वाशिम : नमस्कार, मी संगीता मारोती ढोले. जिल्हा वाशीम. पोलीस सेवेमध्ये 13 वर्ष पूर्ण झाले. 2020 हे वर्ष कोरोना महामारीचं आहे. कधी विचार सुद्धा केला नव्हता अशी परिस्थिती आपल्या समोर येईल. मी काम करणारी महिला म्हणजे नौकरी व्यतिरिक्त काही सामाजिक काम करण्याची खूप इच्छा असलेली महिला. शिवाय प्रोफेशन सुध्दा चांगल “पोलीस”.
लॉक डाऊन च्या काळात मी माझे कर्तव्य बजावत असतांना मनाला हळवं करणारे दृश्य समोर आले. लोक उपाशी-तापाशी अनवाणी पायाने स्वगावी जात होते. अशी अवस्था पाहून कशी चूप राहू. नाही राहवलं आणि स्वतः 30 ते 40 डब्बे तयार करून पीडित व्यक्ती ना देत होते. जवळपास 3 ते 4 महिने मी डब्बे तयार केले.
हे सर्व कर्तव्य पार पाडत असताना का तर मन असमाधानी होतं. कारण दररोज नवीन समस्या डोळ्यासमोर यायच्या. लोक पाल टाकून राहत होते. तर कुणाकडे तेही नाही अक्षरशः रस्त्याच्या कडेला थकून झोपत होते. तेव्हा ठरवलं पाल टाकून द्यायची, जेवण आणि अन्न धान्य सोबत कपडे सुध्दा. असा उपक्रम नित्यनेमाने चालू केला. आणि एकदाची सुरुवात झाली. मन समाधानी झालं.
याच पाल टाकून असलेल्या लोकांच्या मुलांना सेलू फाटा च्या कडेला इकडे तिकडे खेळताना पाहून एक दिवस विचारणा केली ” मुलांनो तुम्ही शाळेत जायचे का?” मुलं म्हणाली नाही, शिकून काय करायचं. मी त्यांना विश्वासात घेतलं. आणि उन्हात तसेच पावसातही “पाळातील शाळा” सुरू केली.
सुरुवातीला 13 मुलं होती. अतिशय अस्वच्छता मध्ये राहत होती. त्यांना स्वच्छता विषयी सांगितले. आजूबाजूला अस्वच्छता होती तो परिसर स्वच्छ केला. त्यानंतर बोलायचे कसे हेही शिकवले. ही मुलं गुटखा, तंबाखू खायची तेही सोडायला प्रवृत्त केलं. अंधश्रद्धा तर विचारूच नका, कपडे घातले की मळवले, तेही स्वच्छ केले. केसांची कटिंग केली. आणि दररोज काही तरी नवीन काही खायला देत होते.
आता माझ्या पाळातील शाळेत 35 मुलं-मुली आहेत. त्यांना शिक्षण म्हणजे काय समजायला लागलं आहे. शिक्षण सोबत आपल्या समोर आदर्श असलेले महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गांधीजी, सावित्रीबाई, राजश्री शाहू महाराज अश्या अनेक लोकांची माहिती यांना देण्यात येते.
येथील मुलांना आवश्यकता आहे ती म्हणजे शाळेत ऍडमिशन करण्याची. आणि कायमस्वरूपी राहत घर, आधार कार्ड, रेशनकार्ड, शासकीय योजनांची. कोरोना परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला नकारात्मक न घेता या मुलांमुळे मी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मार्गावर आणू शकले. असे कित्येक मुलं आहेत जे शाळाबाह्य आहेत. गरिबी म्हणजे काय हे मला माहिती आहे आणि आजही हेच चित्र मी पाहत आहे. मला एक कळकळीची विनंती करायची आहे की अश्या मुलांना मायेचा आधार मिळाला की आपण त्यांना चांगल्या प्रवाहात आणू शकतो.
माझा संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे. मला सांगा अशी मुलं आहेत. मी त्यांना प्रोत्साहन देईल आणि शिक्षणाच्या मार्गावर आणेल. माझी मुलं एवढी हुशार आहेत की त्यांना शिकवताना उलट मन प्रसन्न होते. माझी मुलं समोर जाऊन कलेक्टर, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, सुशिक्षित शेतकरी आणि बरेच काही छान पदावर असतील. मला आशा आणि अपेक्षा आहे आपली साथ मला मिळेलचं.
7218896875 Lpc- संगीता ढोले, वाशिम शहर