इस्लामाबाद: पाकिस्तानी नेते अनेकदा आपल्या देशाची तुलना भारताशी करतात. यातील सर्वात अलीकडची तुलना पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे.
शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शहबाज शरीफ म्हणाले, “जर आम्ही भारताला मागे टाकले नाही, तर माझे नाव बदला.” मात्र, शहबाज शरीफ यांचे हे आव्हान युद्धाबाबत नव्हते, तर प्रगतीबाबत होते. त्यांनी सांगितले की, जर पाकिस्तान विकासाच्या बाबतीत भारताच्या पुढे गेला नाही, तर “माझे नाव शहबाज शरीफ(Shehbaz Sharif) नाही.”
शहबाज यांनी हे वक्तव्य डेरा गाझी खान येथे मोठ्या जमावाला संबोधित करताना केले. यावेळी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पाकिस्तानला सध्याच्या आव्हानांतून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.
जमावाला संबोधित करताना शहबाज आक्रमक स्वरात बोलले. त्यांनी शपथ घेत म्हटले, “जर आम्ही भारताला मागे टाकले नाही, तर माझे नाव शहबाज शरीफ नाही. आम्ही पाकिस्तानला महान राष्ट्र बनवू आणि भारताला मागे टाकू.”
पाकिस्तानी माध्यमांच्या अहवालानुसार, पंतप्रधान शरीफ यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांनी देशाला समृद्धीकडे नेण्याचे आश्वासन दिले.
शहबाज पुढे म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान कर्जावर अवलंबून न राहता स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. त्यांनी देशातील महागाई कमी झाल्याचा उल्लेख केला आणि दावा केला की, त्यांचे सरकार सत्तेत आले तेव्हा महागाई ४० टक्के होती, जी आता फक्त २ टक्क्यांवर आली आहे. दरम्यान, शरीफ यांच्या विधानाने पाकिस्तान आणि भारतातील सोशल मीडियावर बरीच चर्चा निर्माण झाली आहे. X या सोशल मीडिया मंचावरील अनेक वापरकर्त्यांना त्यांचे विधान हास्यास्पद वाटले आहे, तर काहींनी शहबाज शरीफ यांच्यासाठी नवीन नावे सुचवली आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला, शहबाज शरीफ(Shehbaz Sharif) यांनी भारताशी शांततापूर्ण संवादाची इच्छा व्यक्त केली होती आणि सर्व मुद्दे, विशेषतः वादग्रस्त काश्मीर विवाद, चर्चेद्वारे सोडवण्यास पाकिस्तान तयार असल्याचे सांगितले होते. हे वक्तव्य त्यांनी “काश्मीर एकता दिन” निमित्त मुजफ्फराबाद येथे पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभेच्या विशेष अधिवेशनात केले होते.