पुणे : ‘माईंच्या चिमण्या या…९ लेकी निघाल्या नवा संसार थाटायला…आपण येणार ना…त्यांची पाठवणी करायला…माईंचा आपल्यावर आभाळभर विश्वास…त्यामुळेच हि चिमणी पाखरं घेतील मोकळा श्वास. अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा आज रविवार दि. १५ मे २०२२ रोजी लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा सिटी पुणे येथे थाटात पार पडणार आहे. या माईंच्या लेकींना आशीर्वाद देण्यासाठी अनेकजण या विवाह सोहळ्याची आतुरतेने वाट बघत होते. आता प्रतीक्षा संपली असून उद्या होणाऱ्या विवाह सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर मांडळींची उपस्थिती राहील.
‘माझ्या लेकींचा विवाह सोहळा थाटात पार पडला पाहिजे, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात’ अस स्वप्न माईंनी बघितल होत. माईंनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकीचा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पडावा यासाठी मानस ममता बाल सदन कुंभारवळण यांनी योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. माईंच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले असून नुकताच काही दिवसांपूर्वीच त्यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. आज माई असत्या तर त्यांच्या उपस्थितीत या भव्यदिव्य विवाह सोहळ्याला आगळे-वेगळे रूप मिळाले असते. त्यांचं स्वप्न आज ममता बाल सदनने सत्यात उतरवलं आहे. माईंनी अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपलं आयुष्य जगलं. अखेर, ज्याचं कुणी नाही, त्याचं आपण असं म्हणत त्यांनी आयुष्यात अनेकांची सेवा केली. त्याच माईंच्या ९ लेकी उद्या १५ मे २०२२ रोजी विवाहबद्ध होऊन सासरला जाणार आहेत. आता पर्यंत माईंना २१० जावई, ५० सुना अशा गजबजलेल्या एकत्र कुटुंबाची ती ‘माय’ म्हणून मिरवली. या सार्यांच्या जीवनाची ती प्रकाशवाट झाली, दीपस्तंभ झाली. आता ह्यात आणखी ९ जावयांची नव्याने भर पडली आहे. लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं. जग फक्त अनुभव देतं,साथ तर फक्त आई-वडील देतात. त्या धर्तीवर सिंधुताईंनी पहिला सांभाळलेला अनाथ मुलगा दिपक गायकवाड हे संस्थेतच लहानाच्या मोठ्या झालेल्या ९ उपवर मुलींचे आई-वडील-पालक म्हणून भूमिका बजावत आहेत. सध्या संस्थेत ६० मुली असून त्यांचे पालन पोषण, शिक्षण आणि संगोपन योग्य रीतीने झाले पाहिजे यासाठी ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक गायकवाड परिश्रम घेत आहेत. त्यांना माईंची कन्या ममता सिंधुताई सपकाळ, विनय सपकाळ, मनीष जैन, पूजा जैन यांची मोलाची साथ मिळत आहे.
माईंच्या ९ मानस कन्यांसाठी केळवण
महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांचे केळवण करण्याची पद्धत आहे. हा विधी लग्नाआधी केला जातो. ममता बाल सदनमध्ये नववधूच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घातले. प्रेमाचं प्रतिक म्हणून वधूंना गिफ्ट दिलं आणि भरपूर शुभेच्छांचा वर्षाव केला. केळवणात बऱ्याचदा साडी, कपडे, दागदागिने, मौल्यवान वस्तू, रूखवंतातील वस्तू, संसारासाठी उपयुक्त वस्तू भेट स्वरूपात दिल्या. केळवणातून प्रेम, आदर, नातेसंबध दृढ होतात. त्याच धर्तीवर ममता बाल सदनमध्ये केळवणचे आयोजन केले होते. संस्थेतील सर्व मुलींना ९ उपवर मुलींना शुभेच्छा दिल्या.
घाणाभरण अन हळदी समारंभ
हळदीच्या वेळी आठवण होते ती गावाकडची सुरेल गाणी. सुवासिनींद्वारे ही गाणी म्हणत हळदी समारंभाची शोभा वाढवली. हळदी कार्यक्रमाची शोभा वधूला हळद लावताना नारळ व पाच मूठभर तांदळांनी माईंच्या लेकीची समारंभपूर्वक ओटी भरली. हे विधी विवाहाच्या आधी होत असले, तरी सध्या मात्र त्यामागची भावना, महत्त्व अन शास्त्र लक्षात घेता या गोष्टी विवाहाच्या आदल्या दिवशीच केल्या. आंब्यांच्या पानांना सुशोभित केलेल्या दोन मुसळांचे पूजन अन घाणाभरण्याच्या ओव्या म्हणत सुवासिनींद्वारे हा घाणा भरला. त्याच जात्यावर गहू आणि उडीद, हळकुंड दळण्यात आली.