संविधान वाचवणे हीच महामानवास खरी आदरांजली ठरेल !: नाना पटोले

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देशाचा कारभार आतापर्यंत चालत आला आहे. मात्र मागील काही वर्षापासून संविधानातील मुल तत्वांना तिलांजली दिली जात असून संविधानच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असून हिच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी म्हटले आहे.

पटोले पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची व्यवस्था केली. त्यांच्यामुळेच सर्वसामान्य समाज घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. संविधानाने सर्व समाज घटकांना समान न्यायाचा मार्ग दाखवला. हजारो वर्षे अन्याय, अत्याचार सहन करावा लागणाऱ्या वंचित, मागास घटकाला बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, हा मंत्र देऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात नवी ओळख देण्याचे क्रांतीकारी कार्य केले आहे. बाबासाहेबांनी घालून दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचारच या देशासाठी हिताचा आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच वाटचाल करुयात आणि संविधान वाचवुयात असे आवाहन पटोले यांनी केले.

टिळक भवन येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

घटनाकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्यालय टिळक भवन, दादर येथे पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Social Media