मुंबई : दरवर्षी १९ फेब्रुवारीला शासकीय निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मात्र यंदा शिवजयंतीच्या(Shiva Jayanti) आयोजनाला कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. मिशन बिगीन अगेन मध्ये अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरवले मात्र बुधवारी राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने गृहविभागाने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याविरोधात शिवजयंती(Shiva Jayanti) उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे.
शिवजयंतीला महाराष्ट्रात निर्बंध का?
राम कदम यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदूंचे स्वराज्य ज्यांनी सुरू केले त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडते ही शरमेची गोष्ट आहे. कदम यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत.