याची सोय केली. तीर्थक्षेत्री धर्मशाळा, नद्यांना घाट, पाणपोया बांधल्या. रुग्णालयांच्या शेजारी धर्मशाळा बांधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याची सोय केली. भुकेलेल्यांना अन्न हा मंत्र बाबांनी प्रथम सांगितला. त्यांच्या पूर्ततेसाठी अंध, अपंग, आजारी, निराश्रित स्त्रिया आणि मुले यांच्या करता नाशिक येथे “सदावर्त” ची स्थापना करून बाबांनी दुःखितांचे पालकत्व स्वीकारले. अनेक कुष्ठरोग्यांची दु:खे बाबांनी जाणलीत. त्यांना मायेची फुंकर घातली. आळंदीला प्रयत्नपूर्वक कुष्ठाश्रम सुरु केला. दीनदुबळ्याची, आंधळ्या पांगळ्यांनची म्हाताऱ्यांची, कुष्ठरोग्यांची सेवा हीच परमात्म्याची पूजा असे ते मानत. यातच त्यांच्या मानवधर्माची महानता सामावलेली आहे.
संत गाडगे महाराजांच्या आयुष्यात त्यांना शिक्षण मिळाले नाही, परंतू निरक्षर असूनही शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार सतत प्रेरणा देणारे ठरतात. शिक्षणाचा, प्रबोधनाचा जागर घालताना ते म्हणतात, “खर्चू नका देवासाठी पैसा। शिक्षणाला पैसा तोच द्या हो॥.
अनेक ठिकाणी, आदिवासी समाजाच्या मुलांसाठी आश्रम शाळा काढल्या. भटक्या मुला-मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केल्या. मुलांच्या राहण्याची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे मुलांकरता वसतिगृहे स्थापन करून विद्यार्थ्यांना निवार्या ची व्यवस्था त्यांनी केली. मुलींकरता वसतिगृहही त्यांनी सुरू केले. याशिवाय माध्यमिक शाळा, संस्कार केंद्र, वृद्धाश्रम स्थापन करून बाबांनी पर्वतकाय कार्य केले आहे.
सामान्यजनांसाठी विहिरी बांधल्या, पाणपोया सुरू केल्या, रस्ते बांधले, वाचनालय सुरू केलीत. बहुजन समाजात बाबांनी क्रांती घडवून आणली. समाजाच्या अंतःकरणातील अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा मळभ बाहेर काढला व त्याठिकाणी ज्ञानाचा उजेड बसविला.
गाडगेबाबांनी त्यांच्या हयातीत पंधरा धर्मशाळा बांधल्या. गाडगे बाबांचे स्मारक म्हणजे धर्मशाळा, गाडगेबाबांची आठवण म्हणजे गोरक्षण. एक निरक्षर वैरागी साधुपुरुष केवळ डोंगराएवढं काम करू शकतो याची निश्चित कल्पना येईल. तुकडोजी महाराजांनी, संत गाडगे बाबांना “मानवतेचा मूर्तिमंत आदर्श” असं म्हटलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, “गरीबांचा कैवारी”. प्रबोधनकार के. सी. ठाकरे त्यांना “महाराष्ट्रातील मार्क्सवादाचे संस्थापक” असं म्हणतात, तर ग. त्र्यं. माडखोलकरांनी त्यांना “मानवतेचे दीक्षा गुरु” असं म्हटलं आहे.
आज “स्वच्छ भारत मिशन” ही एक चळवळ आहे. परंतु याची खरी मुहूर्तमेढ गाडगे बाबांनी केली होती. गाडगे बाबांनी सांगितलेली दशसूत्री आजही विचार करण्यास भाग पाडते. प्रत्येकाला शिक्षण, बेघरांना आसरा, उघड्या नागड्याला वस्त्र, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी, बेरोजगारांना रोजगार यासारख्या समस्या “आ” वासून उभ्या आहेतच. या दशसुत्रीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गाडगे बाबांचे विचार आत्मसात करून त्या अनुषंगाने पावुले उचलण्याचा आपण साऱ्यांनी निर्धार करायला हवा. ही दशसूत्री म्हणजेच “सब समाज को लिये साथ मे, आगे है बढते जाना”. कारण, “सेवा परमो धर्म” हाच आपला रोकडा धर्म आहे.
समृद्ध समाज घडवण्याकरिता, समाजातील तळागाळातील अंध, अपंग, रोगी, निराश्रित, दिन दुबळ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी, अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करून आयुष्यभर चंदनासारखा झिजणारा, माणसात देव शोधणारा संत, एक थोर क्षमाशील, अशा निष्काम कर्मयोग्याने २० डिसेंबर १९५६, मार्गशीर्ष चतुर्थी, या दिवशी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकाभिमुख चतुरस्त्र, लोकसंघटक अशा या माणसातील “देवमाणसाला” कोटी कोटी प्रणाम.
श्रीकांत भास्कर तिजारे.
९४२३३८३९६६