खऱ्या मराठी अस्मितेसाठी ‘शिंदे-फडणवीसांच्या’ इतिहासाची चाड ठेवून जागरूकपणे मतदान करावे.! : एका चर्चेचा गोषवारा!

राजदिप सरदेसाईंच्या एका पुस्तकातील ईडीच्या संदर्भातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कथित वक्तव्यांवरून सध्या राजकीय वादंग होताना दिसत आहेत. ‘अगा जे घडलेच नाही’ असा ‘यू टर्न’ नंतर भुजबळ यांनी नटसम्राटच्या स्टाईलमध्ये घेतला. पण त्या निमित्ताने वेगळ्याच चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. एका बड्या राजकीय नेत्यांच्या दिवाणखान्यात बसले असताना काही मित्रांच्या मग यावर गप्पा झाल्या त्यांचा सारांश आज जाणून घेवूया!

तर या गप्पांना सुरुवात झाली ती, महाराष्ट्र कवी राजा बढे यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गौरव गीताला महायुती सरकारने मागील कालखंडात राज्यगीताचा दर्जा दिला आहे त्यावरून. मात्र या मध्ये या गीताची दोन कडवी/अंतरे घेण्यात आले आहेत. पहिलाच आणि महत्वाचा अंतरा किंवा ख-या अर्थाने ‘कडवे’ (ज्या अर्थाने ते वगळण्यात आले!) महाराष्ट्राचे देशातील आणि इतिहासातील वेगळे अभिमानास्पद स्थान काय आहे ते सांगते.“ रेवा-वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भिमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा”मराठी माणसाचे दिल्लीवर राज्य असताना त्यांची घोडी यमुनेचे पाणी पित होती हा इतिहास आहे, तो या कडव्याला बाजुला करून बासनात बांधून ठेवण्यात आला आहे. अश्या मूळ गिताच्या शेवटच्या ओळी/कडवे ज्या कडव्या शब्दांचा राग सध्याच्या राज्यकर्त्यांना असावा असे एक मित्र म्हणाला. आता या ओळी का वगळण्यात आल्या असाव्यात? याचा संदर्भ इतिहास आणि वर्तमान यांची तुलना केली की लक्षात येवू शकेल, असो.


तर देशाच्या इतिहासात शिंदे-फडणवीस या नावांचा दबदबा काय आहे, हे तुम्हाला चांगलेच ज्ञात आहे. पानीपतच्या तिस-या लढाईत जबरदस्त शिकस्त खाल्ल्यानंतर नानासाहेब पेशव्यांचा अंत झाला. मग थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानीपताचा बदला घेण्यसाठी या युध्दात वाचलेल्या आणि एका पायाने अधू झालेल्या मराठा सरदार महादजींना जबाबदारी सोपवली होती. नंतर केवळ दहाच वर्षात पुन्हा एकदा उत्तरेत जावून पळून गेलेल्या औरंगजेबचा मुलगा बादशहा शाहआलम ला मराठ्यांशी पूर्वीच झालेल्या करारानुसार महादजीनी दिल्लीच्या तख्तावर बसविले आणि इंग्रजांसह परकीयांपासून दिल्लीचे सलग दहा वर्षे रक्षण केले. त्यात शिंदे-फडणवीस या जोडगोळीचा इतिहास फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय संदर्भात या इतिहास थोडा वेगळा असला तरी शिंदे-फडणवीस हे जोडनाव महाराष्ट्राच्या राजकारणात सन १७७१पासून पंचवीस वर्ष गाजले आहे इतकेच येथे लक्षात घ्यायला हवे.


खरेतर भानू घराण्यातील नाना म्हणजे काही पेशवे नव्हेत, ते बाळाजी विश्वनाथ यांच्या सोबत कोकणातून सातारच्या छत्रपती शाहूंच्या पदरी नोकरीसाठी आले. नंतर फडात फडणवीशी उत्तम करु लागल्याने भानू उपनाम जावून फडणवीस झाले. ते काही छत्रपती नव्हेत. आणि तीच गोष्ट महादजी म्हणजे काही पेशवे नव्हेत की छत्रपती नव्हेत. महादजींचे वडील राणोजी यांच्यावर विश्वासाने पहिले बाजीराव यांनी माळव्याच्या जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार सोपविला आणि नंतर ते पेशव्यांचे पिड्यानपिढ्या निष्ठावंत पाईक बनले. पण आपल्या प्रामाणिक कर्तव्यासाठी आणि तलवारीच्या इमानासाठी प्रचंड पराक्रमांची शक्ती, मुत्सदेगिरी असूनही प्रामाणिकपणे इतिहास गाजविणारे हे दोन महान धुरंधर महाराष्ट्रात होवून गेले आहेत. या दोघांचे कर्तृत्व त्यांच्या एकोप्यात आणि साथ देण्यात होते. त्या काळात जेंव्हा पेशव्यांच्या गादीवर किंवा छत्रपतींच्या गादीवर देखील त्या अर्थाने कुणी आदेश देणारा किंवा राज्यकर्ता म्हणवला जाणारा कर्तबगार व्यक्ती अस्तित्वात नव्हता. मात्र गद्दारी, फंदफितुरीच्या कोणत्याही अमिशाला बळी न पडता थोरल्या महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा धाक त्यानी भारतभर पुन्हा प्रस्थापीत केला होता.


म्हणूनच महाराष्ट्रात जेंव्हा राष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ येतो त्यावेळी येथील राजकीय नेत्यांचा उल्लेख करताना दिल्लीतून नेहमीच काळजी घेतली गेली आहे. याचे कारण वेळप्रसंगी दिल्लीला सुनावण्याची, किंवा काबीज करण्याची अथवा वाकविण्याची, वाचविण्याची धमक देशात जर कुणाकडे असेल तर ती महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये राहिली आहे. नव्हे हाच महाराष्ट्राचा इतिहास राहिला आहे.
पण आजच्या दिल्लीश्वरांना मात्र कदाचित इतिहासातील या मराठ्यांच्या पराक्रमाचे वावडे असावे, या पराक्रमी महाराष्ट्रात नव्या संदर्भाने ‘शिंदे-फडणवीस’ यांनाच आपल्या कच्छपी लावून महाराष्ट्रावर बदल्याच्या भावनेने सत्ता गाजविण्याचा त्यानी चंग बाधल्याचे गेल्या काही वर्षात पहायला मिळाले आहे.


मागील कालखंडात केवळ मुख्यमंत्रीपद भाजपला मिळाले नाही म्हणून भाजपने ते पाचही वर्षे शिवसेनेलाच या ना त्या प्रकारे देवू केले नाही का?. मात्र त्यासाठी महाराष्ट्रद्रोही राजकीय षडयंत्राचा खेळ, बदल्याचे राजकारण करण्यात आले. राष्ट्रवादीच्या मराठा स्ट्रॉंगहोल्ड राजकारणाला तोडण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राचे आर्थिक महत्व कमी करण्यासाठी शिंदे-फडणवीसांच्या मदतीने येथे येवू घातलेल्या कोट्यावधींच्या गुंतवणूकीचे प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात वळविण्यात आले. तर येथे असलेल्या बंदरे, जमिनी यांच्यावर परप्रांतीय कॉर्पोरेट घराण्यांचा कब्जा करताना महाराष्ट्राच्या तिजोरीचे अतोनात नुकसान करण्यात आले. मुंबई-महाराष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेवर डल्ला मारण्याच्या हेतूने कंत्राटे गुजराती आणि अन्य महाराष्ट्रा बाहेरच्या लोकांना देण्यात आली. अगदी इथल्या बॉलीवूडच्या ‘पेज थ्री’ला धाक घालून नोइडाला पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्यावर एनसीबी मार्फत गु्न्हे दाखल करण्याची मालिका करण्यात आली. त्यात नंतर किंगखानच्या सुपूत्रांलाही गोवण्यात आल्याचे आपण पाहिले. शेअर बाजाराचा कब्जा घेण्यात आला. आर्थिक केंद्र, हिरे-पन्ना बाजार सारेकाही गुजरातला हलविण्यात आले. महाराष्ट्राच्या मंत्रालयाचे निंयत्रण पीएमओच्या हाती देण्यात आले आणि सध्याचे ‘शिंदे-फडणवीस’ केवळ नामधारीच राहिले. त्यांना राज्याच्या निर्णयप्रक्रियेत अंकीत असल्यासारखे ‘सह्याजीराव’ इतकेच महत्व राहिले असे हा मित्र म्हणाला.  त्यासाठी त्यांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, प्रकल्प, निवीदांमध्ये मात्र त्यांना समाधान मानावे लागले. मात्र राज्याचा कारभार पंतप्रधान कार्यालयाच्या स्वाधीन झाला हे उघड सत्य आहे. त्यासाठी काही खास पिएमओमधील अधिका-यांची नियुक्ती महाराष्ट्रात करण्यात आली आणि येथे केवळ सनदी अधिका-यांच्या मदतीनेच अडीच वर्ष राज्यकारभार करण्यात आला. त्यासाठी मुंबईसह महत्वाच्या शहरात निवडणुका न घेता प्रशासक बसविण्यात आले. असे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये नंतर विरोधकांत असलेल्या अजीत पवार आणि अन्य नेत्यांना धाक घालून सहभागी करून घेण्यात आले. आणि एका अर्थाने कालचक्र उलटे फिरवल्याचे समाधान मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचा बदला घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.


त्यातूनच मग छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीच्या इतिहासाला वेगळेच परिमाण लावण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करण्यात आला, आणि स्थानिक नेत्यांच्या तोंडी महाराजांनी सूरतेची लूट केलीच नव्हती अशी विधाने वदवून घेण्यात आली. जेणे करून मराठी मुलुखाच्या अस्मितेवर मिठ चोळता यावे यासाठी भगतसिंग कोश्यारी यांच्या काळात छत्रपतींपासून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंपर्यत अवमान करण्यात आला. महाराष्ट्रात व्यापारांचे वैभव राजस्थानी-मारवाड्यांमुळे आहे असे सांगण्यात आले. मविआमध्ये राज्याच्या गृहमंत्र्यापासून अनेक नेत्यांना खोट्या प्रकरणात तुरूंगात पाठवून धाक बसविण्यात आला. इतिहासात मराठ्यांच्या शिंदे- फडणवीसांच्या काळात देशात जश्या प्रकारचा दबदबा मराठी माणसांचा होता त्याचा उलटा दबदबा मराठी माणसावर मिळवताना आसूरी बदल्याचा इतिहासातील मागच्या कालखंडातील दबलेला राग जणू वचपा काढावा तसाच काढण्यात आला आहे असे हा मित्र म्हणाला. याची जाणिव मात्र इतिहासात फूट पाडून दगलबाजी करणा-या मराठी लोकांना आजही झाल्याचे दिसत नाही. असा खेदही त्याने व्यक्त केला.


शिंदे-फडणवीस म्हणजे मराठा-ब्राम्हण एक झाले त्याचा हा इतिहास आहे. म्हणून व राज्यगीतामध्ये नेमक्या एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी या ओळी काढून टाकण्यात तर नाही आल्या ना? अशी शंका या मित्राने उपस्थित केली. शिंदे-फडणवीस यांनी हिकमतीने दिल्लीच्या बादशहाच्या राज्यात, छत्रपतींच्या वतीने देशावर राज्य केले होते. इतके की कोलकत्यात ब्रिटीशांनी भितीने मराठ्यांचा हल्ला होवू नये म्हणून शहराभोवती खंदक खोदले होते. आजही या ‘मराठा डिच’ चे अवशेष तेथे पहायला मिळतात. असा धाक आणि दबदबा मराठ्यांनी बसविला होता.

शिंदे-फडणवीस यांनी आधी माधवराव पेशव्यांसोबत आणि नंतर नारायणराव पेशवे यांचा खून झाल्यानंतर बारभाइचे कारस्थान करून मराठी साम्राज्य वाचविले, वाढविले होते. नव्हे छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील मराठी साम्राज्य पंचवीस वर्ष तलवार आणि मुत्सद्देगिरीच्या बळावर अबाधित राखले होते. त्यांच्या संदर्भाने पाहिले तर सध्याचा शिंदे-फडणवीस राजकीय अध्याय या इतिहासाच्या जवळपास पासंगालाही पुरताना दिसत नाही. म्हणून ख-या मराठी माणसाला सध्याच्या शिंदे-फडणवीसांच्या इतिहासाच्या या नव्या काळ्याकुट्ट अध्यायाला बाजुला करायचे असेल तर जागरूकपणे मतदान करायला हवे. मराठी आस्मितेसाठी दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा हा संदर्भ वेगळ्या पध्दतीने इतिहासात लिहिला जाणार नाही, दिल्लीचे तख्त राखण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून शिंदे-फडणवीसांचा वापर होणार नाही याची काळजी सुज्ञ सुजाण मतदारांना घ्यावीच लागणार आहे नाही का?

निवडणूक विशेष
किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

 

’ये लाल रंग कब मुझे छोडेगा?’ फडणवीसांच्या चिंतेचा नवा राजकीय संदर्भ !

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *