श्री दत्त, दत्त, जय श्री गुरुदेव दत्त…

भारत ही देवभूमी आहे. भारतभूमी ईश्वरी अवतारांची, संत महंताची भूमी आहे. आध्यात्मिक परंपरा हे भारतीय संस्कृतीचं प्रमुख लक्षण आहे.

श्रीगुरुभक्तीची, श्रीगुरूकृपेची पखरण करणारा हा मार्गशीर्ष मास.
“दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जय घोष या आठवड्यात सर्वच दत्त स्थानावरून तसेच घराघरां मधून ऐकायला मिळत आहेत.

“शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता.., श्रीगुरुदत्ता जय भगवंता., जय करुणा घन निज जन जीवन., निघालो घेवून दत्ताची पालखी.” असे त्रिपदीचे सूर कानावर पडत आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो.

“ब्रम्हा-विष्णू-महेश” हे त्रिमुर्ती म्हणजेच दत्तात्रय.
देव भक्तासाठी काहीही करायला सिद्ध असतो. आपण भक्त झालो, आपले वर्तन देवाला आवडेल, असे झाले, तर तो आपल्यासाठी हरघडी तत्पर असतो. अनसूयामातेच्या संदर्भातही तेच झाले. सत्व परीक्षेत मातेचे पातिव्रत्य जिंकलं आणि “अत्रीनंदन अनसूयानंदन अवधूत”, भगवान दत्तात्रय कायम स्वरूपी भूतलावर अवतरलेत.

दत्तावतार हा गुर्वावातर आहे. म्हणून त्यांना “गुरुणाम गुरु” असे म्हणतात. शांडिल्य उपनिषदात त्यांना “विश्वगुरू” म्हटले आहे. या विश्व गुरूंच्या अवताराबद्दल श्री श्रीधर स्वामींनी म्हटले आहे, “अवतारही अनेक होती| सवेची मागुती विलया जाती| तैसी नव्हे दत्तात्रेयमूर्ती| नाश कलयांती असेना||
हा दत्तात्रेय सतेज सुंदर कांतीचा असून दिगंबर आहे. तो सनातन सिद्ध असून, विधि, हरि आणि त्रिपुरारि या त्रयीचा समावेश असणारा पूर्णावतारी आहे. तो भागीरथीच्या तीरी नित्य आन्हिक उरकतो आणि करवीरांत भिक्षा मागतो.

दत्तात्रेय हा गुर्वावातर असल्याने कल्पांतीही तो बदलत नाही हे याचं वैशिष्ट्य आहे. विष्णुकार्यासाठी पृथ्वीवर दत्तात्रेयांनी अवतार घेतला. त्यांचे कार्य, पालन करणे, लोकांमध्ये भक्तीची ओढ निर्माण करणे आणि लोकांना आदर्श अन् आनंदी जीवन जगण्यास शिकवणे, हे आहे. जिथे असुया नाही तिथेच तर खरा आनंद आहे. “दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो, सावळ्या मला भेट द्या हो, दयाळा मला भेट द्या हो, अशा आर्त स्वरांच्या हाकेला हजर होणारे “श्री दत्तच”.
चोविस गुरूचा लावियला शोध । घेतलासे बोध विविधगुणी । दत्ताने २४ गुरु केले. यातून दत्त आपल्याला ‘सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे’, हे शिकवतात.

“ज्याच्या कृपेचा मज लाभ झाला, जन्मांतरीचा गुरुराज आला| श्री दत्त ऐसा मज बोध केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला|” भगवान दत्तात्रेयांचा उल्लेख साधक, परंपरेने “गुरुदेव” असा करतात. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे.

दत्त संप्रदायात आपल्या सद्गुरुना द्त्तस्वरूप मानलं जात. गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकविण्यासीठी आशीर्वादाची आवश्यकता असते. शिष्यात असलेले गुण जागृत करण्याची शक्ती सद्गुरूंचे ठायी असते. गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही. आपण “श्रीगुरूंची” कास धरून ठेवावी एवढचं. ते पैलतीरी नेतीलच.

‘तीन शिरें सहा हात’ अशा त्रिमूर्तीला दंडवत घालणारे तुकोबा दत्तात्रेयाविषयी भक्तिभाव व्यक्त करताना म्हणतात: नमन माझें गुरुराया। महाराजा दत्तात्रेया॥१॥तुझी अवधूत मूर्ति। माझ्या जीवाची विश्रांति ॥२॥
जीवींचे सांकडे फेडणाऱ्या आणि भवभ्रमाचे कोडे उलगडणाऱ्या अवधूत दत्तात्रेयाची मूर्ती तुकारामांच्या हृदयाची विश्रांती बनलेली आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात, दत्त जन्माच्या आधी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण मोठ्या भक्तीभावाने केले जाते. श्रीगुरुचरित्र हा वेद्तुल्य ग्रंथ मानला जातो. वेदांपेक्षाही श्रीगुरू महात्म्य श्रेष्ठ आहे असे ह्या ग्रंथात सांगितले आहे. गुरुचरित्र म्हणजे गुरुभक्तीचे शास्त्र. सद्गुरू प्राप्तीची प्रेरणा देणारा, सद्गुरुप्राप्ती करवून देणारा सद्गुरू सेवेचा आदर्श दाखविणारा, आदर्श घडविणारा, सद्गुरुचरणावरची निष्ठा वाढविणारा निर्भय व धर्मसंपन्न जीवन जगण्याची वाट दाखविणारा असा हा एक प्रासादिक ग्रंथ आहे. प्रासादिक आयतन आहे. पारायणाचे माध्यमातून या आयतानात बसण्याची सिद्धता ठेवून पौरुषेय जीवनाची वृत्ती स्वत:चे अंतरी सिद्ध करणे, जागृत करणे हीच या ग्रंथाची खरी समाराधना. हेच खरे पारायण. महापुरुष, सद्गुरू कसे ओळखायचे? सद्गुरू प्राप्ती कशी करून घ्यायची?, सद्गुरू प्राप्ती नंतर, सद्गुरूंच्या कृपेची प्राप्ती कशी करून घ्यायची? सद्गुरू कृपेची प्राप्ती झाल्यावर मुक्त कसे व्हायचे? असे सगळे टप्पे गुरुचरित्रात सांगितले आहेत. उपासना करत असताना उपासकाने आत्मपरीक्षण करावे असा संदेश गुरुचरित्र देतं.

श्री दत्तात्रेयांना एक विशेषण वापरतात ते आहे ‘पूर्णराते’. “पूर्णरात” शून्याला म्हणतात किंवा अमावसेलाही म्हणतात. ‘पूर्णराते’ इतका समर्पक शब्द सदगुरूतत्वासाठी दूसरा नाहीच. देणारा हा पूर्ण असल्याने अगणित पटीत देतो आहे, घ्यायच किती हे घेणार्याच्या कुवती वरच अवलंबून आहे.
श्रीद्त्तावतार म्हणजे भुक्ती आणि मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य, भोग आणि योग इत्यादींच्या समन्वयाचे सुंदर साकार स्वरूप आहे. याच सुन्दर लोकमंगलकारी द्त्तस्वरूपाचे दर्शन व्हावे म्हणून श्री दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची अनुभूती यावी म्हणून श्रद्धा, भक्ती आणि निष्ठापूर्वक म्हणूया, “ दत्ता दिगम्बरा या हो, सावळ्या मला भेट द्या हो”.

“होतील प्राप्त म्हणती मुनी ब्रह्मचारी| धर्मार्थकाममोक्षादिक लाभचारी| उच्चारीताची वदनी संसार सक्त| श्री दत्त, दत्त, जय श्री गुरुदेव दत्त|
भक्तवत्सल, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज, आपल्याला प्रसन्न होतील यात तिळमात्र शंका नाही.

 

श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६

Social Media