महाड : रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये २२ जुलै ला आलेल्या महाभयंकर पुरात अख्खे शहर जलमय झाले होते. पुराचे पाणी शहरातील ऐतिहासिक चवदार तळ्यात ही घुसल्यामुळे त्यात गाळ भरला व सर्व पाणी दूषित झाले, महाड नगरपरिषदेच्या वतीने हे तळे गाळ व कचरा काढून साफ करण्याचे काम सध्या सुरू असून उपसा झाल्यानंतर या तळ्यात असणाऱ्या चौदा विहिरिंपैकी अकरा विहिरींचे दर्शन झाले असून महाडच्या नवीन पिढीला या विहीरी पहिल्यांदा पहावयास मिळत आहेत.
राष्ट्रीय स्मारक असलेल्या महाडच्या चवदार तळ्यात चौदा विहिरी असल्याने या तळ्याला चवदार तळे म्हणून संबोधले जाते, असे येथील जुने जाणते व जेष्ठ नागरिक सांगतात. चौदापैकी १२ विहिरी ह्या गोलाकार असून दोन विहिरी चौकोनी आहेत. या चौदा विहिरी मधील झऱ्यांपासून साठणाऱ्या पाण्याने बाराही महिने तळ्यात पाणी भरलेले असते तसा उल्लेख ही काही लिखाणात आढळतो, चवदार तळ्यात चौदा विहीरी आहेत हे आताच्या पिढीला माहीतही नसेल.
22 जुलै रोजी आलेल्या भीषण पुरामुळे चवदार तळ्यातील पाणी दूषित झाल्याने यातील पाण्याचा पूर्ण उपसा नगरपरिषदेने केल्याने तळ्याच्या पाण्याखाली असलेल्या विहिरी आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. त्यामुळे सध्या या विहिरी पाहण्यासाठी महाडकरांची गर्दी चवदार तळे येथे दिसू लागली आहे.
महाड शहरात दरवर्षी सावित्री नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी शहरात काही भागात शिरते. मात्र चवदार तळे आणि परिसरात आतापर्यत पुराचे पाणी शिरले कधीच शिरले नव्हते.मात्र यावेळी चवदार तळ्यालाही या पुराचा मोठा फटका बसला. यावर्षी चवदार तळ्यातील पाणीही दूषित होऊन कचरा साचला होता.